Halloween Costume ideas 2015

आपल्या कुकर्मांची जाहिरात करू नका : पैगंबरवाणी (हदीस)


प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, मी तीन गोष्टींची शपथ घेतो, एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीची संपत्ती दानधर्म करण्याने कमी होत नाही. ज्या माणसावर कुणी अत्याचार करतो आणि तो त्यावर संयम बाळगतो, अल्लाह त्याचा आदरसन्मान वाढवतो. जो कुणी लोकांना मागण्याचा दरवाजा उघडतो, अल्लाह त्याच्यावर दारिद्र्याचे दार उघडतो. मी दुसरी गोष्ट सांगतो, हे लक्षात ठेवा, जगात चार प्रकारचे लोक आढळतात. एक अशी व्यक्ती ज्याला अल्लाहने साधने दिलीत त्याचबरोबर ज्ञानदेखील दिले असेल, ती व्यक्ती धनदौलतविषयी अल्लाहच्या आज्ञा पाळतो. त्या संपत्तीतून अल्लाहचे अधिकार म्हणजे दानधर्म करतो. दुसरी अशी व्यक्ती ज्याला अल्लाहने ज्ञान दिले, पण धनदौलत दिली नाही, त्याची आकांक्षा असते की जर मलादेखील संपत्ती दिली असती तर मी देखील अमुक माणसाप्रमाणे खर्च केले असते. त्याला त्याच्या नियतीनुसार मोबदला दिला जाईल. एक अशी व्यक्ती ज्यास अल्लाहने धनदौलत दिली, पण तो अडाणी आहे, कसलाही विचार न करता कोणत्याही कामासाठी खर्च करत राहतो. त्याला अल्लाहची भीती नसते की इतरांच्या गरजांचा विचार करतो, ही सर्वांत वाईट अवस्था आहे. एक अशीदेखील व्यक्ती ज्यास अल्लाहने माल दिला नाही की ज्ञानही दिले नाही, तो मनातल्या मनात विचार करत राहतो की मला जर धनदौलत आणि ज्ञान लाभले असते तर मी देखील त्यांच्यासारखा ऐशआरामात जगलो असतो, त्याच्या नियतीनुसार त्याच्याशी व्यवहार केला जाईल. (अबु कबशा अन्सारी, मुसनद अहमद)

हजरत अब्दुल्लाह म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की, कोणत्याही माणसाचा शेवट त्याच्याबरोबरच होईल ज्याच्याशी त्याची जवळीक होती. (फतहुलबारी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर तुम्ही अल्लाहवर असा विश्वास ठेवला जसा त्याचा हक्क आहे, तर तो तुम्हाला तशाच प्रकारे उपजीविका देईल जशी पक्ष्यांना देतो. सकाळी ते आपल्या घरट्यांमधून बाहेर पडतात आणि संध्याकाळी पोट भरून परत येतात. (ह. उमर (र.), तिर्मिजी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जर एखाद्याला त्याच्या उपजीविकेमध्ये वाढ झाल्याने प्रसन्नता मिळत असेल आणि जास्त आयुष्य लाभले तर त्याने आपल्या नात्यांना जोडून ठेवावे. (ह. अबु हुरैरा (र.), बुखारी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, अशा व्यक्तीला सोडून ज्याने रात्री कोणते कुकर्म केले आणि सकाळी सगळ्यांना असे म्हणत राहिला की रात्री मी अशा प्रकारचा गुन्हा केला, बाकीच्या सर्व उम्मत (समुदायाला) क्षमा केली जाईल, कारण अल्लाह तर त्यांच्या पापांवर पडदा घालत होता आणि ही व्यक्ती स्वतःच सकाळी आपल्याकडून घडलेल्या गुन्हांची सर्वत्र चर्चा करत होता. (ह. अबु हुरैरा (र.), फतहुलबारी)

संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget