नवी दिल्ली
गाझा हॉस्पिटलवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा जमाअत-ए-इस्लामी हिंद ने निषेध केला आहे. या हल्ल्यात अनेक महिला आणि मुलांसह सुमारे एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सादतुल्ला हुसैनी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्य गाझामधील अल-अहली हॉस्पिटलवर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा आम्ही निषेध करतो आणि तीव्र संताप व्यक्त करतो. सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, रुग्णालय परिसर महिला आणि मुलांनी खचाखच भरला होता. इस्रायलच्या लष्कराकडून हे रुग्णालय रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.
जमाअतच्या दृष्टीने हा नरसंहार आणि माणुसकीविरोधी गुन्हा आहे. इस्रायलचे सैन्य सर्व युद्ध कायदे आणि मूलभूत मानवतावादी मूल्यांचे स्पष्ट उल्लंघन करून शाळा आणि रुग्णालयांना लक्ष्य करत आहे. मूकदर्शक बनून राहणारी बलाढ्य राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्था जघन्य युद्धगुन्ह्यांपासून स्वत:ला मुक्त करू शकत नाहीत. त्यांच्या हातावर पॅलेस्टाईनमधील निरपराध पुरुष, स्त्रिया आणि मुलांचे रक्त आहे.
या भागात तातडीने शस्त्रसंधी लागू करावी आणि गाझामधील नागरी भागांवर जाणीवपूर्वक केलेल्या बॉम्बहल्ल्याचा निषेध करावा, अशी आमची मागणी आहे. इस्रायलच्या कारवायांना सोडता कामा नये आणि संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने नुकत्याच केलेल्या विविध युद्धगुन्ह्यांबद्दल त्याच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवला जावा. माणुसकीची परीक्षा सुरू आहे. जर आपण पॅलेस्टिनींना वाचविण्यात अपयशी ठरलो आणि सध्याचा नरसंहार थांबवला नाही तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही.
Post a Comment