Halloween Costume ideas 2015

काले धन की गुलाबी कहानी


दोन हजारच्या नोटा बंद होणार नाही, पण चलनात राहणार नाहीत. पूर्वीच्या नोटांबदीसारखे त्या बाद होणार नाहीत, पण व्यवहारात राहणार नाहीत. म्हणून लोकांनी त्या बँकांमध्ये जमा कराव्यात अर्थातच ज्यांच्याकडे त्या असतील त्यांनी. आणि यामागचे खरे उद्दिष्ट काय हे सरकारने उघडपणे जाहीर केले नसले तरी नागरिकांनी स्वतःच अंदाज लावलेला आहे की पुन्हा ब्लॅक मनी (काळे धन) बाहेर काढण्यासाठी. कारण अर्थव्यवस्थेत बँकांना उद्देशून सरकार काही पावले उचलत असते. त्याचे लक्ष्य काळे धन बाहेर काढण्याचेच असते, अशी नागरिकांची समज झाली आहे की केली गेली आहे.

काळे धन बाहेर काढण्याचा अर्थ काही वर्षांपूर्वी असे सांगण्यात आले होते की प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. तेव्हापासून लोक सरकारने कोणतेही पाऊल उचलले की असे समजतात हे त्या १५ लाखांच्याच दिशेने असेल. पण पंधरा लाखाच्या मोहात अडकवून या सरकारने आजपर्यंत त्यांच्याच खात्यातून किती लाख काढून घेतले हे त्यांना कळलेसुद्धा नाही. ११ लाख कोटींच्या जवळपास सरकारने याच काळे धन बाळगणाऱ्यांना देऊन टाकले. त्यांचे बँकांकडून घेतलेले कर्ज माफ करून. यापूर्वीची ५०० आणि एक हजारच्या नोटाबंदीमागचे बरेच उद्दिष्ट सांगण्यात आले होते. शेवटी ते कितपत साध्य झाले हे सर्वांना माहीत आहे. त्या नोटाबंदीचा अर्थ आता समजला. त्या वेळी १००० रु.च्या नोटा बंद २००० रु.च्या नोटा काढण्यात आल्या जेणेकरून ब्लॅकमनीचा साठा करणाऱ्यांची सोय झाली. आता त्या २००० च्या नोटा बाहेर काढायच्या आहेत. त्यासाठी कुठे हिशोब द्यायलाच नको. चोरीचा आरोप नको म्हणून आता या नोटा बदलून घ्या. कोणतीही माहिती विचारली जाणार नाही. एक व्यक्ती कितीही नोटा बदलू शकतो. कसलीही मर्यादा नाही. गेल्या वेळेस तरी कोणती अडचण काळा बाजार करणाऱ्यांना आली होती. सामान्यांसाठी मर्यादा होती, धनदांडगे बँक बंद झाल्यावर खोकेचे खोके घेऊन बँकेत बाहेरून दरवाजा बंद करून नोटा बदलून घेत होते. आता तर पूर्णच मुभा. कितीही आणि कुणीही आणा. गुलाबी नोटांवरचा रंग बदलून घ्या, एवढेच.  बाकी काही नाही. या गुलाबी नोटांचेही भाग्य विलक्षणच. एकदा बँकांतून निघाल्या की काळ्या धनदांडग्यांच्या तिजोरीत घर करून बसल्या. बाहेरचे जग, जगाचे कष्ट, कष्टाचे चटके त्यांना माहीतच नाहीत. आता पुन्हा त्या परत बँकेत जातील. आणि जीवंत राहतील. सरकारचेच म्हणणे आहे. फक्त व्यवहारातून बाहेर करायचे आहे. बाद करायच्या नाहीत. म्हणजे सासरवाडीतून पुन्हा माहेरी. 

दोन हजाराच्या नोटा फार तर लहान सहान कारखानदार-व्यापाऱ्यांकडे असतील. १०-५ सामान्यजणांकडे नाहीच नाही. बाकी सगळ्या नोटा धनवानांकडे आहेत. गेल्या नोटाबंदीचा फटका जसा गोरगरीब मध्यमवर्गाला बसला होता, तसा याचा फटका गरीबांना नाही पण मध्यमवर्गाला बसणार. एक वेळ अशी येईल की भारतात गरीब आणि श्रीमंत दोनच वर्ग शिल्लक राहतील. याचा अर्थ मध्यमवर्ग श्रीमंत वर्गात विलीन होईल असे नाही तर मध्यमवर्ग गरीब होत होत गरीबवर्गात विलीन होईल. पुन्हा नोटाबंदीची गरज भासणार नाही. कदाचित तसेही चलनी नोटांची विश्वासार्हताही पणाला लागली आहे. कोणत्या नोटा केव्हा आपले प्राण सोडतील काही सांगकता येत नाही. सर्व नोटांचे नशीब कुठे गुलाबी असतात, त्यांचे बरे आहे. बँकांतून निघाल्या की श्रीमंतांकडे, तिथून परत मायघरी. त्या सदैव जीवंत राहणार आहेत. फक्त एवढेच की त्यांना व्यवहारात आणून त्रास दिला जाऊ नये म्हणून हा सर्व खटाटोप!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget