हे पानलकर्ता! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी, म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर व यांना खावयास फळे दे,५० कदाचित हे कृतज्ञ होतील.
(३८) पालनकर्ता! तू जाणतोस जे काही आम्ही लपवितो आणि जे काही प्रकट करतो.’’५१ आणि५२ खरोखरच अल्लाहपासून काहीही लपलेले नाही, जमिनीतही नाही आणि आकाशातही नाही.
(३९) ‘‘उपकार आहे त्या अल्लाहचे ज्याने मला या वार्धक्यात इस्माईल (अ.) आणि इसहाक (अ.) सारखी मुले दिली, वस्तुस्थिती अशी आहे की माझा पालनकर्ता खचितच प्रार्थना ऐकतो.
(४०) हे पालनकर्ता! मला नमाज कायम करणारा बनव व माझ्या संततीपासूनदेखील (असे लोक उभे कर जे हे काम करतील) पालनकर्ता! माझी प्रार्थना स्वीकार
(४१) हे पालनकर्ता! मला आणि माझ्या आईवडिलांना आणि सर्व श्रद्धावंतांना त्या दिवशी माफ कर जेव्हा हिशेब प्रस्थापित होईल.’’५३
(४२) आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.
(४३) डोळे वर लावून पळत सुटले असतील. नजरा वर खिळलेल्या५४ आणि हृदये उडली जात असतील.
(४४) हे पैगंबर (स.), त्या दिवसाचे यांना भय दाखवा जेव्हा प्रकोप यांना येऊन गाठील. त्यावेळी हे अत्याचारी सांगतील, ‘‘हे आमच्या पालनकर्ता! आम्हाला आणखी थोडी सवलत दे, आम्ही तुझ्या आवाहनास होकार देऊ आणि पैगंबरांचे अनुकरण करू.’’ (पण यांना स्पष्ट उत्तर दिले जाईल की) ‘‘तुम्ही तेच लोक नाहीत काय जे यापूर्वी शपथा घेऊन घेऊन सांगत होते की आमचा तर कधी ऱ्हास होणारच नाही?
५०) हे त्याच प्रार्थनेच्या समृद्धीचे फलित आहे. पूर्वी तर संपूर्ण अरब मक्का शहराकडे हज आणि उमरासाठी आकर्षित होत होता, परंतु आज जगातील कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. याच प्रार्थनेच्या समृद्धीचे फलीत हेसुद्धा आहे की नेहमी येथे निरनिराळी फळे, धान्य आणि उपजीविकेची साधने उपलब्ध होत असतात. तसे पहाता या ओसाड वाळवंटात जनावरांसाठी चारासुद्धा उगवत नाही.
५१) म्हणजे हे अल्लाह! जे काही मी आपल्या तोंडाने म्हणत आहे आणि माझ्या मनात जे काही आहे त्यालासुद्धा तू जाणतो.
५२) ही आयत अल्लाहने पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या कथनाला पुष्टी देण्यासाठी वर्णन केली आहे.
५३) पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी या क्षमायाचनेत आपल्या बापाला त्या वचनावर समाविष्ट केले होते जे त्यांनी देशत्याग करतांना दिले होते. `मी आपल्या पालनकर्त्याशी क्षमायाचना करील.' असे वचन त्यावेळी त्यांनी दिले होते. (१९:४७) नंतर त्यांना अनुभव झाला की आपला बाप हा अल्लाहचा वैरी होता. तेव्हा त्यापासून ते स्वत: अलिप्त् राहिले. (९:११४)
५४) कयामतचे ते भयानक दृष्य त्यांच्यासमोर असेल. तेव्हा त्यांचे डोळे थीजतील आणि ते एकटक पापणी न लवता त्याकडे उद्विघ्न मन: स्थितीत पाहातील.
Post a Comment