एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेचा खरा अंदाज लावायचा असेल, त्याच्या श्रध्दा, आंतरिक भावना, आचार-विचारांसह त्याचे संपूर्ण चरित्र समजुन घ्यायचे असेल तर तो प्रार्थना कुणाला करतो? कशी करतो? व काय मागतो? हे पाहणे आवश्यक आहे. प्रार्थनेतुन माणसाच्या श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतिबिंब उमटते. प्रार्थना माणसाच्या संकल्पना, जाणीवा व भावनांचे प्रतिनिधित्व करते. माणसाच्या अंतरंगाचे दर्शन घडवते. व्यक्तीच्या प्रार्थनेद्वारेच हे कळते की सृष्टीविषयी त्याच्या संकल्पना काय आहेत. या सृष्टीत त्याचे स्वतःचे स्थान काय आहे आणि त्याच्या दृष्टीने ईश्वर आणि भक्ताच्या संबंधाचे स्वरूप काय असावे. या सर्व गोष्टींचे सर्वोत्तम उदाहरण आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या प्रार्थनांमध्ये मिळते. या सर्व प्रार्थना आपल्याला कुरआन आणि हदीसमध्ये मिळतात. वस्तुस्थिती ही आहे की, आदरणीय पैगंबर (स) यांनी कोणकोणत्या प्रार्थना केल्यात या एकाच विषयाच्या अभ्यासातून त्यांच्या चरित्राचे दर्शन घडते. नैतिकता, स्वभाव, आचार-विचार, आपल्या निर्मात्याशी असलेली भक्तीभावना व त्याच्याशी असलेली जवळीकता इत्यादींचे संपूर्ण चित्र त्यांच्या प्रार्थनेवरून दिसून येईल. या प्रार्थनांमागील व्यक्तिमत्त्व किती उच्च आहे याची साक्ष मन देईल आणि हा विश्वास दृढ होईल की, खरंच! ते अल्लाहचे पैगंबर आहेत!
प्रार्थना चारित्र्य घडवतात
एकीकडे माणसाच्या प्रार्थनांद्वारे त्याचे चरित्र समजुन घेण्यास मदद मिळते तर दुसरीकडे प्रार्थनेमुळे खुद्द माणसाच्या चारित्र्यावरही चांगले परिणाम होतात. प्रार्थनेचा एक अतिशय महत्त्वाचा आणि जाणवणारा परिणाम म्हणजे त्यामुळे चारित्र्य घडते. याचे कारण असे की प्रार्थना मनात खोलवर परिणाम करतात. त्यामुळे जीवनाची दिशा हळूहळू बदलू लागते. आचार-विचार बदलू लागतात. नैतिकतेवर परिणाम होऊ लागतो. माणसाचे छंद बदलतात. आवडी-निवडीचे मापदंड बदलतात. श्रद्धा, संकल्पना, दृष्टिकोन विशिष्ट दिशा घेतात, म्हणूनच माणूस काय प्रार्थना करतो व कशासाठी करतो हे खूप महत्त्वाचे आहे. जर प्रार्थनेची दिशा योग्य असेल, ध्येय उच्च असेल, तर चांगले बदल होतात आणि जर प्रार्थनेची दिशा चुकीची असेल, माणूस तुच्छ उद्दीष्टे समोर ठेऊन फक्त छोट्या-मोठ्या गोष्टींचीच मागणी करू लागला तर त्याची नैतिक पातळी घसरण्याची शक्यता असते.
व्यक्तिमत्त्व निर्माण करणाऱ्या प्रार्थना
आदरणीय पैगंबर मुहम्मद (स) यांच्या प्रार्थनांचा अभ्यास करताना हे प्रखरतेने जाणवते की, या प्रार्थना माणसाच्या मनावर संस्कार करतात. मागितलेल्या गुणांनी माणूस स्वतःला सजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे लक्ष व्यक्तिमत्त्व सुधारणाऱ्या पैलूंकडे जाते. त्या सद्गुणांची माणसाच्या अंतःकरणात इच्छा निर्माण होते. माणसाचे मन त्यांकडे आकर्षित होते आणि वाईट गोष्टींबद्दल मनात द्वेष निर्माण होतो.
मौलाना मुहीयुद्दिन गाजी यांनी लिहीले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण जाणीवतेने प्रार्थना करते की अल्लाहने त्याला कंजूषपणापासून मुक्त करावे, तेव्हा त्याच्या मनातील कंजूषपणाची जागा संकुचित होते. जेव्हा एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारे भक्ति व आज्ञापालन करण्याची मनापासून मागणी करते तेव्हा त्याचे मन पुर्ण निष्ठेने भक्ती व आज्ञापालनाकडे वळू लागते आणि तो त्यासाठी प्रयत्न करू लागतो.
जेव्हा एखादी व्यक्ती भरपूर रोजीरोटीसाठी प्रार्थना करते आणि ते प्राप्त करताना हराम व अवैध मार्ग टाळण्यासाठी प्रार्थना करते, तेव्हा त्याला हराम व बेकायदेशीर मार्गांपासून दूर राहणे व उदरनिर्वाहासाठी कायदेशीरपणे कठोर प्रयत्न करणे आवडू लागते.
जेव्हा एखादी व्यक्ती अल्लाहकडे प्रार्थना करते की हे माझ्या पालनकर्त्या! मला चांगली कर्मे करण्यास सक्षम कर! तेव्हा तो स्वत:ला सांगत असतो की माझे चांगल्या कर्मांवर प्रेम आहे आणि हे पुन्हा पुन्हा बोलून त्याचे सत्कर्मांवरचे प्रेम वाढतच जाते. (अनुवाद : मुअल्लिमे अखलाक (स) की शख्सियतसाज दुआयें. पृ. क्र.- 5 )
लोकांनी कोणत्या प्रार्थना कराव्यात हेही विश्व निर्मात्याने कुरआन आणि आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे मानवतेला शिकवले आहे. हा एक महत्वपूर्ण आणि मोठा विषय आहे. त्यातील काही प्रार्थनांचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. प्रार्थनेसाठी भाषेचे व शब्दांचे बंधन नाही. एखादी व्यक्ती आपल्या न्याय्य गरजांसाठी आपल्या निर्मात्या, स्वामीकडे हव्या त्या भाषेत प्रार्थना करू शकते, परंतु उच्च ध्येय गाठण्यासाठी कुरआन आणि हदीसच्या शब्दांत प्रार्थना करणे सर्वोत्तम आहे. जोपर्यंत या प्रार्थना पाठ होत नाहीत तोपर्यंत मूळ शब्दांचा अर्थ लक्षात ठेऊन स्वतःच्या शब्दात प्रार्थना करावी, पण कुरआन आणि हदीसद्वारे शिकवले गेलेले प्रार्थनेचे शब्द मनावर परिणाम करतात हे नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.
.......................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment