Halloween Costume ideas 2015

सहकार चळवळींचे आद्य पुरस्कर्ते :राजर्षी शाहू छत्रपती


सहकार चळवळीत महाराष्ट्र राज्य भारतात अग्रेसर आहे.आणि कोल्हापूर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीवर असून त्याने मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान पटकावले आहे. इथल्या सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या विविध संस्थांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे.अर्थात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली ती केवळ राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्यामुळेच. कारण सहकारी संस्थांच्या स्थापनेपासून राजर्षी शाहू महाराजांच्या एका भाषणातील खालील उतारा याची साक्ष देतो...

".... पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, अक्कल, पैसा, व अंगमेहनत एकत्र केली पाहिजे, म्हणजे सहकार्य केले पाहिजे. पूर्वी फार तर एक कुटुंब एका ठिकाणी काम करीत व येणारा नफा त्या कुटुंबातील माणसांना उपयोगी पडे. आता ही आपली कुटुंबाची व्याख्या पुष्कळ विस्तृत केली पाहिजे. १०/२०/२५ कुटुंबे या उद्योगधंद्यांसाठी एक झाली पाहिजेत.... आपण सहकार्य करायला शिका. आपली सहकारी पतपेढी काढा. इतकेच नव्हे तर सहकारी कारखाने व सहकारी दुकानें ही काढा...."

कोल्हापूर जिल्हा आज आर्थिक बाबतीत सुसंपन्न झाला आहे, त्याला राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने संस्थानात राबविलेले आर्थिक धोरण व कृतीशील व्यवहार कारणीभूत आहे. संस्थांनी काळात कोल्हापूरात सहकारी चळवळीची कायदेशीर सुरुवात झाली असली तरी करवीर रियासतीतील रयतेच्या मनामध्ये आणि रक्तामध्ये "एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हा बाणा रूजला होता, याचे उत्तम उदाहरण म्हणजे इथला शेतकरी वाटेकरी आणि फड पध्दतीचा अवलंब करून सहकारी तत्त्वानेच शेती करीत होता. आजही ही पद्धत सुरू आहे. सार्वजनिक भिशीच्या माध्यमातून पूर्वीपासून सहकारी तत्त्वावर एकमेकांना आर्थिक मदत देण्याची पद्धत सुरू आहे. मुष्टीफंड योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांकडून धान्य गोळा करून त्याचे वाटप गरजूंना करायचे आणि नंतर ते सुगीत वसुल करायचे ही सहकार तत्वावर आधारित पध्दत कोल्हापूर संस्थानात फार पूर्वीपासूनची चालू होती.एकमेकांना सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने इथला गावगाडा हाकला जात होता. सहकार हे तत्व आचरणात आणून कोल्हापूर संस्थानातील प्रजाजनांनी फार पूर्वीपासून एक आदर्श निर्माण केला आहे.

१८४२ साली करवीर रियासतीच्या कारभारावर ब्रिटीशांनी अंमल सुरू केला होता.त्यांची करवीर संस्थानातील प्रत्येक चळवळीवर सुक्ष्म देखरेख होती. कोल्हापूर व दक्षिणी संस्थांनांचे पोलिटिकल एजंट मेजर ग्रॅहॅम यांनी करवीर संस्थानातील सर्व भागात फिरून अभ्यास केला होता. त्याचा एक अहवाल १८४७ साली प्रकाशित केला आहे. त्यात कोल्हापूर संबंधीच्या अहवालात स्पष्टपणे करवीरच्या जनतेच्या सहकारी व्रताची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. कोणतेही व कसलेही लिखित स्वरूपात नियम व कायदे नसतांना केवळ विश्वासाने आचरणात आणण्यात येत असलेल्या फड पध्दतीसारख्या सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पध्दतीचा मेजर ग्रॅहॅम यांनी उल्लेख केला आहे. अर्थात करवीर संस्थानात सहकारी चळवळीचा पाया एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस घालण्यात आलेला आहे.

१९०४ साली सहकारी चळवळीला कायद्याचा आधार देण्यासाठी हिंदुस्थान सरकारतर्फे एक कायदा करण्यात आला. पुढे सावकारशाहीच्या अन्यायी जोखडातून शेतकरी व कष्टकरी समाजाची सुटका व्हावी म्हणून १९१२ साली  सहकार संस्थाविषयक दुसरा कायदा ( को ऑपरेटीव्ह सोसायटी ॲक्ट) पारित केला. १९०४च्या  सहकारी कायद्यामुळे सहकार चळवळीची वाढ देशभरात होत होतीच. साहजिकच त्याचे लोण कोल्हापूर संस्थानात ही पोहोचले. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने व प्रोत्साहनामुळे सहकार चळवळ कोल्हापूर संस्थानात कायद्याच्या रूपाने रितसर सुरू झाली. नामदार भास्करराव जाधव कोल्हापूर नगरपालिकेच्या प्रशासक या पदावर कार्यरत असताना १९१३ साली राजर्षी शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानात तत्कालीन मुंबई राज्यातील सहकारी कायदा लागू केला. नगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारे भंगी,झाडुवाले आदींसह दूध कट्ट्यावर म्हैसींचे दूध काढून विकणारे कष्टकरी यांना पठाणी व्याज आकारून सावकार लोक मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत होते. हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यानंतर सावकारशाहीतूंन आपल्या गरीब,अज्ञानी जनतेची मुक्तता व्हावी म्हणून नामदार भास्करराव जाधव यांना आपल्या संस्थानात सहकारी तत्त्वावर एखादी सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित केले. अर्थात राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाप्रमाणे २४ मे १९१३ इ|| रोजी भास्करराव जाधव यांनी  "दि अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी" ची स्थापना केली. करवीर संस्थानातील सहकार चळवळीची मुहूर्तमेढ या निमित्ताने रोवली गेली.पुढे कोल्हापूरच्या पेठापेठांमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने अनेक सहकारी संस्था उभा राहिल्या.

सहकार तत्वाचे आद्य पुरस्कर्ते म्हणून राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या दूरदृष्टीने संस्थानातच नव्हे  तर महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक चळवळीत सहकारी संस्थांच्या माध्यमातून फार मोठे काम उभे राहिले आहे. त्याचे श्रेय रयतेचा राजा,दिनदलितांचा कैवारी राजर्षी शाहू महाराजांना द्यावे लागेल,यात संदेह नाही.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget