अमेरिका आणि भारत यांच्यात एक गोष्ट सामान्य आहे. ती म्हणजे विविधतेतून साधलेली एकता. फरक एवढाच की भारतातील विविधता ही अस्सल भारतीय आहे. तर अमेरिकेतील विविधताही जगभरातील इतर देशातून येऊन स्थायिक झालेल्या वेगवेगळ्या वंशाच्या आणि धर्माच्या लोकांमधून साकारलेली आहे. विविधतेला जर सन्मान दिला गेला तर वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे आणि क्षमतेचे लोक एकत्र येऊन देशाला महासत्ता बनवू शकतात हे अमेरिकेचे उदाहरण दुर्दैवाने आपल्या देशातील काही जातीयवादी लोकांच्या लक्षात येत नाही. आपल्या देशात विविधतेचा वापर, ’’हे आपले, ते परके, हे नीच, ते उच्च’’ हे भेद जोपासण्यामध्ये केला जातो. ही दुर्दैवाची बाब आहे. अशाने आपला देश महासत्ता बनण्याचे सर्व गुण बाळगूनही महासत्ता बनत नाहीये. उलट देशाचा प्रवास उलट दिशेने चालू असल्याचे नुकतेच राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये केलेल्या पंतप्रधानांविषयीच्या त्या विधानावरून लक्षात येते की, आपले पंतप्रधान हे मागच्या आरशात पाहून देशाची गाडी चालवत आहेत.
ही भूमिका यासाठी मांडावी लागली की, याला दीड महिन्यांपासून मनीपूर हे राज्य अक्षरशः जळत आहे. चुरा चांदपूर जिल्ह्यात 3 मे रोजी घडलेल्या हिंसेनंतर अगोदर तर सर्व प्रदेश वाऱ्यावर सोडण्यात आला. भरपूर हिंसा झाल्यावर गृहमंत्र्यांनी मणिपूरमध्ये बैठक घेतली आणि राज्याच्या पोलिस प्रमुखाला बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु, यानंतरही हिंसा सुरूच असून, इंटरनेट बंदी, संचार बंदी अधूनमधून सुरूच आहे. लष्कर आणि आसाम रायफलच्या तुकड्या प्रदेशात असूनही अधूनमधून लोक एकमेकांची घरे जाळत आहेत.
मणिपूरची भौगोलिक रचना ही अशी आहे की, तेथे दोन प्रमुख समुदाय आहेत. एक हैती आणि दूसरे कुकी. हे समाज एकमेकांशी संलग्न आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार या चिमुकल्या राज्याची लोकसंख्या 29 लाख आहे. प्रदेशाची रचना डोंगर आणि डोंगराखालील मैदानी प्रदेश (तराई) अशी आहे. लोकसंख्येची विभागणी ही डोंगरामध्ये राहणारी आणि तराईमध्ये राहणारी अशीच आहे. अंदाजे 43 टक्के लोक डोंगरावर राहतात. आणि ह्या डोंगरांनी मणिपूरचा 90 टक्के भाग भूभाग व्यापलेला आहे. दूसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे 90 टक्के डोंगराळ भूभाग 43 टक्के लोकांच्या ताब्यात आहे आणि 10 टक्के तराई (मैदानी) जमिनीमध्ये 57 टक्के लोक राहतात. डोंगरात राहणारे आदिवासी तर तराईमध्ये राहणारे बिगर आदिवासी अशी ही सामाजिक विभागणी आहे. आदिवासींमध्ये 33 वेगवेगळे गट असून, बहुतेक ख्रिश्चन धर्मीय आहेत. तराईमध्ये राहणारे हिंदू असून, ख्रिश्चन आणि हिंदूंची जनसंख्या बरोबरच म्हणजे 41 टक्के एवढी आहे. राहिलेले मुस्लिम आणि इतर आहेत. कुकींना नागाही म्हटले जाते आणि हे ख्रिश्चन धर्मीय आहेत. हिंदू समाज मूळचा हिंदू जरी असला तरी ते स्वतःला आदिवासी मानतात. आणि 1697 ते 1709 या काळात हिंदू मैतीय राजांनी या राज्यावर राज्य केले असा त्यांचा दावा आहे. मणिपूरमध्ये मंदिरांची संख्या मोठी असून, पौरोहित्य करण्यासाठी देशाच्या अनेक भागातून ब्राह्मण येवून मणिपूरमध्ये स्थायिक झालेले आहेत. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात ख्रिश्चन मिशनरींनी केेलेल्या धर्मप्रसारामुळे कुकी आदिवासी हे आपला धर्म सोडून ख्रिश्चन झाल्यामुळे तराई भागात राहणाऱ्या हिंदूंमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. म्हणूनच या हिंसक घटनांदरम्यान सर्वात जास्त आगी ख्रिश्चन धर्मीयांच्या चर्चेसना लावण्यात आलेल्या आहेत. मणिपूरमध्ये ख्रिश्चन असूनही अनेक कुकींच्या समुहांना ते आदिवासी असल्यामुळे एससी आणि एसटीचे आरक्षण मिळते. मैतई समुदायाला ते सवर्ण असल्यामुळे मिळत नाही. मतभेदाचे हेच मुख्य कारण आहे. त्यातूनच मैतई समुदाय कुकींचा द्वेष करतो. मात्र मंडल आयोगाच्या अहवालात 342 अ कलमानुसार मैतई समुदायाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यात आला. यावर ते संतुष्ट नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे म्हणणे आहे की आम्ही मूळ आदिवासीच. त्यामुळे आम्हालाही एसटीचे संरक्षण द्यावे. आरक्षणामुळे मिळणाऱ्या लाभाकडे मैतई तरूण आता यापुढे दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ख्रिश्चन हा विदेशी धर्म असून, त्या धर्माच्या अनुयायांकडे मणिपूरची 90 टक्के जमीन असून आरक्षणामुळे मैतई समाजाला ती जमीन पैसे आणि इच्छा असूनसुद्धा खरेदी करता येत नाही. ही खदखद त्यांच्या मनात खोलपर्यंत रूजलेली आहे. मैतई समाज कुकींच्या तुलनेत सधन असल्यामुळे आपले आरक्षण काढल्यास मैतई लोक आपल्या जमीनी पडेल ती किंमत देवून खरेदी करतील आणि आपण आपल्याच डोंगराळ पट्ट्यात अल्पभूधारक होवून जावू ही भीती नागा कुकींच्या मनामध्ये घर करून आहे. मैतईंना एस.सी. आणि एस.टी.मध्ये आरक्षण देण्यासाठीही त्यांचा विरोध आहे.
19 एप्रिल रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने मैतईंनी आपल्याला ही एस.सी. आणि एस.टी.चे आरक्षण मिळावे या मागणी संबंधीच्या याचिकेवर सरकारने चार आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आणि मणिपूर पेटले. आधीच राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला नागा कुकींची चर्च बळी पडली होती. तो राग नागा कुकींच्या मनात होताच. इंफाळसारख्या शहरातही अतिक्रमण हटाव मोहिमेतही अनेक चर्चेस पाडण्यात आली. त्यातच वनखात्याने नागांच्या पारंपारिक जमीनीवर हक्क सांगण्याचेही प्रकार घडले. या सर्वामुळे नागा कुकींची मनस्थिती अस्थिर झाली.
कोणत्याही राज्यात जेव्हा दोन समाजामध्ये अशी अस्थिरता निर्माण होते तेव्हा राज्य सरकारने मध्यस्थी करून सामंजस्याने तो प्रश्न हाताळावा, अशी अपेक्षा करणे चुकीचे नसते. मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार असून, मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह हे आहेत. त्यांनी सामंजस्याची भूमीका न घेता मैतईंना पूरक अशी भूमीका घेतली. त्यामुळे कुकी आदिवासी आणि ख्रिश्चन धर्मगुरू अतिशय व्यथीत झालेेले आहेत. शंभरपेक्षा जास्त लोकांचा या हिंसाचारामध्ये बळी गेलेला असून, हजारो लोक विस्थापित झालेले आहेत. राजकारणी जेव्हा एकांगी भूमिका घेतात तेव्हा आपल्याच देशातील आपलेच नागरिक केवळ श्रद्धा वेगळी असल्यामुळे कसे भरडले जातात, याचे उत्तम उदाहरण मणिपूर आहे.
कुकी आदिवासी असो, अल्पसंख्यांक मुस्लिम असो किंवा मागासवर्गीय समाज असो जोपर्यंत त्यांना वेगळ्या नजरेने पाहिले जाईल, तोपर्यंत देशामध्ये स्थैर्य येणार नाही आणि कोणताही अस्थिर देश महासत्ता होऊ शकत नाही. हे जोपर्यंत भाजप आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात येणार तोपर्यंत हे असेच सुरू राहणार. आज मणिपूर आहे उद्या दूसरे कोणतेतरी राज्य राहील. देशांची हाणी होत राहील. ती हाणी भरून काढण्यासाठी पुन्हा सरकार सर्वधर्मीय नागरिकांवर कर लावील आणि हे दुष्ट चक्र असेच सुरू राहील.
Post a Comment