Halloween Costume ideas 2015

वृद्धांवरील वाढती गैरवर्तन ही संस्कृतीहीन समाजाची ओळख


आजच्या आधुनिक युगात समाज झपाट्याने बदलत आहे, लोक मोठ्या कुटुंबातून लहान कुटुंबात विभागले जात आहेत. तरुण पिढीला त्यांच्या आधुनिक विचारसरणीचा अभिमान वाटतो, त्यांना वेगळे राहायला आवडते, लोकांना त्यांची वैयक्तिक स्वतंत्र जागा हवी असते. उच्च शिक्षणासाठी, कामासाठी, करियर घडविण्यासाठी बाहेर जायचे आहे. आजकाल, माणूस मोठा झाल्यानंतर,आपला भूतकाळ, वर्तमान विसरून जातो आणि आपल्या भविष्यासाठी जगणे पसंत करतो, म्हणजेच आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेला त्याग, समर्पण, संघर्ष आणि कार्य विसरून तो माणूस फक्त स्वतःच्या आणि मुलांच्या भविष्याचा विचार करू लागला आहे. पण ज्या वृद्ध आई-वडिलांमुळे तो इतका जबाबदार बनला आहे, त्यांनाच तो विसरत चालला आहे, मग अशा परिस्थितीत तो घरातील मोठ्यांची जबाबदारी कोणावर टाकतो आहे. वृद्धांवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जागरूकता म्हणून दरवर्षी १५ जून रोजी “जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन” साजरा केला जातो. या वर्षी २०२३ ची थीम आहे "वर्तुळ बंद करणे: वृद्धत्व धोरणात लिंग-आधारित हिंसा, कायदे आणि पुराव्यावर आधारित प्रतिसादांना संबोधित करणे" हे आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ६० आणि त्याहून अधिक वयाच्या ६ पैकी १ व्यक्तीने गैरवर्तन अनुभवले आहे. दीर्घकालीन काळजी सुविधांसारख्या संस्थांमधील वृद्ध लोकांमध्ये अत्याचाराचे प्रमाण जास्त असते. कोरोना महामारीच्या काळात वृद्धांसोबत गैरवर्तन होण्याचे प्रमाण वाढले. वृद्ध लोकांच्या गैरवर्तनामुळे गंभीर शारीरिक दुखापत होऊ शकते आणि दीर्घकालीन मानसिक परिणाम होऊ शकतात. वृद्धांवर गैरवापर वाढण्याचा अंदाज आहे कारण अनेक देश वेगाने वृद्ध लोकसंख्येचा सामना करीत आहेत.  ६० आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची जागतिक लोकसंख्या २०१५ मध्ये ९०० दशलक्ष वरून २०५० मध्ये अंदाजे २००० दशलक्ष होईल. हेल्पएज इंडियाच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ८२% वृद्ध त्यांच्या कुटुंबासोबत राहतात, परंतु त्यांना अनेकदा शाब्दिक अत्याचार, दुर्लक्ष आणि शारीरिक हिंसाचार सहन करावा लागतो. सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की ३५% वृद्धांना त्यांच्या मुलांकडून अत्याचाराचा सामना करावा लागला आणि २१% वृद्ध लोकांनी त्यांच्या सूनांकडून गैरवर्तन सहन केले. एजवेल फाऊंडेशनने या विषयावर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की ७३% वृद्ध लोकांनी लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या घरात विविध प्रकारचे अत्याचार सहन केले.

वृद्धांच्या वाढत्या अत्याचाराला आधुनिक जीवनशैली आणि संस्कारहीन समाज जबाबदार आहे. आपले विचार आधुनिक असले पाहिजेत, आपली संस्कृती नाही. मोठी माणसे लहान मुलांसमोर वृद्धांशी गैरवर्तन करतात, मग मोठ्यांची नक्कल करत ती मुलं आई-वडिलांशी गैरवर्तन करतात आणि हे चक्र असेच चालू असते. समाजात चांगुलपणा दाखवणारी मोठी माणसेही घरातील वडीलधाऱ्यांशी गैरवर्तन करताना दिसतात. या वयात ज्येष्ठांना त्यांच्या प्रियजनांच्या पाठिंब्याची सर्वात जास्त गरज असते आणि हीच वेळ आहे आपण त्यांचा खंबीर आधार बनून त्यांच्यासोबत राहण्याची. आधी आई-वडील मुलांना वाढवतात, मग मुलं मोठी होऊन त्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करतात, हा आपल्या संस्कृतीचा आणि जीवनाचा नियम आहे. आई-वडिलांना मुलांबद्दल जशी आपुलकी असते तशीच आपुलकी आपल्या वृद्ध आई-वडिलांबद्दल आपली असली पाहिजे. आपली वेळ आणि फायदा निघाल्यावर स्वतःच्या लोकांसोबतचे आपले वागणे बदलणे माणुसकीचे वर्तन नव्हे. पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या प्रिय व्यक्ती किंवा मुलांवर आंधळे प्रेम करू नये, अन्यथा ते तुम्हाला अडचणीत आणू शकते. मुलांचे भविष्य घडवण्यात इतके मग्न होऊ नका की, स्वतःचे भविष्य पणाला लावावे लागेल, म्हणजेच वेळ, काळ आणि परिस्थिती लक्षात घेऊन जीवनातील निर्णय घ्या. कारण अनेक वेळा असे घडते की, मुलांच्या भल्यासाठी आई-वडील स्वत:चा नाश करून सुद्धा मुलांचे आयुष्य सावरतात आणि पुढच्याच क्षणी तीच मुलं आपल्या आई-वडिलांना घरापासून वेगळं करून वृद्धाश्रमात पाठवतात.

वृद्धांना अशी वागणूक सतत वाढत आहे, त्यामुळे आता समाजात वृद्धाश्रमांची संख्याही खूप वाढत आहे. वयोवृद्ध व्यक्ती ही घराची शान असते, त्यांना घरात सर्वात जास्त मान दिला पाहिजे. वृद्ध माणसे कुटुंबाची काळजी घेतात, ज्या घरात वृद्ध नसतात, त्या घरातील परंपरा, संस्कृती, प्रतिष्ठा, नातेसंबंध, पिढ्यानपिढ्या निर्माण झालेल्या ओळखी विखुरल्या जातात. वृद्ध आई-वडिलधाऱ्यांचा गैरवर्तन थांबलाच पाहिजे. जे लोक गैरवर्तन करतात ते सुद्धा काही वर्षात म्हातारे झाल्यावर या टप्प्यातून जातीलच आणि आपले येणारे भविष्य कसे असेल हे कोणीही सांगू शकत नाही. वृद्धांप्रती आपुलकी आणि आत्मीयता ठेवा, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची काळजी घ्या. जीवनात इतरांनी आपल्याशी जसे वागावे अशी आपली अपेक्षा असते तशीच आपण इतरांशीही वागले पाहिजे. वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वस्वी मुलांची, कुटुंबाची असते.

वयोवृद्धांशी गैरवर्तन झाल्यास, तात्काळ मदतीसाठी एल्डर लाइन १४५६७ टोल-फ्री नंबरवर कॉल करा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्थापन केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी ही राष्ट्रीय हेल्पलाइन आहे. हा नंबर सकाळी ८:०० ते रात्री ८:०० पर्यंत उपलब्ध असतो, जे मोफत माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार, गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप, बेघर वृद्धांना बचाव, काळजी, सहानुभूती, प्रोत्साहन आणि पुनर्मिलन प्रदान करते. आपण हेल्पएज इंडियाच्या हेल्पलाइन नंबर १८००-१८०-१२५३ वर देखील कॉल करू शकता आणि त्यांचा अधिकृत क्रमांक ०११-४१६८८९५५/५६ आहे. आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा वृद्धांशी गैरवर्तन पाहतो, पण सगळे कळूनही आपण गप्प बसतो. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, कृपया जागरूक रहा, मदत करा, आपली नैतिक मूल्ये, संस्कारांना आणि आपल्या आई-वडिलांचा ऋण कधीही विसरू नका, माणूस बना आणि माणुसकीने जगा.

- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget