Halloween Costume ideas 2015

पोलिसांची भीतीच राहिलेली नाही काय?


'प्राणघातक हल्ल्यातून बाहेर येतांना...' हे लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते व सजगतेने समाजभान असणारे शिक्षक हेरंब कुलकर्णी यांचे मनोगत समाज माध्यमातून वाचनात आले. अलिकडे महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली दिसून येते. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून लौकिक प्राप्त असूनही अलिकडच्या काळात कोयता गॅंगने भरदिवसा हमरस्त्यावर घातलेला दहशतवादी धुमाकूळ सोशल मीडियावर पहायला मिळाला. कोल्हापुरात असामाजिक तत्त्वांनी आणि काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेच्या समोर पंचगंगा नदी पात्रात मूर्ती विसर्जन करण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तोडले व प्रशासनाचा आदेश मोडून मूर्ती विसर्जित केल्या. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसले. मध्यंतरी सांगली, सातारा, औरंगाबाद, जिल्ह्यातही घडलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचे आपण पाहिले. हेरंब कुलकर्णी यांना मारहाण झाल्यानंतर पोलीस चौकीत चार तास बसवून घेतले. त्यांची दखल घेतली नाही. सर्वसामान्य जनतेला पोलिसांकडून कशी वागणूक दिली जाते, याचे हे ताजे उदाहरण आहे.

आजकाल अनेक शहरांमध्ये रस्त्यावर तिघे चौघे एकाच मोटारसायकलवर बसून वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर जातांना दिसतात, तर सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज काढत अतिवेगाने पोलिसांच्या समोर  मोटारसायकल चालवताना सर्रास दिसतात. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेची आजच्या काळात भीती राहिली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांचा गुन्हेगारांवरील दरारा कमी झाला आहे. त्याचबरोबर पोलिसांची समाजातील प्रतिष्ठा देखील कमी झालेली आहे. असे चित्र सर्रास दिसून येते. कोल्हापुरात तर पोलिसांच्या काळ्या यादीत असणारा मटकाकिंग भरदिवसा पोलीस स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये पोलिसांसमवेतच चहापान करतांनाचा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मध्यंतरी संभाजीनगर परिसरात खाजगी जागेत अतिक्रमण करून ९० ते १०० चारचाकी, सहाचाकी व अवजड वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्या व सतत अवैध धंद्याशी थेट संबंध असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यावसायिकांविरुध्द  तक्रार करण्यात आली होती, मात्र तक्रारदाराची बाजू न ऐकता 'अर्थ'पूर्ण व्यवहार करुन तक्रारदारालाच त्रास देण्याचा अश्लाध्य प्रकार केला गेला. अशा अनेक कारणांमुळे पोलिसांविषयी पूर्वीसारखा भीतीयुक्त आदर राहिलेला नाही. यास पोलिसांची राजकीय अपरिहार्यता काही अंशी कारणीभूत आहे. परंतु, याचे मुख्य कारण काही पोलिसांची आर्थिक लालसा हेच आहे. काही लाचखोर पोलिसांनी धनदांडग्यांचे, नेत्यांचे, अवैध व्यावसायिकांचे बटीक होऊन त्यांचा फायदा करुन देण्यासाठी पदाचा गैरवापर करीत आर्थिक लोभापायी संपूर्ण पोलीस खात्यालाच बदनाम करुन टाकले आहे. काही पोलीस अधिकारी कर्तव्यदक्ष आहेत, यात संदेह नाही. कोल्हापुरात शिवप्रतापसिंग यादव, यांच्यासारखे कडक शिस्तीचे व कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुभवले आहेत. मात्र लाचखोर व भ्रष्ट पोलीस यंत्रणेच्या कारभारामुळे सब घोडे बारा टक्के न्यायाने संपूर्ण पोलीस खाते बदनाम होते आहे. त्यामुळे पोलीस खात्याचा दरारा व वचक राहिलेला नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही.

शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना तर कोणीच घाबरत नाहीत, अशी स्थिती आहे. वाहनधारकांवर कारवाई करण्याऐवजी अर्थपूर्ण व्यवहार करुन शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यात ही यंत्रणाच आघाडीवर असते, हे उघड गुपित आहे. एखाद्या सर्वसामान्य नागरिकावर केवळ नंबर नीट दिसत नाही म्हणून दंड करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसाने ‘दादा’ ‘मामा’ ‘भाऊ’ ‘साहेब’ अशी आकड्यांची नक्षीची नंबरप्लेट असणाऱ्या एखाद्या नेत्याची गाडी अडविल्याचे मात्र कधीच ऐकीवात नाही. या साध्या उदाहरणासह मटका, दारू, जुगार, वाळू माफिया, वेश्या व्यवसाय अशा अनेक अवैध व्यवसायिकांकडे लाचखोर पोलिसांनी आर्थिक लालसेपोटी आपली प्रतिष्ठा विकली असल्याची सामान्यांची धारणा झाली आहे. सर्वसामान्यांवर जोरजबरदस्ती करुन पोलिसी खाक्या दाखवणारे पोलीस अर्थकारणासाठी राजकीय नेते, अवैध व्यवसायिक व धनदांडग्यांना मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट देतात, असा जनतेत संदेश जात असल्याने पोलीस सामान्यांपासून दूर होत आहेत. काही लाचखोर पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खात्याबद्दलचा सामान्यांचा विश्वास कमी होतं आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी कळपातील या काळ्या कोल्ह्यांना वेळीच ओळखून त्यांचा आणि त्यांच्या धन्यांचा कायमचा बंदोबस्त करणे आता गरजेचे झाले आहे. तरच, सामान्यांचा गमावलेला विश्वास पोलीस पुन्हा मिळवू शकतील. अशा प्रकारे, कालीयामर्दनासाठी या काळ्या डोहात उडी घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनता व सच्चे पत्रकार नेहमीच उभे असतात हे अनेकदा सिद्ध झाले  आहे. 

अलीकडच्या काळात पोलिसांविषयी समाजात कमालीचा तिरस्कार आहे, याचा प्रत्यय माझ्या जवळच्या पोलीस असणाऱ्या मित्र व नातेवाईक यांच्या मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीत येत आहे, अनेक जण पोलीस किंवा पोलिसांच्या मुलामुलींशी विवाह संबंध जोडायला तयार नाहीत, पोलिसांच्या बरोबर सोयरीक नकोच, असा काहीसा नकारात्मक सूर वाढलेला आहे, काही लाचखोर व भ्रष्ट पोलिसांच्या काळ्या कारनाम्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात बदनाम झाली आहे, याचा गांभीर्याने विचार कधी करणार आहात का नाही, असा प्रश्न पडतो. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या न्यायाने कर्तव्य बजावत असताना लाचखोर  पोलिसांनी आपण व आपल्या कुटुंबाला आधार देणाऱ्या खाकी वर्दीशी प्रामाणिक राहून सर्व सामान्य जनतेचा दूवा घ्यावा आणि पोलीस हा जनतेचा रक्षक आहे या भावनेतून गमावलेला आदर व प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करावा.

-डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget