Halloween Costume ideas 2015

पर्यावरणाचा गळा घोटणारे प्लास्टिक प्रदूषण


पर्यावरण हा पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. पर्यावरण हे सर्व सजीव आणि निर्जीव घटकांपासून बनलेले आहे. प्राणी, पक्षी, झाडे, जंगले, समुद्र, पर्वत, हवा, खनिजे इत्यादी सर्व पर्यावरणाचा भाग आहेत. जीवसृष्टीसाठी पर्यावरण अनुकूल ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, परंतु पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान मानवच करतात. पर्यावरण संबंधी जागृतीसाठी दरवर्षी ५ जून रोजी "जागतिक पर्यावरण दिन" नवीन थीमसह जगभरात साजरा केला जातो. या वर्षी २०२३ ची थीम प्लास्टिक प्रदूषणावरील उपायांवर केंद्रित आहे. जगभरात प्लास्टिक प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. दरवर्षी ४० कोटी टनांहून अधिक प्लास्टिक तयार होते, त्यापैकी निम्मे फक्त एकदाच वापरले जाते. आज आपण मायक्रोप्लास्टिक्स खातो-पितो आणि प्राणवायु स्वरूपात प्लास्टिक मिसळलेल्या प्रदूषित हवेत श्वास घेतो, त्यामुळे दर ३० सेकंदाला एक मृत्यू होत आहे. वातावरणातील बदलांमध्ये प्लास्टिक प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल सातत्याने बिघडत असून, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक आपत्ती, रोगराई यांसारख्या समस्या वाढल्या आहेत, त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. प्लॅस्टिकमुळे जनावरे मारली जातात, माती प्रदूषित होते, प्लास्टिक पिशव्या नाल्यात अडकतात. प्लास्टिक प्रदूषणामुळे वंध्यत्व, लठ्ठपणा, मधुमेह, प्रोस्टेट किंवा स्तनाचा कर्करोग, थायरॉईड समस्या, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. टीअरफंडच्या नवीन संशोधनानुसार, जगभरातील विकसनशील देशांमध्ये प्लास्टिकच्या समस्येमुळे दरवर्षी ४ ते १० लाख लोकांचा मृत्यू होत आहे.

प्लास्टिक प्रदूषणामुळे सागरी जीवन नष्ट :- पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि एकूण पाण्यापैकी ९७% समुद्रात आहे. मानवी क्रियाकलापांमुळे सागरी प्रदूषण पर्यावरणासाठी घातक ठरला आहे. दर मिनिटाला दोन मोठे ट्रक एवढा प्लास्टिकचा कचरा समुद्रात टाकला जातो. युनोमिया २०१६ नुसार, दरवर्षी १.२ कोटी टन प्लास्टिक समुद्रात टाकले जाते आणि २०४० पर्यंत दरवर्षी २.९ कोटी मेट्रिक टन प्लास्टिक कचरा महासागरात जाण्याची शक्यता आहे. जगातील जवळजवळ सर्व जलप्रणालींमध्ये विविध स्वरूपात मायक्रोप्लास्टिक्स आहेत. मारियाना ट्रेंच च्या ठिकाणी ३६००० फूट खोलवर सुद्धा प्लास्टिक सापडले आहे. आईयूसीएन २०२० नुसार, ८०% सागरी मलबा फक्त प्लास्टिकचा कचरा आहे. २०२५ पर्यंत, महासागरांमध्ये माशांपेक्षा एक तृतीयांश अधिक प्लास्टिक असेल आणि २०५० पर्यंत महासागरांमध्ये माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असेल. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टिकमुळे दरवर्षी अंदाजे १ दशलक्ष समुद्री पक्षी आणि १ लक्ष सागरी प्राणी मारले जातात आणि शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा दर असाच चालू राहिला तर २०५० पर्यंत जगातील ९९% समुद्री पक्ष्यांच्या प्रजाती प्लास्टिक खात असतील. प्लॅस्टिकमुळे कोरल रीफवर रोग होण्याची शक्यता २२ पटीने वाढते.

सागरी जीवांमध्ये प्लॅस्टिक विषबाधा अन्नसाखळी संपवायला गती देत आहे, ज्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. 

प्लास्टिक खातो, पितो आणि प्लास्टिकच्या हवेत श्वास घेतो :- आता पकडलेल्या तीनपैकी एका माशामध्ये प्लास्टिक असते. अन्नसाखळीच्या पायथ्याशी असलेले अनेक प्राणी मायक्रोप्लास्टिक खातात, मग इतर जीव त्यांना खातात, मानवही त्या जीवांना खातात. शास्त्रज्ञांना ११४ समुद्री प्रजातींमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडले आहे आणि यापैकी सुमारे एक तृतीयांश प्रजाती मानवांच्या खाण्यातील आहेत. प्लास्टिक तुटून शेत जमिनीत मायक्रोप्लास्टिक्स म्हणून दबून असते. लँडफिलमध्ये खोलवर गडलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यातून हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात जे जमिनीच्या पाण्यात पसरू शकते. लँडफिल्समध्ये २ दशलक्ष टनांहून अधिक पाण्याच्या बाटल्यांचा ढीग आहे. प्लास्टिक नकळत आपल्या प्लेटमध्ये येतात, निष्कर्ष असे सूचित करतात की आपण दरवर्षी हजारो प्लास्टिकचे कण गिळतो. प्लास्टिकमध्ये असणारे अन्नपदार्थ, कॅन केलेला खाद्यपदार्थ यातूनही प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करू शकते. आपण बाटलीबंद पाण्यातून मायक्रोप्लास्टिक पितो, जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ मध्ये धक्कादायक संशोधन प्रकाशित केले, ज्यात ९०% बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक उपस्थिती उघड केली, चाचणी केलेल्या २५९ बाटलीबंद पाण्यापैकी फक्त १७ बाटलीबंद पाणी प्लास्टिकमुक्त होते. निकृष्ट कचरा व्यवस्थापनामुळे मोकळ्या हवेत कचरा जाळल्याने लोक प्रदूषित हवेत श्वास घेतात. मार्च २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की जागतिक स्तरावर ५ अब्ज लोक कचरा संकलन किंवा कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता जगतात, परिणामी, दरवर्षी सुमारे ९ दशलक्ष लोक मरतात. १ टन प्लास्टिकच्या उत्पादनातून २.५ टन कार्बन डायऑक्साइड तयार होतो. आपण कपड्यांमधून देखील प्लास्टिक शोषतो, ग्लोबल अपेरल फायबर कंझम्पशनच्या संशोधनानुसार, एका वर्षात जगभरात वापरल्या जाणाऱ्या १००,००० किलो फायबरपैकी ७०% सिंथेटिक असतात.

प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही :- आजवर तयार झालेला प्रत्येक प्लास्टिकचा तुकडा आताही वातावरणात आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ ऑस्ट्रेलिया (वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड) नुसार, प्लास्टिक उत्पादने पूर्णपणे नष्ट होण्यास बराच काळ लागतो, हे त्यांच्या बनावट आणि गुणवत्तेवर अवलंबून असते जसे - प्लास्टिक पिशवी नष्ट होण्यासाठी किमान २० वर्षे, कॉफी कप ३० वर्षे, प्लॅस्टिक स्ट्रॉ २०० वर्षे, प्लास्टिकच्या बाटल्या ४५० वर्षे, प्लास्टिक कप ४५० वर्षे, डिस्पोजेबल डायपर ५०० वर्षे आणि प्लास्टिकचे टूथब्रश सामान्यतः ५०० वर्षे खंडित होण्यास लागतात. अमेरिकन दररोज ५०० दशलक्ष प्लास्टिक स्ट्रॉ वापरतात. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, १९५० पासून ८.३ अब्ज टन प्लास्टिक तयार केले गेले आहे. जगभरात दर मिनिटाला १ दशलक्ष एकल-वापराच्या प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतल्या जातात आणि दरवर्षी १२०० अब्ज पेक्षा जास्त प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या जातात. पॉलीस्टीरिन वातावरणात दहा लाख वर्षांहून अधिक काळ टिकून राहू शकते.

भारतातील प्लॅस्टिक कचऱ्याची वस्तुस्थिती :- द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट २०१८ नुसार, देशात एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी केवळ ६०% पुनर्वापर होत आहे. भारतात उत्पादित प्लास्टिकपैकी ४३% उत्पादन पॅकेजिंगसाठी वापरले जाते आणि प्लास्टिकचा सरासरी दरडोई वापर सुमारे ११ किलो आहे. सीपीसीबीच्या अहवालानुसार, एकूण घनकचऱ्यामध्ये प्लास्टिकचा वाटा ८% आहे. प्लॅस्टिकचे सर्वाधिक उत्पादन दिल्लीत होते, त्यानंतर कोलकाता आणि अहमदाबादचा क्रमांक लागतो. समुद्रकिनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यातून तांबे, जस्त, शिसे आणि कॅडमियम यांसारख्या विषारी जड धातूंच्या मोठ्या प्रमाणामुळे किनारपट्टीवरील परिसंस्थांवर विपरीत परिणाम होतो. 

प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी उत्कृष्ट उपक्रम :- प्रत्येक टन प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केल्याने अंदाजे ३.८ बॅरल पेट्रोलियमची बचत होते. देशातील चेन्नईमधील जांबुलिंगम स्ट्रीट २००२ मध्ये बांधण्यात आलेल्या भारतातील पहिल्या प्लास्टिकच्या रस्त्यांपैकी एक होता. २०१५-१६ मध्ये, राष्ट्रीय ग्रामीण रस्ते विकास संस्थेने प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून सुमारे ७५०० किमीचे रस्ते बांधले. सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळाने ऑगस्ट २०१९ पासून त्याच्या सर्व सवलतींमध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर बंदी घातली.  प्लास्टिक कचरा जाळणे आणि प्लास्टिकचा वापर विशेषतः गरम अन्न पदार्थांत पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे, कारण प्लास्टिक जळल्यावर किंवा तापल्यावर विषारी पदार्थ सोडते. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कडक कायदे बनवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये पर्यायी पॅकेजिंगचा वापर करावा. नवीन उत्पादनांमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करणे. वनस्पती तेल, कॉर्न, गहू, सोया, बटाटे, साखर बीट, ऊस यांसारख्या अक्षय वनस्पती स्रोतांपासून जैव-आधारित प्लास्टिक विकसित करणे, म्हणजे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक. प्लास्टिकच्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी विषारी नसलेली सुरक्षित रसायने विकसित करणे. कंपनी आणि लोकांनीही जागरूकता दाखवून सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या स्तरावर प्लास्टिकचा वापर कमी करून त्याचे उच्चाटन केले पाहिजे. पर्यावरण वाचवायचे असेल तर प्लास्टिक उत्पादनांवरचे अवलंबित्व कमी करावे लागेल. पर्यावरणाचे रक्षण हे आपल्या जीवनाचे रक्षण आहे.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget