भ्रष्टाचाराच्या जागी नैतिक आचरण करून अप्रमाणिकपणाच्या जागी प्रामाणिक प्रयत्न करू आणि द्वेषाच्या जागी सद्भाव वाढवून आपण खरी देशसेवा करण्याचा केरला स्टोरीच्या निमित्ताने निश्चय करूया.
जो उनका काम है वो
अहले सियासत जाने
मेरा पैगाम मुहब्बत है
जहांतक पहूंचे.
भारताच्या फाळणीमुळे मुसलमानांचे सर्वाधिक नुकसान झाले, यात वाद नाही. बहुसंख्य हिंदू बांधवांच्या दृष्टीकोणातून भारतीय मुस्लिम समाज हा देशाचे दोन तुकडे पाडणारा समाज म्हणून गणल्या जावू लागला. त्यांच्याकडे ह्याच नजरेने पाहण्याचा जणू प्रघातच पडलेला आहे. ज्या मुसलमानांनी पाकिस्तान मागितला होता. ते तेव्हाच पाकिस्तानला निघून गेले. ज्यांनी मागितला नव्हता त्यांनी पाकिस्तानला जाण्याची संधी व जाण्याची मोफत व्यवस्था असतांनाही तेथे न जाता भारतात राहणे पसंत केले. त्यामुळे भारतीय मुस्लिम समाज हा अस्सल भारतीय असून, त्याला पाकिस्तानी समर्थक ठरविणे ह्याच्या एवढा मोठा अपमान त्यांचा दूसरा नाही. असे असतांना देखील ’पाकिस्तानला निघून जा’ चे टोमणे हमखास या समाजाला खावे लागतात. हे टोमणे सहन करत-करत जगणे हे आता भारतीय मुस्लिम समाजाची जणू नियतीच झाली आहे. जी गोष्ट सातासमुद्रापलिकडील अमेरिकेच्या अध्यक्षाच्या लक्षात आली दुर्दैवाने ती भारतीय बहुसंख्य समाजाच्या एका मोठ्या गटाच्या लक्षात आलेली नाही, असे म्हणणे भाग आहे.
डिसेंबर 2017 मध्ये ’हिंदुस्थान टाईम्स लिडरशीप समीट’मध्ये बोलतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले बराक ओबामा म्हणाले होेते, ’’भारतीय मुस्लिम समाज भारताशी एकरूप झालेला समाज आहे. म्हणून भारतीय बहुसंख्यांनी त्यांची कदर करायला हवी. ही गोष्ट मी नरेंद्र मोदींनाही खाजगीमध्ये सांगितलेली आहे. भारतासारख्या विशाल देशात जिथे मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात ते या भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहेत. दुर्दैवाने त्यांची कदर होताना दिसत नाही. मला वाटते की असे काही करायला हवे ज्यामुळे अल्पसंख्यांकांचे संपोषण व विकास होईल.’’ -(संदर्भ : नवभारत टाईम्स, 2 डिसेंबर 2017)
ही गोष्ट या ठिकाणी यासाठी नमूद करावी लागली की, केरला स्टोरी या चित्रपटाच्या संदर्भात भारतीय मुस्लिमांना टोमणे मारण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या संदर्भात ज्या शेकडो चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत आहेत. त्यातून भारतीय मुस्लिम समाजाचे चित्रण एक धर्मांध समाजाच्या रूपाने करून या समाजाच्या तरूणांचे काम जणू हिंदू मुलींना फसवून त्यांना आयएसआयएस मध्ये भरती करणे एवढेच आहे, असे चित्र रंगविण्यात येत आहे. पण याची दुसरीही बाजू आहे जिच्याकडे ध्रुवराठी यांनी लक्ष वेधलेले आहे.
केरला स्टोरी नावाच्या आपल्या व्हिडीओमध्ये त्यांनी अशी काही आकडेवारी दिलेली आहे व विश्लेषण केलेले आहे की, केरला स्टोरीची हवाच निघून जाते. प्रत्येक भारतीयाने ती चित्रफित आवर्जुन पहावी, अशी ती झालेली आहे. यामध्ये त्यांनी युनायटेड नेशन्स से्नयुरिटी काउन्सिलचा 2020 चा आतंकवाद संबंधीचा सविस्तर अहवाल कोट केलेला आहे. या अहवालाचे नाव ’कंट्रीवाईज रिपोर्ट ऑन टेररिझम 2020’ असा आहे. या अहवालानुसार 2020 पर्यंत आयएसआयएसमध्ये जगभरातून 3922 ते 4294 आतंकवादी सामील झाले होते, असे नमूद आहे. त्यात फ्रान्समधून 1700, जर्मनीमधून 760, ब्रिटनमधून 700, बेल्झियमधून 470, रशियामधून 2500 तर भारतामधून अवघे 66 लोक सामील झाले होते. इतर देशांमधील मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आयएसआयएसमध्ये भरती झालेल्या लोकांची तुलना भारताच्या मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात केल्यास ही संख्या इतकी कमी आहे की, तिची सरासरी सुद्धा काढता येणे श्नय नाही. विशेष म्हणजे शेकडोच्या संख्येने इतर देशातून येवून आयएसआयएसमध्ये सामील झालेल्या लोकांविरूद्ध कायदेशीर कारवाई जरूर झालेली आहे. परंतु ते सामील झाल्यामुळे त्यांच्या समाजातील इतर लोकांना कोणीही दोषी ठरविलेले नाही. भारतात मात्र सातत्याने या संदर्भात मुस्लिमांना फक्त टोमणेच मारले जात नाहीत तर प्रत्येक मुस्लिम व्य्नतीकडे अशा संशयाने पाहिले जाते की, जणू तो आतंकवादीच आहेत. इंटरनॅशनल एजन्सीजनी सुद्धा भारतातून इत्नया कमी संख्येने कसे काय लोक आले याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. भारताच्या 20-25 कोटी मुस्लिम लोकसंख्येमधून अवघे 66 लोक मार्गभ्रष्ट झाले तर त्यांच्याविरूद्ध कारवाई व्हायला हवी व तशी ती झालेली आहे. पण बाकी समाजाकडे का म्हणून संशयाने पाहिले जावे. भारतामधून आलेले जे 66 लोक आहेत ते सुद्धा कमी लायकीचे आहेत. त्यांच्या मते भारतातील इस्लाम हा सौम्य इस्लाम असून, त्यामुळेच असे कमी योग्यतेचे लोक आणि कमी संख्येने आले असावेत, असा अंदाजही त्या अहवालामध्ये आयएसआयएसच्या संदर्भाने केलेला आहे.
7 सप्टेंबर 2020 रोजी देशातीलच नव्ह तर एशियातील सर्वात मोठे विद्यापीठ दारूल देवबंदने एक फतवा जारी केलेला असून, त्यानुसार भारत हा ’दारून अमन’ असनू या ठिकाणी कुठलीही सशस्त्र चळवळ करणे हराम असल्याचे घोषित केलेले आहे. 10 डिसेंबर 2015 रोजी 70 हजार उलेमा आणि मुस्लिम बुद्धीजीवींनी आतंकवादाविरूद्ध आपली भूमिका स्पष्ट केलली आहे.
शिवाय, स्वातंत्र्यानंतर भारतीय मुसलमानांना ज्या- ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळविलेली आहे त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध केलेली आहे. त्याचा तपशील विस्तारभयामुळे या ठिकाणी देण्याचे टाळत आहे. मात्र एवढे नक्की की, एका पाकिस्तानी महिलेचे नग्न शरीर पाहता यावे म्हणून एकाही मुस्लिम व्यक्तीने देशाची गुपित पाकिस्तानला दिलेली नाही, यातच सर्वकाही आले. एवढ्या विवेचनानंतरही माझे असे स्पष्ट मत आहे की, भारतीय मुसलमानांनी देशाप्रती आपली निष्ठा अशीच जपावी. ज्या क्षेत्रात त्यांना संधी मिळाली त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे त्यांनी काम करावे. राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपला वाटा उचलावा. बहुसंख्य बांधवांमधील एक छोटासा गट जरी आपल्याला हिनवत असला तरी त्यांच्याकडे ठीक त्याचप्रमाणे दुर्लक्ष करावे ज्याप्रमाणे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मक्का शहराच्या इस्लाम विरोधकांकडे केले होते. आपण करत असलेल्या कामासंबंधी कुणी कौतुक केले की नाही, याकडे लक्ष न देता शांतपणे आपले काम प्रामाणिकपणे करत रहावे. आज देशात भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, द्वेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ज्यांना हे करायचे आहे त्यांना करू द्या. आपण मात्र प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जे मार्गदर्शन केलेले आहे त्या मार्गदर्शनाला बांधिल राहून देशाच्या प्रगतीमध्ये स्वतःला झोकून देऊया.
भ्रष्टाचाराच्या जागी नैतिक आचरण करून अप्रमाणिकपणाच्या जागी प्रामाणिक प्रयत्न करू आणि द्वेषाच्या जागी सद्भाव वाढवून आपण खरी देशसेवा करण्याचा केरला स्टोरीच्या निमित्ताने निश्चय करूया.
जो उनका काम है वो अहले सियासत जाने
मेरा पैगाम मुहब्बत है जहांतक पहूंचे.
जय हिंद..!
- एम. आय. शेख
Post a Comment