मध्य प्रदेशमधील वामोह जिल्ह्यातील एक शाळेची इमारत बुलडोजरने पाडण्याचा आदेश दिला जातो. कारण त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिथल्या हिंदू विद्यार्थिनींनासुद्धा हिजाब घालण्याची सक्ती केली होती. मुख्याध्यापकांचे हे कृत्य चुकीचे आहे. पण त्यांच्या चुकीची शिक्षा शाळेला का दिली जाते? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. शाळेचा दोष काय? शाळा म्हणजे फक्त इमारत, भिंती, दारे, खिडक्या नव्हेत. शाळा म्हणजे शिक्षण प्राप्त करण्याचे केंद्र आहे. शिक्षण प्राप्त करण्यासाठी पूर्वी इमारत नसल्याने झाडाखालीसुद्धा शाळा भरवल्या जायच्या. आज इमारत बांधायची साधने ईश्वराने दिलीत म्हणून झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची गरज नाही. शाळेची इमारत पाडताना विद्यार्थिनींना रडू कोसळत होते. त्यांना शिक्षण घेण्याची जी संधी मिळाली होती ती त्यांच्यापासून हिरावून घेतली जात होती. ह्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी दिहाडी कामगारांची मुलं आहेत. त्यांनीसुद्धा शिक्षण प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगले असावे, पण यांना काय माहीत होते की एकेदिवशी त्याच शाळेचा मुख्याध्यापक काही इतर धर्माच्या विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची सक्ती करील आणि त्याच्या या कुकर्माची शिक्षा त्याला नाही तर तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची संधी हिरावून घेईल. प्रश्न असा पडतो की मुख्याध्यापकाची शिक्षा विद्यार्थ्यांना का दिली जाते? हे कारण कोणते दुसरे तर नाही. त्या शाळेत कामगारांची मुलं शिक्षण घेत होती. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार धर्माने दिला नसताना त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले. मुख्याध्यापकाने ती चूक वैयक्यिकपणे केली की जाणूनबुजून, यामागे एखाद्या षड़यंत्राचा भाग म्हणून त्याने जाणूनबुजून ही चूक केली?
एक शाळा बांधण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. साधने नसताना ती मिळवावी लागतात. त्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात आणि वर्षानुवर्षांच्या या संघर्षाचे प्रतीक असलेल्या शाळेच्या इमारतीला काही तासांत जमीनदोस्त केले जाते. प्रशासनाला ही इमारत पाडताना एकदा तरी असा विचार आला नसावा का? देशात दररोज मोठमेठे गुन्हे घडत आहेत. त्या गुन्हेगारांना त्यांची शिक्षा देणे तर दूरच त्यांच्याविरुद्ध साधी कारवाई सुद्धा केली जात नाही. दररोच देशाची कोट्यवधींची संपत्ती लुटून परदेशांत पसार होणाऱ्या व्यक्तीच्या बातमन्या येत असतात. पण अशालोकांना कधी कुठे शिक्षा दिली गेली की भविष्यात दिली जाईल? लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या काही महिला खेळाडू दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्यांच्या दोषीला कुणी शिक्षा द्यायला तयार नाही. अशा कितीतरी घटना आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. एका शाळेबाबत मात्र तडकाफडकी निर्णय घेतला जातो. त्या विद्यार्थिनींना जाणूनबुजून किंवा कुणाच्या सांगण्यावरून हिजाब घालण्याची सक्ती केली आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे स्वप्नच भंग करून टाकले. या विद्यार्थ्यांसमोर दुसरा पर्याय आहे की नाही हे माहीत नाही, असला तरी त्यांना संधी मिळणार का हेदेखील माहीत नाही. त्यांच्या जगण्याच्या आशा-आकांक्षा बुलडोझरने उद्ध्वस्त केल्यानंतर ते कसे जगतील, उद्या तेदेखील कामगार बनतील, कारण पोट तर भरावेच लागेल. मिळालेले जीवन जगावेच लागेल. अंधकारात जगणं असो की आणखी कशा प्रकारे, नशिबात आहे ते भोगावेच लागेल. लोक म्हणतात स्वप्नं पाहावीत पण तीच स्वप्नं कधी कधे भोगवेही लागतात.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment