Halloween Costume ideas 2015

पावसाचे पाणी अडविणे व जिरवणे गरजेचे


यंदाचा पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा आला की, अनेक समस्या व प्रश्न निर्माण होतात. प्रतिवर्षी राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पाण्याची टंचाई हा नेहमीचा प्रश्न आहे. पाणीटंचाईमुळे खेडोपाड्यात, वाड्यावस्त्यांत तसेच काही प्रमाणात शहरात राहणाऱ्या जनसामान्यांचे अतोनात हाल होतात. पिण्याच्या पाण्यासाठी आजही सर्वसामान्य जनतेला पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी काही गावांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे पहायला मिळते. हे हाल व संघर्ष टाळायचा असेल तर पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी मायबाप सरकारने व आमजनतेने हातात हात घालून सांघिक स्वरूपात सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज आहे.

आज निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण बेभरवशाचे झाले आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. भविष्यात पाण्याचे संकट टाळण्यासाठी व पृथ्वीचे वाढते तापमान नियंत्रित करण्यासाठी अर्थात ग्लोबल वार्मींग सारख्या जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी शिवाय पिकांच्या वाढीसाठी व सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत ठिकठिकाणी जिरवण्याची नितांत गरज आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत आहे. त्यासाठी कोरड्या विहिरी, नद्या, कालवे, व धरणे यांच्यासाठी पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. उद्याचे भविष्य अबाधित राखण्यासाठी मायबाप सरकारने जनतेला घेऊन सांघिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

ग्रामीण व शहरी भागातील जनतेचे पाण्याचे‌ महत्त्व व आवश्यकता याविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आजच जागरूक व दक्ष राहणे आवश्यक आहे, तरच उद्या निर्माण होणारे पाण्याचे संकट टाळणे शक्य होणार आहे.

लहानमोठ्या वृक्षांची प्रचंड प्रमाणात होत असलेली कत्तल, नदीपात्रातील प्रचंड प्रमाणात होत असलेला वाळूउपसा, दगडांसाठी खाणीतील मोठ्या प्रमाणातील खोदकाम, डोंगर व टेकड्यांचे सपाटीकरण, ग्लोबल वार्मींग सारखा दिवसेंदिवस वाढत जाणारी जागतिक समस्या, अर्थात दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान व ऋतुबदल या सर्व गोष्टी पाण्याच्या दुर्भिक्ष व टंचाई साठी कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याचा थेंब नि थेंब जमिनीत जिरवणे आवश्यक तर आहेच, शिवाय सांघिक प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.

शेतातील पावसाचे पाणी शेतातच जिरवणे आवश्यक:

चार महिन्यांच्या पावसाळी मोसमात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब नि थेंब प्रत्येकाने आपापल्या शेतात, वावरात जिरवा, अशी प्रत्येक शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतात चर खोदून तयार ठेवावे, पक्के बांध बांधून घ्यावेत, व पावसाचे पाणी आपल्या शेतात कसे जिरेल यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत.

माळरानावर, गायरानात व सरकारी पडिक जमीनीत पावसाचे पाणी जिरवा:

माळरानावर, गायरानात व सरकारी पडिक जमीनीत तसेच गावठाण क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी शेतकरी बांधवांनी अडवण्यासाठी व जिरवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करणे शक्य आहे ते ते करावे. या क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा पुरेपूर वापर करण्यासाठी हे पाणी आपल्या शेतात कसे वळविले जाईल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ओढ्याचे पाणी जिरवा:

पावसाळ्यात ओढे नाले पुर्णपणे भरुन ओसंडून वाहत असतात. गावातील व कृषी क्षेत्रातील छोट्या नद्या, ओढे, नाले यावर बांध टाकून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरवणे नितांत गरजेचे आहे. कोल्हापूर पध्दतीचे बंधारे याकरिता राज्यात चांगले उदाहरण आहे.

पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे:

पावसाच्या पाण्याचे विविध मार्गांनी पुनर्भरण करणे शक्य आहे, ओढ्याचे पाणी विहिरीत सोडता येते. छतावरचे पावसाचे पाणी हापशात सोडणे, इतरत्र पडत असलेले पावसाचे पाणी सिमेंटच्या टाक्या बांधून त्यात साठवून त्याचा वापर आवश्यकता पाहून करता येतो. विशेष म्हणजे साठवण केलेले व झाकून ठेवलेले पाणी कधीही दूषित होत नाही.

वृक्ष लावून त्याचं संरक्षण व संवर्धन करा:

जमिनीची व शेतातील मातीची धूप थांबविण्यासाठी शिवाय पाऊस मुबलक प्रमाणात पडण्यासाठी जागोजागी वृक्ष लावून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षांच्या पानांमध्ये जलाकर्षण शक्ती असते, हे सर्व लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे.

‌निसर्ग भरभरून देत असतो, निसर्गाच्या कृपेने मिळणारे पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते ते वैयक्तिक व सांघिक स्वरूपात प्रामाणिकपणे व जबाबदारीने पाणी अडविणे व जमिनीत जिरवणे ही कृती केल्यास भूजल पातळीत कमालीची वाढ होईल,यात शंका नाही, तथापि पाण्याचे दुर्भिक्ष व टंचाई दूर होण्यासाठी मोठा हातभार लागेल.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget