Halloween Costume ideas 2015

राज्यात शांतता सलोखा नांदू द्या


कोरमंडला गेल्या वर्ष-दोन वर्षांत महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहादच्या विरोधात ५० जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले. सांप्रदायिक तणाव निर्माण करणे कदाचित यामागची भूमिका असेल, पण महाराष्ट्राच्या नागरिकांनी संयम सोडला नाही. कुठेही दंगलसदृस्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. सर्व काही शांततेत पार पडले. नंतर आता एक नवीन प्रकार समोर येत आले. काही मुस्लिम तरुणांनी मोघल बादशाह औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेट्स ठेवले म्हणून इतका वादंग झाला की याविरुद्ध हजारो लोक कोल्हापुरात जमले आणि शेवटी सांप्रदायिक तणाव निर्माण झालाच. हे मोर्चे, आंदोलने वगैरे कोण काढत आहेत, त्यामागे त्यांचे काय उद्दिष्ट आहे हे उघडपणे जरी कुणी सांगत नसले तरी येत्या वर्षात निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकीपूर्वी हा सगळा खटाटोप करणे राजकारण्यांची विवशता आहे. तसे पाहिल्यास सकारात्मक मुद्द्यांवरसुद्धा निवडणुका लढल्या जाऊ शकतात, पण अलीकडच्या काळात नकारात्मक राजकारण करणे जास्तीचे लाभदायक ठरत आहे असे राजकीय मंडळींच्या लक्षात आले असावे. कारण सकारात्मक मुद्द्यांवर निवडणुका लढण्यासाठी ज्या विकासाचा मोठा गाजावाजा केला जातोतो विकास करून दाखवावा लागतो. बेरोजगारीची भयंकर समस्या आहे, ती सोडवावी लागते. कितीतरी प्रश्न आहेत, कितीतरी समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. गरिबीची समस्या कधी नाही इतकी गंभीर आहे. या समस्यांना आव्हानांना तोंड द्यावे लागते. जनकल्याणाची कामे करावी लागतात. पण राज्यकर्त्यांना असे वाटत असेल की आपण जर हेच सर्व काही करत बसलो तर सत्तेचे वैभव, ऐश्वर्य आणि सत्तेबरोबर येणारी पिढ्यान् पिढ्यासाठीचीसुबत्ता कशी लाभेल. आम्ही आमचे भवितव्य घडवायचे की सामान्य गोरगरिबांचे!

यावर दुसरा उपाय आहे राजकारण आणि धर्माचे मिश्रण इतके विस्फोटक असते की त्यासाठी फक्त नागरिकांच्या मनात एकमेकांविषयी धर्माधर्मांविषयी द्वेष पसरवला की बाकीचे सगळे आपोआप साधता येते. देशभर सांप्रदायिक वातावरण तापविले जात आहे. गतेतिहासातील पात्रांना कधीही जीवंत करून राजकीय पोळी भाजता येते. एकदा मतदारांचे ध्रुवीकरण झाले की मग जास्त परिश्रम कशाला? का बरे नागरिकांच्या समस्यांमध्ये स्वतःला गुंतवायचे! महाराष्ट्रात कोल्हापूर शहराला सांप्रदायिक सद्भावनेचा पूर्वापार चालत आलेला इतिहास आहे किंवा होता? (परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही.) येथे भाजपला कधी राजकीय यश लाभले नाही आणि म्हणून त्यांना आपले नशीब येत्या निवडणुकीत आजमावयाचे असेल त्यासाठी लांबलचक विधायक वाट धरायची आणि त्यासाठी काही करायची काय गरज. धर्म आणि राजकारणाचा द्रव वापरला की सगळे काही सहज सुलभ शक्य होते. म्हणून क्षुल्लक कारणावरून कोल्हापूरचे सांप्रदायिक वातावरण गढूळ करण्यात आले. कोण कुणाची औलाद याचा तपासही घेतला गेला. महाराष्ट्राचा एक विशिष्ट इतिहास आणि परंपरा आहे. समाजसुधारणा आणि पुरोगामी चळवळीची ही भूमी राहिलेली आहे. देशात सर्वत्र कितीही सांप्रदायिक ध्रुविकरण झाले असले तरी या राज्यात त्याचा प्रभाव पडला नाही. अशा या महाराष्ट्राची परंपरा जपणे राजकारण्यांचे कर्तव्य असो नसो, साऱ्या नागरिकांना आपले कर्तव्य समजून ही परंपरा जपावी लागेल.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget