Halloween Costume ideas 2015

प्रसारमाध्यमे राजकारण आणि समाज यांच्यातील सेतूचे कार्य करतात - शाहजहान मगदुम


औरंगाबाद (प्रतिनिधी) 

प्रसारमाध्यमे राजकारण आणि समाज यांच्यातील सेतूचे कार्य करतात. राजकीय संवादाची व्याख्या राजकारण आणि समाजाशी नाते आणि या गटांना एकमेकांशी जोडणारी परस्परसंवाद पद्धती म्हणून केली जाऊ शकते, असे प्रतिपादन दिनांक २१ मे २०२३ रोजी औरंगाबाद येथील स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'संवाद' त्रैमासिकाच्या संपादकीय मंडळाच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना 'शोधन'चे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम यांनी केले. ते बैठकीला उपस्थित सदस्यांना 'समाज, राजकारण आणि माध्यमाची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाची सुरुवात आसिफ कुरैशी यांच्या कुरआन पठणाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी आपला परिचय करून दिला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय, बैठकीचा उद्देश आणि प्रास्ताविक संवादचे संपादक आशपाक पठाण यांनी केले.

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या जागतिक मीडिया वॉचडॉगने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, २०२३ च्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचे मानांकन १८० देशांपैकी १६१ वर घसरले असल्याचे सांगून मगदुम पुढे म्हणाले की भारतातील वृत्तपत्र स्वातंत्र्य अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचले आहे. आता देशाच्या इतर भागात काय लिहायचे आणि काय बोलावे हे दिल्लीतूनच सांगितले जाते. सध्या देशातील राजकारण आणि लोकांची मते सारखीच आहेत, जेव्हा आपल्या देशात धर्म आणि जात सोडून इतर मुद्द्यांना प्राधान्य मिळू लागेल, तेव्हा प्रेसही मजबूत होईल. हे स्पष्ट करताना मगदुम यांनी एनडीटीव्ही आणि केरळमधील मीडिया वन या वृत्तवाहिन्यांचे उदाहरण दिले.

मगदुम यांनी पुढे सांगितले की विविध माध्यमातून वृत्तपत्रे ही समाजभान घडविण्याचे काम करत असतात. समाजातील प्रत्येकाच्या जगण्याच्या संघर्षाशी जोडलेला अविभाज्य घटक म्हणजे वृत्तपत्र होय. ही वृत्तपत्रे दररोज सामान्य माणसाचे प्रबोधन करीत असतात. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राला भान आणून देण्याचे काम वृत्तपत्रे करतात. त्याचबरोबर समाजालादेखील मार्गदर्शनाची भूमिका बजावत असतात. वृत्तपत्रांमधून विविध क्षेत्रांतील घडामोडींविषयी अचूक व विश्वासार्ह माहिती सविस्तरपणे वाचकांपर्यंत पोहोचते.

निवडणूक प्रचारादरम्यान वृत्तमाध्यमांची भूमिका विशेष महत्त्वाची असते. मतदारांना निवडणुकीनंतर पक्षांचे कार्यक्रम, उमेदवार आणि संभाव्य युती व्यवस्थेची माहिती हवी असते. माध्यमे पक्ष आणि उमेदवारांच्या धोरणांचे आणि मागील कामगिरीचे गंभीर विश्लेषण देखील देतात. निवडणूक प्रचारादरम्यान माध्यमांनी राजकीय मुद्द्यांचे संतुलित कव्हरेज देण्याची वैधानिक आवश्यकता काळजीपूर्वक तपासली जाते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शाहजहान मगदुम यांनी दिली.

प्रमुख पाहुणे शाहजहान मगदुम यांच्या मार्गदर्शनानंतर 'बैठकीचा अजेंडा आणि आगामी नियोजन' या अंतर्गत संवाद त्रैमासिकाचा उद्देश स्पष्ट करणे, आरएनआय रजिस्ट्रेशन, वाचक वर्ग निश्चित करणे, त्रैमासिकातील रकाने (डोमेन्स) निश्चित करणे, संपादकीय मंडळाच्या सदस्यांची फेरबदल, त्रैमासिकाचे डिजीटलायझेशन, "संवाद १२ वर्षांचा" उत्सव कार्यक्रमाचे आयोजन, इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

दुपारच्या सत्रात शाहजहान मगदुम यांनी संपादक मंडळाची भूमिका आणि कर्तव्ये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन म्हणाले की- संपादकीय मंडळ हा संपादक, लेखक आणि इतर लोकांचा एक गट असतो, ज्यांच्यावर संपादकीय आणि इतर मतांच्या तुकड्यांबद्दल प्रकाशनाचा दृष्टिकोन अंमलात आणण्याची जबाबदारी असते. प्रकाशित संपादकीय साधारणपणे प्रकाशनाच्या मालकाचे किंवा प्रकाशकाचे विचार किंवा उद्दिष्टे दर्शवतात. वृत्तपत्रात, संपादकीय मंडळामध्ये सहसा संपादकीय पृष्ठासाठी जबाबदार संपादक आणि संपादकीय लेखक असतात. काही वृत्तपत्रांमध्ये इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश होतो. काही संपादकीय लेखकांच्या प्रकाशनात इतर भूमिकाही असू शकतात. 'संवाद' सारख्या नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांमध्ये नियतकालिक ज्या विषयावर लक्ष केंद्रित करते त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असतो आणि मोठ्या मासिकांमध्ये विषयानुसार अनेक संपादक असू शकतात. संपादकीय मडळाची ताज्या घडामोडी आणि मतप्रवाहांवर चर्चा करण्यासाठी आणि वर्तमान घटनांसह विविध मुद्द्यांवर प्रकाशनाने काय प्रकाशित करायचे आहे यावर चर्चा करण्यासाठी नियमितपणे बैठक घेतली जाते. हे सर्व सांगताना मगदुम यांनी विविध वृत्तपत्रांतील आपला अनुभव आणि इतर वृत्तपत्रांची कार्यपद्धती समजावून सांगितली.

संपादकीय मंडळाचे कार्य आणि कर्तव्ये या विषयावरील शाहजहान मगदुम यांच्या मार्गदर्शनानंतर संवादच्या एप्रिल-जून अंकाची तयारी व विषय निवडण्यात आले आणि त्यानुसार उपस्थित सदस्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

या बैठकीत संवाद या नियतकालिकेच्या पुढील वाटचालीबाबत खूप महत्त्वाची चर्चा करण्यात आली. इथून पुढे निघणारे अंक उत्तम दर्जाच्या लिखाणाचा वापर करून प्रकाशित करण्यात येतील, एकूणच संवाद च्या प्रगतीसाठी जे करता येईल ते करण्याची त्यासाठी मेहनत घेण्याची इच्छा सर्वांनी बोलून दाखविली.

सदर चर्चासत्रात 'संवाद' त्रैमासिकाच्या संपादकीय मंडळाचे सदस्य आशपाक पठाण (संपादक),  उमर सरतापे (उपसंपादक), प्रिया कानिदे -सरतापे, सलीम खान, वसीम शेख, आसिफ कुरेशी, डॉ. आयेशा पठाण, जुनेद अकबर आणि साद नालबंद आवर्जून उपस्थित होते.

शेवटी एस. आई. वो. दक्षिणचे प्रदेशाध्यक्ष एहतेशाम हामी यांच्या अध्यक्षीय भाषणाने बैठकीची सांगता झाली. सर्व सदस्य आपले दैनंदिन कामातून वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल संवादचे संपादक आशपाक पठाण यांनी आभार मानले आणि संवाद साठी नव्या जोमाने काम करण्याची शक्ती अल्लाह आम्हांला देवो, अशी दुआ केली.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget