वाघाने गावातील दोन-चार जनावरांची शिकार केली होती. चार दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. वाघाची चांगलीच दहशत गावात पसरली होती. गावकऱ्यांना चांगलीच धास्ती बसली होती. बाया माणसे निंदायला खुरपायला शेतात जाण्यासाठी घाबरु लागली. पुरुष मंडळी एकट्याने शेताकडे फिरके ना. दोघा चौघांचा घोळका करून शेतात जाऊ लागले. सूर्य मावळतीला जाण्याआधीच गाव गाठू लागले.
नामदेव पाटलांनी तालुक्याच्या ठिकाणी राहत असलेल्या शिकाऱ्याला बोलाऊन घेतलं. शिकारी आला. वाघ कोणी पाहिला, कुठे पहिला याची चौकशी केली. एक-दोन मुक्काम गावात राहिला. आसपासचा शिवार पिंजून काढला पण; वाघ काही दिसला नाही. वाघ नसेलच, कोल्ह्याकुत्र्याने शिकार केली असेल, गावकऱ्यांचा गैरसमज झाला असेल आणि जरी वाघ असेल तरी घाबरायचं काम नाही त्याने आपला मुक्काम इथून हलवला आहे. असे जाहीर केले आणि निघून गेला. गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दोन-चार दिवसांनी माधव दुपारच्या वेळी गुरांना पाणी पाजण्यासाठी नाल्यावर घेऊन गेला. बघतो तर काय वाघ नाल्यावर पाणी पीत होता. माधवचं नशीब बलवत्तर म्हणा, वाघ त्याच्यापासून फार लांब होतं. त्याने लगेच जनावरे फिरवली आणि गाव गाठलं.
आपण नाल्यावर वाघ पाहिल्याचं ते एका-एका गावकऱ्याला गाठून सांगू लागला परंतु; कोणीही त्याच्यावर विश्वास करे ना कारण, त्याला थापा मारायची सवय होती. शेवटी त्याला पाटलांच्या समोर उभे करण्यात आले. त्याने आई-वडिलांची शपथ घेऊन, आपण वाघ पाहिल्याचे सांगितले. नामदेव पाटील विचारात पडले, काय करावे कळेना. त्याच रात्री सलीम भाईच्या आखाड्यावरील कुत्र्याची शिकार झाली होती. अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत कुत्रा धुऱ्यावर पडून होता. तिथे वाघाचे पंजे दिसत होते. आता मात्र लोकांची भंबेरी उडाली.
काहीतरी मार्ग काढला पाहिजे, यासाठी सगळे लोक रात्री पारावर जमले. विचारविनिमय सुरू झाला. पुन्हा शिकाऱ्याला कळवावे असे एक दोन जणांनी सांगितले परंतु; मागच्या खेपेला त्याला कळवण्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन दिवस त्याची मेजवानी करत बसावी लागली होती. त्यापेक्षा आपणच वाघाचा काटा काढला पाहिजे. वाघाची शिकार केली पाहिजे, यावर सगळ्या गावाचे एक मत झाले. पण शिकार करणार कोण?
सगळ्यांच्या नजरा नामदेव पाटलाकडे वळल्या. पाटील म्हणाले, पाहिजे असल्यास मी माझी बंदूक देतो, परंतु मी शिकार करू शकणार नाही कारण; मी आता साठी ओलांडली आहे. दूरची नजर ही जरा कमजोर झाली आहे. त्यातच शिकार ही रात्रीच्या वेळी करावी लागणार. मला ते शक्य होणार नाही. नामदेव पाटलांनी हात उचलले.
चंदू म्हणाला, ’पाटील साहेब! हा माधव आहे ना, हा करेल शिकार! एरवी लय गप्पा मरतो.’ सगळेजण त्याच्याकडे पाहून हसू लागले. माधव खोटा आव आणीत म्हणाला,’ नाही करायला काय झालं... पण बंदूक चालवायला येत नाही ना!’ परत हशा पिकला. तेवढ्यात नागोजी उभा राहिला आणि म्हणाला,’पाटील साहेब! तो मुस्तफा बेग आहे ना! तो करेल शिकार. आजच तो सुट्टीवर आला आहे.’
मुस्तफा बेग सैन्यात होता. महिनाभराच्या सुट्टीवर तो गावी आला होता. नागोजी आणि मुस्तफा यांची पक्की मैत्री होती.
पाटलांचे डोळे चमकले ते लगेच म्हणाले, नागोजी जा पटकन, त्याला बोलाऊन आण, म्हणावं पाटलांनी बोलावलं आहे. नागोजीने, हबीबला सोबत घेतले दोघे धावतच मुस्तफाकडे गेले. जेवण करून मुस्तफा अंगणात चटाई टाकून आयीच्या मांडीवर डोके ठेवून पडला होता. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. मुस्तफाचा बाप अंगणात टाकलेल्या छपरीच्या खांबाला टेकन देऊन बसला होता. तिघे वाघाचीच चर्चा करत होते. इतक्यात नागोजी व हबीब तिथे पोहोचले. पाटलांचा निरोप सांगितला. निरोप मिळताच मुस्तफा व त्याचा बाप पाराकडे निघाले.
पारावर पोहचताच नामदेव पाटलांनी त्याचे स्वागत केले आणि गावावर आलेल्या संकटाची माहिती दिली. ’या संकटातून तूच आम्हाला सोडवू शकतो तेव्हा नाही म्हणू नको अशी विनवणी केली.’ मुस्तफा तयार झाला. मुस्तफाच्या आईला चिंता वाटत होती. मुस्तफा म्हणाला, आई तू काळजी करू नको, सीमेवर आम्ही शत्रूपासून देशाचे रक्षण करतो. इथे वाघापासून गावाचे रक्षण करण्याची संधी मिळत आहे. काही होणार नाही. काळजी करू नको. नागोजी आहे माझ्या सोबत.
दुसऱ्या दिवशी सलीम भाईच्या मळ्यात दहा वीस तरुणांनी चाचपणी केली. एका बाजूला ऊसाचा फड होता, दुसरीकडे बाजरी. शेजारी शिरपत धनगराचं ऊस. पायांच्या ठश्यांवरून वाघ इतक्यातच कुठेतरी दडून बसलाय हे त्यांच्या लक्षात आले.
धुऱ्यावर भलं मोठं चिंचेचं झाड होतं. ते झाड शिकारीसाठी निवडण्यात आलं. झाडावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली. झाडाखाली शेळी बांधण्यात आली. पौर्णिमेची रात्र, सगळीकडे लख्ख चांदणं पडलं होतं. नामदेवरावांची बंदूक घेऊन दिवस मावळण्याच्या आतच मुस्तफा आणि नागोजी चिंचेच्या झाडावर चढून बसले होते. हबीब, माधव, चिमाजी, सुभान, राघव असे वीस पंचवीस तरुण दूर अंतरावर दडून बसले. काही बरे वाईट झाले, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली की, या तरुणांनी मुस्तफा आणि नागोजीच्या मदतीला पोहोचायचे होते.
रात्र वाढत गेली. एकटी शेळी बांधली असल्याने ती सारखी में...में ... करत होती. तिचं ते ओरडणं शिकाऱ्यांसाठी मात्र लाभदायकच होते. अर्धी रात्र निघून गेली वाघाचा मात्र पत्ता नव्हता. तरुण पोरांना डुलकी लागत होती. वाघाच्या भीतीने ते दचकून उठत होते. कधी कधी एकमेकांनाच अरे ते वाघ दिसतोय का? असे म्हणून घाबरवत होते.
वाघ इकडे येणार नाही किंवा तो या भागात नाही, अशी सगळ्यांची खात्री पटत असतांनाच ऊसाच्या फडातून वाघ बाहेर आला. शेळीच्या दिशेने तो हळूहळू चालू लागला. लख्ख चांदण्याच्या प्रकाशात वाघ स्पष्ट दिसत होता. मुस्तफा तयार झाला. वाघ चिंचेच्या दिशेने चालत आला. चिंचेखाली वाघ येताच नागोजीची तारांबळ उडाली. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. एरवी बोलणं वेगळं आणि जिवंत वाघ समोर पाहणं वेगळं. घाबरल्याने थोडीशी हालचाल झाली. ती वाघाच्या लक्षात आली. शेळीवर झेप घेण्याच्या तयारीत असलेला वाघ एकदम थांबला आणि झाडावर दडून बसलेल्या नागोजी व मुस्तफाकडे पाहू लागला.
मुस्तफाने नेम धरला इतक्यात वाघाने जोरदार डरकाळी फोडली. त्याच्या आवाजाने आसमंत गरजला. जमीन हादरली. नागोजी घाबरला त्याचे हात निसटले आणि तो डहाळीवरून घसरला सुदैवाने त्याने फांदी घट्ट पकडली परंतु; तो वाघाच्या आवाक्यात होता. वाघाने त्याच्यावर झेप घेतली. तसे नागोजी ने पाय वर उचलले तरी वाघाचं नख त्याच्या पायाला लागला. फांदी हल्ल्याने मुस्तफाचा नेम चुकला. दुसऱ्यांदा नेम धरत असताना वाघ आणि नागोजी एका सरळ रेषेत येत होते. गोळी चुकून नगोजिला लागली तर..... काय करावे कळत नव्हते.
हे सर्व हबीब व त्याचे सहकारी मित्र दुरून पाहत होते. प्रसंगावधान साधून हबीबने आरडाओरडा करत चिंचेच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्याच्यामागे इतर तरुणही आरडाओरडा करत, पराती वाजवत धाऊ लागले. खरे तर हे धोकादायक होते. वाघ चाल करून त्यांच्या दिशेनेही आला असता, परंतु सुदैवाने त्यांचा गल्ला ऐकून वाघाने तिथून काढता पाय घेतला. चिंचेपासून थोडे पुढे जाताच मुस्तफाने गोळी झाडली. गोळीचा आवाज आला तशी वाघाने डरकाळी फोडली आणि चिंचेच्या दिशेने परत फिरला....
इतक्या वेळेपासून फांदीला लटकलेल्या नगोजीचे हात निसटले, तो खाली पडला. हबीब आणि त्याचे मित्र आरडाओरडा करत धावतच येत होते. त्यामुळे वाघ घाबरला आणि शिरपतीच्या शेताकडे फिरला मात्र थोड्या अंतरावर जाऊन खाली कोसळला. वाघाला गोळी लागली होती. सर्व तरुण पोरं नागोजी जवळ पोहचले होते. मुस्तफा झाडावरून खाली उतरला. सगळ्यांनी नगोजीला सावरले. त्याला बरीच जखम झाली होती. मुस्तफा बंदूक वाघावर ताणून हळूहळू त्याच्या दिशेने गेला. सर्वजण त्याच्या मागे होते. वाघ निपचित पडला होता. वाघ मेल्याची खात्री पटल्यावर मुस्तफाने सगळ्यांना जवळ बोलावले. तरुणांचा आरडाओरडा आणि गोळ्यांचा आवाज गावापर्यंत पोहचला होता. अर्धेअधिक गाव तिथे येऊन पोहोचले.
बैलगाडीत टाकून वाघाला गावात आणण्यात आले. सगळा गाव वाघ पाहण्यासाठी जमला होता. सगळ्यांनी मुस्तफा, नागोजी व त्यांना सहकार्य करणाऱ्या तरुणांचं कौतुक केलं.
- सय्यद झाकीर अली,
परभणी
Post a Comment