समाधानाचा अभाव असणे हीसुद्धा एक मानसिक समस्या आहे. समाधान म्हणजे अल्लाहने माणसाला जे काही दिले आहे त्यावर समाधानी राहून जगणे. इतकेच नव्हे तर ते आपल्या हक्कांपेक्षा जास्त असल्याचे मानणे हीच वास्तविकता आहे. आपल्याकडे जे नाही पण गरजेचे आहे त्यासाठी माणसाने जरूर प्रयत्न करावे आणि एखाद्या कामात अपयशी ठरल्यास किंवा अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्यास पुन्हा प्रयत्न करावेत. यश नक्कीच मिळते, पण कधी असेही होते की माणूस आपल्या नशिबात नसलेल्या किंवा स्वतःच्या हितविरोधी असलेल्या गोष्टींच्या मागे चालतच जातो. अशा काही गोष्टी ज्यांना अल्लाहने आपल्या प्रिय भक्तापासून दूर ठेवल्या होत्या, त्यांना प्राप्त करण्यासाठी माणूस खूप पैसा आणि वेळ खर्च करतो. मग कधीतरी माणसाच्या लक्षात येते की आपण धरलेली वाट ही पुढे जाण्यासाठी नव्हतीच. ती तर परतीची वाट होती. ही वास्तविकता दर्शवतांना सऊद उस्मानी यांच्या ’कौस’ या पुस्तकातील एका गझलच्या दोन ओळी आठवतात,
इस राह पे इक उमर गुजर आए तो देखा,
ये राह फकत लौट के जाने के लिए है.
( urduweb.org )
अशा परिस्थितीत माणूस हताश होतो. मग आता पुढे जाण्यात काही अर्थ नाही, मागे फिरणेच बरे, हा विचार करून संयम बाळगल्यास उत्तम. नाही तर तो निराश होऊन बसून राहतो आणि त्याचे जीवन ठप्प होते.
आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी अशी वेळ येण्यापूर्वीच एका प्रार्थनेचे मार्गदर्शन केले आहे. ज्यामुळे नशिबात नसलेल्या गोष्टींमागे शक्ती खर्च करण्यापासून आपण वाचतो आणि आपल्याला मानसिक समाधानही मिळते. अल्लाहुम्-मगफिरली जंबी ववस्सिअ खुलुकी वतय्यिब ली कस्बी वकन्निअनी बिमा रजक्-तनी वला तुजहिब तलबी इला शयइं सर्रफतहू अन्नी (कन्जुल उम्माल अल्अद्इय्यितुल मुतलकह - 5061)
अनुवाद:-
हे अल्लाह! माझ्या अपराधांना क्षमा कर, माझ्या चारित्र्यात नैतिकतेचा विस्तार कर, माझी कमाई शुद्ध कर आणि तू मला जे काही दिले आहेस त्यात समाधान दे आणि तू माझ्यापासून टाळलेल्या कोणत्याही गोष्टीकडे माझे लक्ष जाऊ देऊ नकोस.
माणसाची ज्ञान क्षमता आणि दूरदृष्टी मर्यादित आहे. अजाणतेपणे तो अनेक भौतिक गोष्टींच्या प्रेमात पडतो. ज्या त्याला स्वत:मध्ये गुंतवून ठेवतात आणि खऱ्या उद्देशाकडे म्हणजेच अल्लाहची आज्ञापालन, भक्ती आणि स्मरणाकडे माणसाचे दुर्लक्ष होते. अशा वेळी भक्ताला त्यांच्यापासून दूर ठेवणे किंवा ते काढूनच घेणे ही तर अल्लाहची कृपाच आहे. अशा वेळी जीवनाच्या वास्तविक उद्देशात आपले लक्ष घालून त्यामध्ये वेळ व्यतीत करण्याची शिकवण इमानधारकाला देण्यात आली आहे.
अल्लाहुम्मा व मा जवयता अन्नी मिम्मा उहिब्बु फज्-अल्हु फरागं ली फीमा तुहिब्बु.( हदीस ग्रंथ तिर्मिजी - 3491) अनुवाद:- हे अल्लाह, मला आवडणाऱ्या गोष्टींमधून ज्यांना तू दूर ठेवले त्यांपासून मुक्त करून तुझ्या पसंतीच्या कामांसाठी मला शक्ती व सामर्थ्य दे. आमीन
क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 -
औरंगाबाद.
Post a Comment