Halloween Costume ideas 2015

मानसिक गुंतागुंत


जगातील प्रत्येक गरीब-श्रीमंत, चांगल्या-वाईट माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दु:ख, संकट व समस्यांना सामोरे जावे लागते. याचे कारण हे जग परिक्षा केंद्र आहे आणि माणसाची कर्मभूमी आहे. गरिबी किंवा श्रीमंती जगात होणाऱ्या परिक्षेशी संबंधित आहे. माणूस कोणत्याही वर्गातील असो, या जगात कुणीही दुःखापासून सुटलेला नाही. ही बाब वेगळी आहे की समस्या कमी जास्त असू शकतात. कुणाला त्रास कमी तर कुणाला जास्त होतो आणि जीवन त्याला डोंगरासारखे वाटू लागते म्हणून तो दु:ख आणि समस्यांपासून मुक्ती मिळवू इच्छितो. या दु:खांचे काही निश्चित स्वरूप असेलच असे नाही. कोणत्याही पैलूने ते जीवनात येऊन यातना बनू शकतात. आर्थिक प्रश्न, अपयश, छळ, अन्याय, विषमता व दडपशाही इत्यादी अनेक कारणे असतात. मग त्यातून निरुत्साह, उदासीनता, नैराश्य यासारखे रोग जन्माला येतात. ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडते आणि शरीरावरही परिणाम दिसू लागतात, म्हणून दुःखाच्या प्रवाहात वाहून जात असतानाही माणसाने हातपाय मारावे हे परिक्षेच्या दृष्टीने अपेक्षित आहे.

मानसिक गुंता म्हणजे सोप्या भाषेत, मनात असणारे ते सर्व रोग आणि लवकर परिणाम करणाऱ्या भावना आहेत ज्यांमुळे एखादी व्यक्ती आपले संतुलन आणि आत्म-नियंत्रण गमावते. असे विकार बरेच आहेत. त्याबद्दल स्वतंत्रपणे चर्चा केली जाऊ शकते. त्यांपैकी येथे फक्त दोन समस्यांचा उल्लेख करत आहोत ज्यांचा त्रास सर्वसाधारणपणे जाणवतो.

चिंता 

कोणत्याही गोष्टीबद्दल सतत चिंता वाटणे याला अरबी भाषेत ’हम्मिन’ म्हणतात. ही चिंता भविष्यातील आव्हाने आणि समस्यांबद्दल असते. चिंता ही नैसर्गिक आणि मर्यादित असल्यास हरकत नाही पण त्यापेक्षा वाढली तर हा एक मानसिक आजार आहे. अशा वेळी सैतान, वाईट व अयोग्य विचार माणसाच्या मनात पेरु लागतो. मग माणसाचे दैनंदिन कार्य कितीही लहान असले तरीही ते डोंगराएवढे वाटतात. ज्यामुळे माणूस कमकुवत होतो आणि भविष्य काळातील काल्पनिक विचारात अडकतो. या कारणाने त्याची दिनचर्या प्रभावित होते. ही परिस्थिती खासकरून त्यावेळी उत्पन्न होते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या निर्मात्यापासून दुरावलेली असते. प्रत्येक समस्येचे निराकरण कसे करावे हे ज्ञान निर्मात्याने अवतरित केलेल्या ईशग्रंथात आणि पैगंबरांच्या मार्गदर्शनात मिळते, पण तेथे शोधण्याऐवजी माणूस आपल्या शत्रूने म्हणजे सैतानाने मनात घातलेल्या विचारांना बळी पडतो. अशावेळी अल्लाहकडून या समस्याद्वारे माणसाची परीक्षा घेतली जाते. जेणेकरून माणसाने वाईट गोष्टी सोडून अल्लाहकडे परतावे आणि त्याच्या आदेशांचे पालन करावे.

दुःख 

एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यु किंवा त्याचे बेपत्ता होणे, आर्थिक नुकसान, दीर्घ आजार व वाईट लोकांच्या सहवासात जगणे यासारख्या अनेक कारणांमुळे माणूस दुःखी होतो आणि ही सुद्धा नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे जेव्हा त्याची कारणे सापडतील तेव्हा ही परिस्थिती नक्कीच निर्माण होईल. जवळजवळ प्रत्येक माणसाला याचा त्रास होतो. अशा वेळी कुरआनच्या आज्ञा आणि आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांच्या आदर्श चरित्रानुसार जगूनच दु:खांपासून मुक्ती मिळणे शक्य आहे. आदरणीय पैगंबर (स.) यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा पैगंबर (स.) यांच्यावरही त्या घटनेचा परिणाम झाला. त्यावेळी ते म्हणाले, ’हे इब्राहिम! तुझ्या वियोगाने आमचे डोळे वाहत आहेत आणि मन दु:खी आहे, पण अशा वेळीही आम्ही तेच म्हणू जे आपल्या निर्मात्याला आवडते आणि ज्यामुळे तो प्रसन्न होतो.’

काही माणसे त्रासाला कंटाळून मृत्यूला मिठी मारतात. इस्लामी विचारधारेत अशी माणसे नरकात जातात. काही लोक मादक पदार्थ वापरून अथवा इतर अवैध मार्ग अवलंबून आपले दु:ख, चिंता व भीती दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. एकमेव ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासामुळे मनातील प्रत्येक भीती दूर होते. संभाव्य हानीच्या कल्पनांचे मार्ग बंद होतात. या सर्व भीती, कल्पना एकेश्वरवादावर विश्वास नसलेल्या मनात दडलेल्या असतात आणि तेथे खूप विकसित होतात. मात्र एकेश्वरवादीच्या मनात या धोक्यांना जागा मिळत नाही. तेथे एकच भीती असते. फक्त आपल्या निर्मात्याच्या नाराजीची, त्याशिवाय दुसरी कोणतीही नसते.

एकेश्वरवादी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्या निर्मात्या, स्वामीकडे लक्ष केंद्रित करतो. ज्याचे प्रत्येक शक्तीवर नियंत्रण आहे.         -(उर्वरित आतील पान 7 वर)

जो प्रत्येक शिरजोराला मात देणारा आहे. ज्याच्या राजसत्तेवर कुणीही विजय मिळवू शकत नाही आणि कोणतीही गोष्ट त्याच्या हिकमती व आज्ञेशिवाय होऊ शकत नाही. जेव्हा माणूस श्रद्धा आणि विश्वासाची ही पातळी गाठतो तेव्हा सर्व समस्यांच्या प्रभावापासून तो स्वतःला मु्क्त करतो. मग तो निर्भयपणे काम करतो, परिश्रम करतो. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व असलेल्या जबरदस्त अस्तित्वाशी तो आपले जीवन जोडतो.

समस्यांवर पहिला उपाय श्रद्धा सुधारणे हाच आहे. यात कसलीही शंका नाही. कित्येक दु:ख आणि काळजीचे मुख्य कारण फक्त बिघडलेल्या श्रद्धा आहेत. आपला निर्माता, स्वामी, पालक, एकमेव ईश्वराशी संबंधित आपल्या भावना, आपले विचार हे वास्तविक आणि योग्य असणे अत्यावश्यक आहे. श्रद्धा चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात. खऱ्याही असतात आणि खोट्याही असतात. श्रद्धेच्या खऱ्या विचारांपासून वंचित राहिल्यास जीवनात अनेक समस्या अडचणीच्या बनतात, पण बहुतेक लोक याकडे लक्षच देत नाहीत.

दुःख आणि चिंता दूर होण्यासाठी इस्लाममध्ये आणखीन बरेच उपाय सुचवले गेले आहेत. त्यातील एक उत्तम उपाय म्हणजे सतत प्रार्थना करणे होय.

अल्लाहचे पैगंबर (स.) एके दिवशी मस्जिदमध्ये आले तेंव्हा त्यांनी पाहिले की तेथे एक मदीनावासी सहाबी अबू उमामाह (र.) हजर होते. ती वेळ अनिवार्य नमाजची नव्हती. मुस्लिम लोक पाच वेळा व्यतिरिक्तही कठीण प्रसंगी, गरजेनुसार प्रार्थनेसाठी मस्जिदमध्ये जातात. पैगंबरांनी विचारले, हे अबू उमामाह! काय झालंय? मी तुम्हाला मस्जिदमध्ये पाहतोय. नमाजची वेळही नाहीये? त्यांनी उत्तर दिले, हे अल्लाहचे पैगंबर! मी खूप चिंतीत, दु:खी आहे, कर्जांनी वेढलेला आहे पैगंबर म्हणाले मी तुम्हाला प्रार्थनेचे असे शब्द शिकवू का? जर तुम्ही त्यांचे पठण करण्यास सुरवात केली तर अल्लाह तुमचे दुःख दूर करेल आणि तुमचे कर्ज फेडेल. म्हणजे अल्लाह कर्ज फेडण्याची साधने व माध्यमे उपलब्ध करेल आणि तुम्हाला उपाय सुचवेल. अबू उमामा म्हणाले, का नाही, हे अल्लाहचे  पैगंबर! जरूर सुचवा पैगंबर म्हणाले,सकाळ संध्याकाळ ही प्रार्थना करत जा.

अल्लाहुम्मा इन्नी अऊजु-बि-क मिनल्-हम्मी वल्-हजनी वअऊजु-बि-क मिनल्-अज्जि वल्-कस्लि वअऊजु-बि-क मिनल्-जुब्नि वल्-बुख्लि वअऊजु-बि-क मिन् गलबतिद्- दैनि व कह्ररि-र्रिजालि.( हदीस ग्रंथ - अबू दाऊद - 1555 )

अनुवाद 

हे अल्लाह! मी तुझा आश्रय घेतो, जीवाला लागणाऱ्या घोरापासून व दुःखापासून, अकार्यक्षम व आळशी होण्यापासून, भित्रा व कंजूष होण्यापासून व मी तुझा आश्रय घेतो कर्जाच्या ओझ्यापासून व जुलुमी लोकांच्या वर्चस्वापासून.

अबू उमामाह (र) यांनी म्हटले आहे की जेव्हा मी ही प्रार्थना करू लागलो तेव्हा अल्लाहने माझे संकट दूर केले आणि कर्ज फेडण्याची साधने देखील उपलब्ध केली.

आपणही ईश मार्गदर्शनात आपल्या समस्यांवर उपाय शोधावे आणि ही प्रार्थना नेहमी करत रहावी. आदरणीय पैगंबर (स) यांनी ही प्रार्थना फक्त दुसऱ्यांनाच शिकवली नाही तर ते खुद्द स्वतःचे दु:ख आणि त्रास टाळण्यासाठी ही प्रार्थना करत असत.

............................. क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget