अल्लाहचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांचा जन्म इसवी सन ५७१ मध्ये मक्का शहरात झाला आणि अल्लाहने त्यांना वयाच्या ४० व्या वर्षी मानवजातीच्या संपूर्ण कल्याणासाठी प्रेषित म्हणून घोषित केले. ज्या वेळी प्रेषितांचा जन्म झाला आणि ते प्रेषित झाले त्या वेळेस अरबस्थानात, संपूर्ण जगात पर्यावरण समस्या नव्हतीस. तरीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनात असे पुरावे आढळतात की ते पर्यावरणविषयी जागृत होते. ज्या वेळेस पर्यावरण समस्यांविषयी कुणी व्यक्ती कल्पनादेखील करू शकत नव्हता त्या वेळेस प्रेषितांनी असे मार्गदर्शन केले की ते सद्यस्थितीत अमूल्य आहे. पर्यावरण समस्या आज एक गंभीर समस्या झालेली आहे. प्रदूषणामुळे संपूर्ण मानवजाती मोठ्या संकटात उभी आहे या संकटातून बाहेर निघण्याचा सोपा आणि सरळ मार्ग प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेला आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन पवित्र होते. ते स्वच्छतेला पसंत करीत होते. स्वच्छता अर्धा ईमान (श्रद्धा) आहे असे ते सांगत असत. म्हणजे श्रद्धा स्वच्छतेविना पूर्ण होऊ शकत नाही. एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्वच्छतेविषयी सांगितले की, "शक्यतो स्वच्छता पाळा कारण इस्लाम स्वच्छतेवर आधारित आहे आणि स्वर्गात फक्त पवित्र लोकच दाखल होणार आहे".
"एका ठिकाणी प्रेषित मोहम्मद(स) मार्गदर्शन करतात की "जो कोणी इमान धारकांच्या (श्रद्धावंत) रस्त्यावरील त्रासदायक वस्तू बाजूला करेल त्याला एक नेकी भेटणार आणि ज्याची नेकी अल्लाहने स्वीकारली त्याचे स्थान स्वर्गात आहे".
प्रेषितांच्या या उपदेशाने आम्हाला बरेच मार्गदर्शन प्राप्त होते. कोणता व्यक्ती स्वर्गात जाण्यास पसंत करणार नाही? जर स्वर्ग प्राप्त करायचे असेल तर आपल्या जीवनात स्वच्छता पाळा आणि पवित्रतेवर आपले लक्ष केंद्रित करा. आणि ईमानधारकांना (श्रद्धावंत) प्रोत्साहित केले की तुमचे ईमान अपूर्ण आहे जर तुम्ही स्वच्छता राखली नाही.
जलप्रदूषण हीदेखील एक मोठी समस्या आज जगात निर्माण झालेली दिसते. जलप्रदूषणामुळे अनेक आजारांशी आम्ही झुंज देत आहोत. आमचे आरोग्य धोक्यात आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जलप्रदूषण निर्मूलनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की “साठवलेल्या पाण्यात अजिबात लघवी करू नका जर तुम्ही वाहत्या झऱ्यावर असाल तर पाण्याचे वापर योग्य करा. पाण्याचा अतिवापर टाळा.” असे मार्गदर्शन सुद्धा प्रेषितांचे पवित्र जीवनात आम्हाला बघायला मिळतात. प्रेषित मुहम्मद (स.) फक्त एक लिटर पाण्याने वुजू (नमाज अदा करण्यापूर्वीचा विधी) करीत असत आणि ३८०० मिलीलिटर पाण्याने आंघोळ करीत असत.
यावरून आम्हाला कळते की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी पाण्याचा वापर काटेकोरपणे करण्याचे आदेशित केले आहे आणि पाण्याला अस्वच्छ होण्यापासून उपायोजनादेखील आपल्या समोर मांडली आहे. आज आम्ही बघतो की पाणी या जगाची एक मोठी समस्या झालेली आहे. पावसाळ्यात योग्य प्रमाणात पाऊस पडत नाही त्याचे परिणाम आम्हाला दिसतच आहे. पैसे देऊन पाणी खरेदी करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. पिण्याचे शुद्ध पाणी आम्हाला मिळत नाही. जर आम्हाला या समस्येवर विजय प्राप्त करायचा असेल तर प्रेषितांनी केलेल्या मार्गदर्शनावर विचार करण्याची गरज आज आपल्याला आहे.
आज आम्ही पाहतो की वायुप्रदूषण जोमात सुरू आहे. विवाह सोहळ्यात लोक फटाके फोडतात. नवीन वर्षानिमित्त (इस्लाममध्ये निषिद्ध आहे) वायुप्रदूषण करतात आणि इतर कारणानेदेखील फटाके फोडून आम्ही वायुप्रदूषण करीत असतो. अत्याधुनिक युगात औद्योगिक क्षेत्रातसुद्धा वायुप्रदूषण होत असते. वायुप्रदूषणामुळे आमचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत. पवित्र कुरआनात कमी आवाजात बोलण्याची ताकीद आहे. आणि सर्वात वाईट आवाज गाढवाची आहे हेदेखील आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विवाह सोहळा अगदी सोप्या पद्धतीने करण्याचे सांगितले आहे. प्रेषित म्हणतात, निकाहला सोप्या पद्धतीने करा. तसेच रमजान ईद व बकरी ईदसुद्धा सोप्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश प्रेषितांनी दिले आहेत. कोणी व्यक्ती मृत झाला तर त्याचा दफनविधी करा, असासुद्धा प्रेषितांचा आदेश आहे. यावरून आम्हाला कळते की जर आम्ही लग्न समारंभात, नवीन वर्ष साजरा करतेवेळी आणि इतर समारंभात आम्ही सोप्या पद्धती अवलंबिल्या तर वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होऊ शकते.
"झाडे लावा झाडे जगवा" हे आपण नेहमी ऐकतो. पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे महत्त्वाचे असते. झाडे असतील तरच या भूतलावर मानव दिसतील. मानवी जीवनाला वाचवण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी झाडांचे महत्त्व सांगितले आहे.
प्रेषित (स.) म्हणतात, "जर तुम्ही तुमच्या दृष्टीने पाहत आहात की कयामत (प्रलय) प्रकट झाली आहे आणि तुमच्या हातात एक रोपटे आहे तरी पण तुम्ही ते रोपटे जमिनीत लावून टाका."
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "झाड लावणार्याला कयामतच्या दिवशी चांगला मोबदला मिळेल." एकदा प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "जो कोणी बोरीच्या झाडाची कत्तल करेल त्याच्या डोक्याला उलटे करून नरकात टाकले जाईल." यावरुन आम्हाला कळते की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले आहे आणि जिवंत झाडांच्या कत्तलीपासून रोखले आहे.
खरोखरच आज आपला परिसर अतिप्रदूषित झालेला आहे. याची अनेक प्रकार व कारणे आहेत. जर खर्या अर्थाने आम्हाला या सृष्टीला विनाशापासून वाचवायचे असेल व मानवी जीवनाला संरक्षण द्यायचा असेल तर पर्यावरण संरक्षण अतिमहत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षणासाठी आदर्श शिकवणी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या पवित्र जीवनात दिलेल्या आहेत. जर आम्ही सर्व मानवजाती प्रेषितांनी पर्यावरणविषयी केलेल्या मार्गदर्शनावर चाललो तर आम्ही पर्यावरण संरक्षण करू शकतो आणि मानवी जीवनाला व संपूर्ण सृष्टीला अतिसुंदर बनवू शकतो.
Post a Comment