हजरत मआविया (र.) आणि रोमन राष्ट्रांमध्ये युद्धबंदीचा तह झाला होता. ह. मआविया (र.) याच कराराच्या काळात आपले सैन्य घेऊन रोमन राज्याविरुद्ध निघाले. म्हणजे युद्धबंदीच्या कराराची मुदत संपताच आक्रमण करावे. ह. मआविया (र.) प्रवासात असताना एक व्यक्ती घोड्यावर स्वार होऊन "अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर"च्या घोषणा देत त्यांच्याकडे आली. ह. मआविया (र.) यांनी कारण विचारल्यावर तो म्हणाला की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे की जर एखाद्या राष्ट्राशी तुमची शस्त्रसंधी झाली असेल तर मुदत संपेपर्यंत त्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नका. केलेल्या करारात बदल करू नका. नंतर पुन्हा करार करा किंवा आधीचा संपुष्टात आणा.
त्या माणसाचे हे म्हणणे ऐकल्यावर ह. मआविया (र.) आपले सैन्य घेऊन माघारी फिरले. (मलीम बिन अमिर, अबु दाऊद)
ह. उम्मे सलमा (र.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) घरी होते. त्यांनी आपल्या सेविकेला हाक मारली. तिने यायला उशिर केला. ह. उम्मे सलमा (र.) यांनी त्या सेविकेला खेळताना पाहिले होते. त्या वेळी प्रेषितांच्या हातात मिसवाक (दातून) होते. प्रेषित (स.) त्या सेविकेला म्हणाले की जर मला कयामतच्या दिवशी जाब देण्याची भीती नसती तर मी या मिसवाकने तुला मारले असते. (अल. अदबुल मुफर्रद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की सत्ता अधाकारांची इच्छा बाळगू नका. जर तुम्ही मागून ते मिळवलं तर तुम्हाला त्याच्याच हवाली केले जाईल. पण जर इच्छा नसताना न मागता कोणती जबाबदारी मिळाली तर मग अल्लाह त्यचाची पूर्तता करण्यास मार्ग काढेल. (बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
ह. अबु हुरैरा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की ज्याने न्यायदानाची जबाबदारी मागून घेतली आणि मग न्याय करताना त्याचा न्याय अन्यायावर भारी पडला असेल तर अशी व्यक्ती स्वर्गात जाईल, पण जर त्याचा अन्याय न्यायावर भारी पडला असेल तर ती व्यक्ती नरकात जाईल. (अबु दाऊद, मिश्कात)
ह. अबु हुरैरा (र.) म्हणतात की जेव्हा एखाद्या कर्जबाजारी व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंतिम विधीसाठी प्रेषित (मुहम्मद (स.) यांच्याकडे आणले जात असे. तेव्हा प्रेषित लोकांना विचारत असत की मयत माणसाने कर्जाच्या परतफेडीसाठी कोणती मालमत्ता मागे सोडली आहे का? पण नंतर जेव्हा प्रेषितांकडे धनसंपत्ती एकवटली त्या वेळी त्यांनी एकदा उपदेश देत असे म्हटले की मी मुस्लिमांशी त्यांच्या प्राणांपेक्षाही अधिक जवळचा आहे. म्हणून जर कोणाही मुस्लिमाने आपल्या मागे काही कर्ज बाकी सोडले असेल तर त्याची परतफेड ही माझी जबाबदारी आहे. (बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, एक काळ असा येईल जेव्हा लोक एकमेकांना जेवणाचे आमंत्रण देतात तसेच इतर समूह तुमच्यावर तुटून पडतील.
एका माणसाने विचारले की म्हणजे आमची संख्या इतकी कमी होईल?
प्रेषितांनी उत्तर दिले की, नाही. त्या काळी तुमची संख्या भलीमोठी असेल. पण शत्रूच्या मनावरील तुमची धाक संपून जाईल. तुमच्यात शक्ती नसेल.
लोकांनी विचारले की कशामुळे आम्ही दुर्बल होऊ?
प्रेषितांनी उत्तर दिले की तुमच्यात दुनियेचे प्रेम घर करेल आणि मृत्यूची भीती वाटेल. (ह. सौदागर)
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment