Halloween Costume ideas 2015

अन्नाच्या नासाडीवर आपल्याला त्वरित सुधारणा आवश्यक


पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला जगण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून मिळते, अन्नाशिवाय तो जास्त वेळ जगू शकत नाही. परंतु सर्व सजीवांमध्ये मनुष्य हा एकमेव असा सजीव आहे की ज्याच्या गरजा पूर्ण होताच, अन्न बिनमहत्त्वाचे मानून ते वाया घालवितो. माणसाला त्याच्या चवीनुसार निवडण्यासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतात, जे तो त्याच्या सोयीनुसार वापरतो. भारत हा जगातील असा देश आहे जिथे अन्नाची नासाडी आणि उपासमार या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या येथे सर्वात मोठी समस्या ही आहे की आपण अन्नधान्याचे मूल्य केवळ पैशाच्या बाबतीतच करतो. श्रीमंत लोक त्यांच्या आवडीनुसार अन्नावर अधिक खर्च करतात, दुसरीकडे कुपोषितांना पोषक आहार दूरच, पोट भरेल इतके अन्नही मिळत नाही. सर्वांची भूक साधारणपणे सारखीच असते, तरीही सगळीकडे अन्नधान्याची एवढी नासाडी ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. अन्नाचा जगातील प्रत्येक धर्मात विशेष आदर केला आहे. शेतकरी पेरणीपूर्वी आणि कापणीनंतर ईश्वर आणि निसर्गाचे आभार मानून सण साजरे करतात. आपल्या समाजात अन्नदान हे सर्वोत्कृष्ट मानले जाते. जीवन जगवणाऱ्या अन्नाला आपण कचराकुंडीत फेकून देतो, तर ती आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अन्न हे निसर्गाद्वारे माणसाच्या कष्टाने मिळते, त्याचे मूल्य त्याच्या किंमतीपलीकडे समजून घेणे फार महत्वाचे आहे. प्रथम, पालकांनी अन्न-धान्याच्या प्रत्येक दाण्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे, नंतर त्यांच्या मुलांना देखील त्याचे महत्त्व समजावून द्यावे.

धान्य पिकवण्यापासून ते आपल्या ताटात ते आणण्यापर्यंत अनेकांचे संघर्ष लागलेले असते. शेतकरी धान्य पिकवण्यासाठी रात्रंदिवस शेतात कष्ट करतो, अनेक वेळा त्याला नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, अनेक वेळा कष्ट करूनही त्याच्या धान्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. बाजारपेठेत साठवणुकीसाठी पुरेसे गोदामे नसल्यामुळे धान्य उघड्यावर ठेवावे लागते; पाऊस व खराब हवामानामुळे असे धान्य ओले व कुजून जाते. गोदामाची योग्य देखभाल होत नसल्याने दरवर्षी शेकडो टन धान्य उंदीर खाऊन जातात. संघर्ष करत असताना अनेक शेतकरी हताश होऊन आत्महत्या करतात; मागील सात महिन्यात महाराष्ट्र राज्यातील एकूण १५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या जास्त नोंदल्या जातात. विभागीय आयुक्त विभागाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मराठवाड्यात १ जानेवारी २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, जे आपल्या तथाकथित आधुनिक आणि प्रगत म्हणून घेणाऱ्या समाजासाठी ही अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार, भारतातील एक तृतीयांश धान्य हे खाण्यापूर्वीच वाया जाते. यूएनईपी अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२१ दर्शवितो की, भारतातील घरगुती अन्नाचा अपव्यय दररोज १३७ ग्रॅम अन्न आहे, दरवर्षी प्रति व्यक्ती सुमारे ५० किलो. अन्न आणि कृषी संघटनेच्या अंदाजे आकडेवारीनुसार, भारतातील ४०% अन्न वाया जाते जे एका वर्षात ९२,००० कोटी रुपयांच्या बरोबरीचे आहे, ३० टक्के भाज्या आणि फळे कोल्ड स्टोरेजच्या अभावामुळे वाया जातात. जेव्हा आपण अन्न वाया घालवतो, तेव्हा आपण ते उत्पन करण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न, पिकांची कापणी, वाहतूक आणि पॅकेज करण्यासाठी लागणारी सर्व ऊर्जा, पाणी, वीज, शारीरिक मानसिक श्रम, कार्ये, कष्ट, गुंतवणूक आणि मौल्यवान संसाधने देखील वाया घालवतो. मर्यादित संसाधनांचा अनावश्यक नाश होतो, ज्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जन वाढते. चीन आणि भारत दरवर्षी अधिक घरगुती अन्न कचरा निर्माण करतात, अंदाजे ९२ दशलक्ष आणि ६९ दशलक्ष मेट्रिक टन, जगभरातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अधिक. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने असे उघड केले आहे की मागील पाच वर्षांमध्ये (२०१६ - २०२०) केंद्रीय अन्नधान्यांमध्ये २५००० मेट्रिक टनांहून अधिक अन्नधान्य वाया गेले.

लोकसभेत लेखी उत्तरात असेही म्हटले होते की मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ दरम्यान सुमारे ३५०० मेट्रिक टन अन्नधान्य वाया गेले. ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारत १२१ देशांपैकी १०७व्या क्रमांकावर आहे. यूएन च्या 'स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन, २०२२ रिपोर्टनुसार, २२४.३ दशलक्ष लोक किंवा भारतातील १६ टक्के लोक अल्पपोषित आहेत, त्यापैकी ५३ टक्के लोक कुपोषित आहेत. प्रत्येकासाठी पुरेसे अन्न असूनही, जगातील ६९० दशलक्ष लोक उपाशी झोपतात, ज्यामध्ये भारतातील १८९.२ दशलक्ष लोकांचा समावेश आहे. २०१९-२० मध्ये भारतात ६९ टक्के बालमृत्यूचे कारण कुपोषण होते. 

काही दिवसांपूर्वी मी देशातील एक प्रतिष्ठित विद्यापीठात कामानिमित्य भेट दिली होती, तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांच्या डायनिंग हॉलमध्ये जेवण घेण्यासाठी गेलो होतो. तिथले दृष्य पाहून मला धक्काच बसला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पूर्ण ताटात जेवण घेतले पण चव न आवडल्याने किंवा इतर काही कारणास्तव त्यांनी आपल्या ताटात जेवण भरून तसेच सोडून दिले होते. तेथील कर्मचाऱ्यांशी मी बोललो तेव्हा मला कळले की, असे दृश्य दररोज पहायला मिळते, जे अत्यंत दुःखद आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी अभ्यासासाठी येतात, प्रत्येकाची स्वतःची आवड असते आणि वेगवेगळे पदार्थ आणि चव असतात, पण आपल्या ताटात एवढे अन्न घेऊन रोज वाया घालवायला कोणते शिक्षण शिकवते?

अन्नधान्याची खरी किंमत फक्त कष्टाळू माणूसच समजू शकतो, ज्याने भुकेच्या वेदना समजून घेतल्या आणि सोसल्या आहेत, नाहीतर आज प्रत्येकजण मोठमोठ्या गोष्टी करतात, पण दुसरीकडे तेच लोक घरात आणि फंक्शन्समध्ये अन्नाची नासाडी करताना दिसतात. भारतीय समारंभामध्ये, सणांमध्ये अन्नाची नासाडी सर्वांनाच ठाऊक आहे, पण आपण सुधारणार कधी? अन्न मोफत असो वा खरेदी केलेलं, आपल्या भूकेनुसार ताटात थोडे-थोडे अन्न घेतले पाहिजे, गरजेनुसारच सेवन करावे.

अन्नाची नासाडी हा गुन्हा मानला गेला आणि जबाबदार व्यक्तीकडून मोठा दंड वसूल केला, तर कदाचित महिनाभरात देशात अन्नाची नासाडी पूर्णपणे आटोक्यात येऊ शकते. सोबतच देशातील अब्जावधी रुपयांची बचत होऊन मोठा विकास होऊ शकतो, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल, भूकेची समस्या कमी आणि समृद्धी वाढेल. समाजातील सर्व घटकांना पुरेसे अन्नधान्य मिळेल, रोगराई कमी होईल, देश आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या संतुलित होईल.

घर, ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरंट, कार्यक्रम, सामूहिक समारंभ, संस्था, ढाबा, कॅफे शॉप, मॉल, गोदाम, कोल्ड स्टोरेज म्हणजे जिथे अन्न साहित्य आहे अशा प्रत्येक ठिकाणी, खाजगी असो वा सरकारी विभाग, अन्नाच्या नासाडीला जबाबदार व्यक्ती वर शिक्षा झाली तर लवकरच सुधारणा होईल. लोक जागरूक होतील आणि मर्यादित प्रमाणात अन्न शिजवतील. फंक्शनमध्ये, जेवण चाखल्यानंतर, लोकांना चव आवडली तरच प्लेटमध्ये मर्यादित प्रमाणात जेवण घेतले जाईल. यामुळे कुपोषण संपण्यास, आरोग्य सुधारण्यास मदत आणि जिभेची हौस भागविण्यावर आळा घालण्यास मदत होईल. काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिल्यास, ते अन्न सार्वजनिक खाद्यपदार्थांच्या स्टॉलला दान करावे. 

अन्न संकलनासाठी प्रत्येक शहर, खेडे आणि वस्त्यांमध्ये अशी सार्वजनिक फूड स्टॉल केंद्रे असावीत, जिथे उरलेले अन्न देता येईल. अशा केंद्रांवर गरजूंसाठी मोफत जेवणाची सोय असावी, जिथे कोणीही भुकेलेला माणूस जाऊन पोटभर जेवू शकेल. या व्यवस्थेमुळे कोणीही उपाशी राहणार नाही आणि धान्याची नासाडी होणार नाही. सर्वत्र समृद्धी येईल, मौल्यवान जीव वाचतील, प्रत्येकाला अन्नाच्या प्रत्येक दाण्याची किंमत समजेल आणि आपल्या देशाच्या सर्वात मोठ्या समस्येचे रूपांतरण विकासात होईल.


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget