Halloween Costume ideas 2015

जमात-ए-इस्लामी हिंदची चतुर्वार्षिक योजना


नवी दिल्ली 

नव्या चतुर्वार्षिक योजनेत देशाच्या जनमतात सकारात्मक बदल घडवून आणण्याला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. इस्लाम आणि इस्लामी शिकवणुकीबद्दलचे गैरसमज दूर व्हायला हवेत. इस्लामच्या शिकवणुकीची मुख्य वैशिष्ट्ये कोणत्याही विशिष्ट संप्रदायासाठी किंवा समुदायासाठी नाहीत, तर सर्व मानवांच्या कल्याणासाठी, त्यांचे सांसारिक कल्याण करण्यासाठी, भविष्यात त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि सर्वांना न्याय आणि निष्पक्षता प्रदान करण्यासाठी आहेत. जमाअतला ते आपल्या देशातील लोकांसमोर ठेवायचे आहे, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

जमात-ए-इस्लामी हिंदच्या मरकजी मजलिस-ए-शूरा (केंद्रीय सल्लागार मंडळ) ने दि. 14 जून 2023 रोजी चतुर्वार्षिक (2023-2027) योजनेला मंजुरी दिली. जमाअत आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला आपल्या योजना आणि प्राधान्यक्रम ठरवते आणि त्यानंतर त्यानुसार त्याची अंमलबजावणी करते. जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्यालयात मासिक पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

जमातच्या चतुर्वार्षिक योजनेत देशातील विविध धार्मिक समुदायांमधील संबंध सुधारण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे, असे सआदतुल्ला हुसैनी यांनी सांगितले. संवादाचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले पाहिजे आणि द्वेष संपला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तसेच राज्यपातळीवर विविध उपक्रम व मोहिमा राबविण्यात येणार आहेत. विविध पातळ्यांवर संवाद आणि चर्चेसाठी विचारमंचांना प्रोत्साहन दिले जाईल. बुद्धिजीवी, धर्मगुरू, सर्वसामान्य नागरिक, नागरी समाज, युवक आणि महिला यांच्यात एक विचारमंच तयार केला जाईल, ज्याच्या माध्यमातून विविध धार्मिक गट एकमेकांच्या जवळ आणले जातील. सर्वांचे कल्याण आणि न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी वातावरण तयार केले जाईल.

जातीवाद, धर्मांधता, मुली व महिलांच्या हक्कांचे हनन, भ्रूणहत्या, हुंडा, अंमली पदार्थ, भ्रष्टाचार अशा देशात आढळणाऱ्या सर्वसामान्य अनिष्ट गोष्टींविरोधात नियमित मोहिमा राबविण्याचा निर्णयही जमाअतने घेतला आहे. पर्यावरणीय संकटाकडे पाहण्याचा इस्लामी दृष्टिकोन स्पष्ट केला जाईल आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध शहरांमध्ये विविध विशेष उपाययोजना केल्या जातील. 

जमाअतच्या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील सुधारणांनाही विशेष महत्त्व दिले जाईल तसेच समाजाला जागरुक केले जाईल. त्यांना इस्लामचे पालन करण्यासाठी आणि इस्लामचे प्रतीक बनण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. इस्लामच्या ज्या पैलूंवर सुधारणावादी चळवळींनी फारसे लक्ष दिलेले नाही, त्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. उदाहरणार्थ, विवाह सोपा व्हावा, हुंड्याची प्रथा संपुष्टात यावी, स्त्रियांना वारशात वाटा मिळावा, स्त्रियांचे हक्क दिले जावेत, व्यवसाय व आर्थिक बाबींमध्ये प्रामाणिकपणा लागू करावा, स्वच्छता पाळली जावी आणि मुस्लिमांप्रती चांगले वर्तन व्हावे. आणि मुस्लिमेतर शेजाऱ्यांशी चांगले आचरण केले पाहिजे- अशा इस्लामी शिकवणुकीवर भर दिला जाईल आणि मुस्लिमांच्या दैनंदिन जीवनातील दृष्टिकोन इस्लामच्या शिकवणीशी सुसंगत करण्याचा प्रयत्न केला जाईल.

शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय जमाअतने घेतला आहे. शिक्षण व्यवस्था सर्वसमावेशक आणि विशिष्ट संस्कृतीच्या वर्चस्वापासून मुक्त असावी. शिक्षण व्यवस्था नैतिक मूल्यांवर आधारित असली पाहिजे आणि शिक्षण सर्व नागरिकांना समान आणि सहज उपलब्ध असले पाहिजे. शिक्षणासंदर्भात जमाअतचे हे तीन मुख्य प्राधान्यक्रम आहेत. त्यानुसार या कामांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. जमाअतच्या विविध शाखाही या प्राधान्यक्रमांवर काम करण्याचा प्रयत्न करतील. मुस्लिम आणि इतर मागास गटांतील सुशिक्षितांचे प्रमाण वाढविण्यासाठी जमात प्रयत्न करणार आहे. साक्षरतेचे प्रमाण आणि सकल नोंदणी प्रमाण (जीईआर) वाढवून त्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविल्या पाहिजेत. देशाच्या विविध भागांत नवीन शैक्षणिक संस्था स्थापन करणे हादेखील या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. 

मुस्लिम समाज आणि इतर मागास गटांचे आर्थिक सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रांतील सुधारणा हा या नव्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे मायक्रोफायनान्सला एक चळवळ म्हणून संस्थात्मक स्वरूप देणे आणि गरिबांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देण्याचा प्रयत्न करणे. जमाअततर्फे करण्यात येत असलेल्या विविध समाजसेवेच्या कामांसह सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सेवा उद्योगाच्या क्षेत्रातही या वेळी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी वेळीच मार्गदर्शन मिळावे आणि त्या उपचारांच्या शोधात लोकांचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. वक्फ (एंडोमेंट) मालमत्तेची वसुली, विकास आणि योग्य वापर यासंदर्भात सरकार, विश्वस्त आणि लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली जाईल. त्यासाठी विशेष कक्षही स्थापन करण्यात येणार आहेत. 

देशात शांतता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी देशातील सर्व न्यायप्रेमी लोक आणि घटकांना सोबत घेऊन काम करणे हे जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या प्रयत्नांचे मुख्य उद्दिष्ट असेल. भेदभाव, भीती आणि दहशतीविरुद्धचा लढा असा असावा की आपला समाज क्रौर्य, अन्याय, देशद्रोह, भ्रष्टाचार, द्वेष अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टींपासून मुक्त होईल. या पत्रकार परिषदेला अमीर जमातव्यतिरिक्त जमातचे नवे उपाध्यक्ष, सचिव आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget