(११) कधी असे घडले नाही की लोकांजवळ एखादा पैगंबर आला आणि त्यांनी त्याची चेष्टा उडविली नाही. (१२) अपराध्यांच्या हृदयांत तर आम्ही या स्मरणाला अशाच प्रकारे (कांबीप्रमाणे) आरपार करतो.५
(१३) ते यावर ईमान धारण करीत नसतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांची हीच पद्धत पूर्वापार चालत आली आहे.
(१४-१५) जर आम्ही त्यांच्यावर आकाशाचे एखादे दार उघडले असते, आणि ते दिवसाढवळ्या त्याच्यात चढूही लागले असते, तरीदेखील त्यांनी हेच सांगितले असते की आमच्या डोळ्यांची फसगत होत आहे किंबहुना आमच्यावर जादू केली गेली आहे.
(१६-१७) ही आमची किमया आहे की आकाशात आम्ही बरेचसे मजबूत गड बनविले,६ ते पाहणार्यांसाठी (तार्यांनी) सुशोभित केले. आणि प्रत्येक धिक्कारित सैतानापासून त्यांना सुरक्षित केले.
(१८) कोणताही सैतान त्यात मार्ग प्राप्त करू शकत नाही याखेरीज की त्याने काही कानोसा घ्यावा७ आणि जेव्हा तो कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक प्रज्वल्लित अग्नीचा गोळा त्याचा पाठलाग करतो.८
५) मुळात ‘नस्लुकुहू’ हा अरबी शब्द प्रयुक्त झाला आहे, ‘स-ल-क’चा अर्थ अरबी भाषेत एखद्या वस्तूला दुसर्या वस्तूत प्रविष्ट करणे, पार करणे आणि ओवणे असा होतो. जसे धागा सुईच्या छिद्रातून पार करणे. म्हणून आयतचा अर्थ असा की ईमानधारकांच्या हृदयात तर हे स्मरण मन:शांती आणि आत्म्याचा आहार बनून शिरत असते. परंतु अपराध्यांच्या हृदयात ते पलिता (टेंभा) बनून लागत असते. ते ऐकून त्यांच्या अंत:करणात असा अग्नी भडकतो जणू एखादी तापलेली सळई होती जी त्यांचा ऊर भेदून पार झाली.
६) मूळ अरबी शब्द ‘बुरूज’ प्रयुक्त झाला आहे. अरबी भाषेत ‘बुरूज’ शब्दाचा अर्थ किल्ला, कोट आणि भक्कम इमारत असा होतो. नंतरच्या मजकुरावर विचार केल्याने असे वाटते की कदाचित वरच्या जगातील तो प्रदेश अभिप्रेत आहे ज्याच्यापैकी प्रत्येक प्रदेशाला अत्यंत भक्कम सीमांनी दुसर्या प्रदेशापासून विलग करून ठेवले आहे. या अर्थानुषंगाने ‘बुरूज’ या शब्दाला सुरक्षित प्रदेशाच्या अर्थात घेणे आम्ही अधिक योग्य समजतो.
७) म्हणजे ते सैतान जे आपल्या मित्रांना परोक्षाच्या वार्ता आणून देण्याचा प्रयत्न करतात. वास्तविकपणे परोक्षाच्या ज्ञानाची साधने त्यांच्याजवळ अजिबात नाहीत. सृष्टी त्यांच्यासाठी मोकळे रान नाही की हवे तेथे जावे व अल्लाहची रहस्ये माहीत करून घ्यावी. ते कानोसा घेण्याचा प्रयत्न जरूर करतात परंतु प्रत्यक्षात त्याच्या पदरी काहीच पडत नाही.
८) अरबी शब्द ‘शिहाबे-मुबीन’ याचा ‘प्रज्वल्लित अग्नीचा गोळा’ असा अर्थ होतो. दिव्य कुरआनात दुसर्या ठिकाणी याकरिता ‘शिहाबे-साकिब’ असा शब्द प्रयुक्त झाला आहे. म्हणजे अंधकाराचा उच्छेद करणारी ज्वाला, याने अभिप्रेत केवळ तुटून कोसळणारे तारे, ज्यांना आमच्या परिभाषेत उल्का म्हटले जाते हमखास तेच असावेत असे नाही तर ती अन्य एखाद्या प्रकारची किरणेही असू शकतील. उदा. अंतरिक्षातील किरणे अथवा त्यांच्याहीपेक्षा तीव्र अन्य एखादा प्रकार असावा जे आमच्या माहितीत आला नसावा तथापि कधी जमिनीकडे कोसळताना ज्या आमच्या दृष्टीस पडत असतात त्याच या उल्का असाव्यात व वरील जगाकडे उड्डाण करताना त्याच सैतानांच्या मार्गात अडसर बनत असाव्यात याचीदेखील संभावना आहे.
Post a Comment