पुण्याच्या हमरस्त्यावरुन एक बग्गी वेगाने निघाली होती. उमद्या, घोड्याचे पाय डौलात पडत होते. त्याच्या पायाचा टॉपऽऽऽ टॉपऽऽऽ असा आवाज आसमंतात पसरत होता, पादचारी माना वळवून वळवून पाहत होते. कोचमनचा लहरी फेटा वाऱ्याने उडत होता. बग्गी गायकवाड वाड्यापुढे उभी राहिली. मागे उभे राहिलेला हुजऱ्या बग्गीतून पटकन खाली उतरला. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आल्याची वर्दी दिवाणखान्यात बसलेल्या लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचली.
“कोण? छत्रपती शाहू महाराज?”
असे नवलयुक्त उद्गार काढीतच लोकमान्य टिळक चटकन खुर्चीतून उठले, अंगात अंगरखा चढवितच लगबगीने खाली उतरले. बग्गीजवळ येऊन त्यांनी अदबीने राजर्षी शाहू महाराजांना नमस्कार केला.
राजर्षी शाहू महाराजांनी थेट मुद्द्यांलाच हात घातला... “अहो, ते तुम्ही तुरुंगात काहीसे लिहिले आहे ना?”
शाहू महाराजांनी टिळकांना विचारले, तेंव्हा टिळकांनी उत्तर दिले, “हो...! मी श्रीमद्भगवतगीतेवर पुस्तक लिहिले आहे!".
"हो, हो, द्या बरं मला वाचायला जरा!” राजर्षी म्हणाले.
टिळक पटकन माडीवर गेले. कपाट उघडून त्यांनी गीतारहस्यच्या हस्तलिखिताची बाडे छत्रपतींच्या हाती दिलीत.
"बरं आहे, येतो आम्ही!"
लिखिताची बाडे घेऊन राजर्षी शाहू छत्रपती बग्गीतून निघून गेले. गायकवाड वाड्यात शांतता पसरली. दिवाणखान्यातील मंडळी गंभीर होऊन म्हणाली,
"हे काय केले तुम्ही? आता पुन्हा मिळेल तरी का हे हस्तलिखित? मगरीने माणिक गिळले म्हणायचे."
पण लोकमान्य टिळक शांत होते. सुपारीचे खांड तोंडात टाकत ते म्हणाले,
"स्वतः कोल्हापूरचे छत्रपती आपल्याकडे गीतारहस्य मागावयास आले. मी ते दिले नसते तर छत्रपतींच्या गादीचा तो अवमान केल्यासारखे आहे, ते मी कधीच करणार नाही. छत्रपती व आमचे काही मतभेद असतील, पण छत्रपती मला प्रिय आहेत. त्यांचा शब्द मला शिरसावंद्य आहे."
"ते सारे ठीक आहे, पण गीतारहस्य मात्र गेले!”
कुणीतरी निराशा व्यक्त केली. त्यावर लोकमान्य टिळक म्हणाले,
“वाचून झाले की चार-दोन आठवडयात वह्या परत करतो असे महाराज म्हणाले आहेत. हा छत्रपतींचा शब्द आहे ते तो पाळतीलच, माझी तशी बालंबाल खात्री आहे,"
तेच खरे झाले. छत्रपती शाहूंनी ब्रिटिश गव्हर्नरकडून गीतारहस्य पास करून घेतले व ठरलेल्या मुदतीत लोकमान्यांकडे पोहोच केले. परस्परांवर विश्वास टाकणारे व शब्दाला जागणारे हे दोघेही थोर पुरुष खरंच महान होते.
पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून संबोधले जाते. तसेच ते पूर्वीपासून सामाजिक व राजकीय चळवळीचे प्रमुख आगर म्हणूनही गणले जात आहे. बहुजन समाजाच्या चळवळीचे केंद्र पुण्यात ठेवले पाहिजे, हे राजर्षींनी तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीचा वेध घेऊन मनोमन ठरविले होते. त्यासाठी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील बाहुलीच्या हौदाजवळ असलेल्या 'मराठा सोशल क्लब' च्या मंडळींची भेट घेतली होती.
क्लबचे पहिले अध्यक्ष होते डॉ. पांडुरंग चिमणाजी पाटील (पी. सी. पाटील) या क्लबमध्ये लक्ष्मणराव ठोसर, बाबूराव जेधे, बाबूराव जगताप, गोपाळराव नाईक (ॲडव्होकेट), गोविंदराव साळवी (वकील), रावसाहेब ठुबे, श्रीपतराव शिंदे (विजयी मराठाकार), विठ्ठलराव कराळे, सावंत व राणे आदी फौजदारकीची परीक्षा पास झालेल्या कोल्हापूरच्या तरुणांचा समावेश होता. यांना राजर्षी शाहूंची मदत होती.
एकदा शाहू महाराज पुण्यास आले असता त्यांना डॉ. पां. चि. पाटील यांनी पुण्यास मराठा तरुणांनी चालविलेल्या संस्थांची साद्यंत माहिती दिली. महाराजांना आनंद झाला, डॉ.पां.चि.पाटील मंडळींना तत्काळ २५ हजारांची देणगी दिली. त्या काळात एवढी रक्कम फार मोठी होती. महाराजांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे व आर्थिक सहाय्यामुळे १९१८ साली पुण्यासारख्या शहरात ‘श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी' या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. शुक्रवार पेठेत बाबूराव जगताप यांच्या जागेत सुरू केलेल्या लहानशा रोपट्याचे शिवाजी एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थेस वटवृक्षाचे रूप प्राप्त झाले. या सोसायटीचे अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती व सेक्रेटरी देवासचे खासेसाहेब सयाजीराव गायकवाड महाराज होते, हे नमूद करणे आवश्यक आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे लोकशिक्षणाचे कार्य असामान्य व अलौकिक होते. ते केवळ कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित नव्हते. कोल्हापूर बाहेरसुद्धा त्यांनी भरीव शैक्षणिक व सामाजिक कार्याचा व्याप वाढविला होता. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते पदसिद्ध अध्यक्ष होते. या संस्थेला त्यांनी भरपूर आर्थिक मदत केली. डेक्कन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ३० हजार रुपयांची मदत केली. बनारस हिंदू विश्वविद्यालयाला एक लाख रुपयांची देणगी दिली. पुढे त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांच्या प्रमाणेच प्रतिवर्षी भरीव देणगी देण्याची परंपरा चालू ठेवली. 'शाहू बोर्डिंग' असे या वसतिगृहाचे नामकरणही करण्यात आले.
नाशिकचे श्री उदाजी मराठा बोर्डिंग, बंजारी समाजाचे बोर्डिंग व सोमवंशीय समाजाचे बोर्डिंग आदी संस्थांना राजर्षींनी सढळ हाताने मदत केली. खुद्द पुणे शहरामध्ये श्री शिवाजी मराठा सोसायटी, ताराबाई मराठा बोर्डिंग यासह अनेक संस्थांना राजर्षीनी आर्थिक सहाय्य पोहोचविल्याचे दिसून येते.
तसेच महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या नावाने एखादी लष्करी शिक्षण देणारी शाळा असावी हा हेतू मनात ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या निमित्ताने त्यांनी इंग्लंडच्या युवराजाला पुण्यात आणले. त्यांच्या हस्ते पुतळ्याची कोनशिला बसविली. त्याचे दृष्यरूप म्हणजे पुण्याचे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल होय. तसेच नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एन.डी.ए.) पुण्यात सुरू झाली. त्यामागे सुद्धा राजर्षीची प्रेरणाच आहे.पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाते, त्यामागे राजर्षींनी केलेला शिक्षणाचा प्रसार ही अधोरेखित होतो.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Post a Comment