जीवनात काही गोष्टी मूलभूत गरजांशी निगडित असतात तर काही इच्छांशी संबंधित असतात. मनात इच्छा निर्माण झाली की लगेच धावपळ करणे, बऱ्या वाईट परिणामांचा विचार न करता प्रत्येक इच्छेमागे वाहत जाणे, ही मनमानी निश्चितच वाईट आहे. वैध गरजा व इच्छा आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पूर्ण करण्यास काय हरकत आहे? पण त्यासाठी डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन ते फेडता नाही आले तर? धनदांडग्यांनी विदेशात पळून जाणे आणि गरीब व लाचार जनतेने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवणे हे पर्याय तर मुळीच नाहीत, ह्या तर पळवाटा आहेत. जीवनाची वाटचाल योग्य दिशेने होत असेल आणि कोणत्याही परिस्थितीत संयम राखता येत असेल तर अनेक मार्ग व योजना सुचतात. मग परिस्थितीशी लढण्यातच खरी मजा असल्याचे दिसून येते. आपल्या निर्मात्याने कोणत्याही जीवावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्तीचा भार टाकला नाही. संतुलित जीवनशैलीत जगण्याची इच्छा असेल तर मानसिक संतुलनही आपोआप राखले जाते.
कुरआन आणि हदीसमध्ये कर्जावर व्याज घेणे आणि व्याज देणे या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. बाकी गरजेच्या वेळी नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून बिनव्याजी कर्ज
घेता येते. हल्ली व्याजमुक्त बँकिंग आणि सोसायट्या हळूहळू वाढत आहेत. त्यांची कार्यपद्धत नीटपणे समजून त्यांच्यात सामील झाल्यास जीवनात खूप बरकत, समृध्दी येते. हा अनुभवाचा विषय आहे. कर्ज मिळत नसेल तर आहे तेवढ्यात समाधान मानून जगावे, कारण कर्ज घेतल्यावर ठरल्याप्रमाणे परतफेड करता आली नाही तर सततच्या मागणीमुळे मानसिक ताण येतो. ही परिस्थिती येण्यापूर्वीच आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी केलेल्या प्रार्थना आपल्यालाही मार्गदर्शक ठरतात. प्रार्थनेचा सर्वात महत्वाचा आणि जाणवणारा परिणाम म्हणजे त्यामुळे चारित्र्य घडते.
आदरणीय पैगंबर (स.) यांची पत्नी आदरणीय माई आयशा (र.) यांनी सांगितले आहे की, पैगंबर सल्ल. नमाजमध्ये ही दुआ करत असत, ऐ अल्लाह! कर्जात अडकण्यापासून मी तुझ्याकडे आश्रय मागतो.’ कुणीतरी म्हणाले, हे पैगंबर(स)! आपण कर्जापासून किती आसरा मागता ! आदरणीय पैगंबर म्हणाले, ’जेंव्हा एखादा माणूस कर्जबाजारी होतो तेंव्हा तो खोटे बोलतो आणि जे वचन देतो ते मोडतो.( हदीस ग्रंथ - सहिह मुस्लिम - 1325). खोटे बोलल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. यामागे विज्ञान आहे.
इस्लाममध्ये श्रद्धा आणि उपासनेनंतर परस्पर व्यवहार दुरूस्त ठेवण्याची ताकीद करण्यात आली आहे. सामाजिक व्यवहारात कर्जाशी संबंधित काही नियम व शिष्टाचार पाळणे आवश्यक आहेत.
अत्यंत कठीण वेळ आल्याशिवाय कर्ज घेऊ नका आणि व्याजावर आधारित कर्ज व्यवहार तर मुळीच करू नका. परतफेडीचा दृढनिश्चय करा. नातेवाईक, मित्रमंडळी असो वा इतर कुणीही, कर्जाचा व्यवहार लिहून घ्या व त्याचे साक्षीदार बनवा. कर्ज फेडण्यात दिरंगाई करू नका. दुसरीकडे, कर्ज देणाऱ्या व्यक्तीने गरीब व लाचार व्यक्तीला जरा ढील द्यावी. जमत असेल तर आंशिक किंवा पूर्ण माफी द्यावी. आदरणीय पैगंबर (स) कर्जाची परतफेड करताना कर्ज देणाऱ्याला ही दुआ देत असत,
बार-कल्लाहु ल-क फी अहलि-क व मालि-क इन्नमा जजाउस्-सलफिल्-हम्दु वल्-अदाउ (हदीस ग्रंथ - निसाई - 4687 )
अनुवाद:-अल्लाह तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या संपत्तीत बरकत देवो, कर्जाच्या बदल्यात तर फक्त कौतुक आणि परतफेड आहे.
कर्जाची परतफेड करण्यापूर्वीच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेतुन थकीत कर्ज आणि इतर देय रक्कम काढून बाकी मालमत्तेची वाटणी वारसांमध्ये केली जाईल, असा इस्लाममध्ये नियम आहे. इस्लाममध्ये मृत्यूनंतर दफन करण्यापूर्वी मृत व्यक्तीसाठी दुआ केली जाते, त्याला ’नमाजे जनाजाह’ असे म्हणतात. मदीना येथे सुरुवातीच्या काळात एका मुस्लीम व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यापूर्वी आदरणीय पैगंबर (स) यांनी मृत व्यक्तीवर काही कर्ज होते का? अशी चौकशी केली. कर्ज होते आणि ते फेडण्यापुरती मालमत्ताही मागे शिल्लक नव्हती म्हणून पैगंबर(स.) यांनी त्यांची नमाजे जनाजाह अदा करण्यास नकार दिला. याचे कारण लोकांचे हक्क दिल्याशिवाय आणि पुरती व्यवस्था केल्याशिवाय त्यांचा मृत्यू झाला होता. एका साथीदाराने पुढे येऊन ते कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतली, मग आदरणीय पैगंबर (स.) यांनी नमाजे जनाजाह अदा केली. या प्रसंगातून लोकांना धडा मिळाला. एकतर कर्जापासून दूर राहावे आणि जर घ्यावेच लागले तर ते फेडण्यास उशीर आणि विलंब करणे टाळावे. आदरणीय पैगंबर (स) यांनी या विषयावर फक्त जागरुकता निर्माण करण्यावर समाधान मानले नाही तर नंतरच्या काळात पुढचे पाऊल उचलत गरीब व लाचार जनतेसाठी ही घोषणा केली, जो कोणी कर्जबाजारी अवस्थेत मरण पावला असेल आणि त्याने कर्ज फेडण्यासाठी पुरेशी संपत्ती सोडली नसेल तर त्याचे कर्ज फेडण्याची जबाबदारी माझी आहे.(अधिक तपशीलाकरिता पहा हदीस ग्रंथ इब्ने माजह - 2634/2738)
इतकेच नाही तर पैगंबर (स) यांनी आपल्या विदाई प्रवचनात व्याजावर आधारित सर्व असभ्य व अशिष्ट कर्ज व्यवहार संपल्याचे जाहीर केले. आदरणीय पैगंबर (स) यांचा विदाई खुत्बाह मानवी हक्कांचा पहिला, आदर्श व अनुकरणीय जाहीरनामा आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या आधारावर मानवी हक्कांची पहिली वैश्विक घोषणा असा त्याचा मान आहे. त्यामध्ये व्याजावर आधारित व्यवहार संपल्याची घोषणा करताना त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली. त्यांचे काका आदरणीय अब्बास (र) यांनी अज्ञानातून जो काही व्याजावर आधारित व्यवसाय केला तो संपुष्टात आल्याची घोषणा करताना आदरणीय पैगंबर (स) म्हणाले की ज्यांच्यावर परतफेडीची जबाबदारी आहे, त्यांना आता व्याज द्यावे लागणार नाही, फक्त मूळ रक्कम परत करावी लागेल.
फक्त मुळ रक्कम तुमचा हक्क आहे. तुम्ही जुलूम करू नका आणि तुमच्यावरही अन्याय होता कामा नये.(हदीस ग्रंथ - इब्ने माजह - 3055 ) आदरणीय अंतिम पैगंबर (स.) यांनी जे बोलले ते करून दाखवले. याला इतिहास साक्षी आहे. अशी दाखवावी लागते इच्छाशक्ती आणि याला म्हणतात मायबाप सरकार. त्यानंतरच जनतेला ’अच्छे दिन’ बघायला मिळतात. आशा करूया की या दृष्टीने पावले उचलली जातील. सामाजिक भानही ठेवले जाईल, पण मानसिक आरोग्य राखणे ही जबाबदारी सर्वप्रथम स्वतः व्यक्तीची आहे.
............................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment