सोमवार, बाजाराचा दिवस. हबीबच्या वडिलांची लगबग सुरू होती. घोडा तयार करून, हबीबने तंबाखूचे लहान मोठे गाठोडे घोड्यावर लादले. मोकळी तंबाखू बाजारात विकायचा व्यवसाय. सात आठ मैलावर बाजाराचे गाव. आठवड्यातून चार ठिकाणचे बाजार करायचे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. पैकी सोमवारी बाजार भरत असलेले गाव चार पाच मैलावर होते. बाकी इतर गावे बरीच लांब लांब होती. त्यामुळे त्या गावांना गेले असता कधी-कधी मुक्काम पडायचा. पहाटे चार वाजताच निघावे लगायचे. तेव्हां हबीब एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात घोड्याची लगाम धरून घोड्यापुढे चालायचा. जेव्हा दिवस उजळू लागला तेव्हा हबीबचे वडील पुढे निघून जायचे आणि हबीब कंदील घेवून घराकडे परतायचा. परत येताना घोड्यासाठी चाऱ्याचा भारा डोक्यावर घेऊन यायचा.
घरी आल्यावर जेवण करून पुन्हा मामाच्या शेतावर गुरे राखायला जायचा. सोळा सतरा वर्षांचे वय. घरात मोठा हबीबच होता. तंबाखूच्या व्यवसायातून फार काही उत्पन्न मिळत नव्हते. इतर भावंडं लहान होती. त्यामुळे आई-वडिलांना हातभार लावण्याची जबाबदारी त्याच्यावर आली होती.
सोमवारी बाजार भरत असलेले गाव जवळ असल्याने वडील हबीबला सोबत घेऊन जायचे. बाजारातून भाजीपाला, किराणा खरेदी करायचा. त्या दिवशी मात्र रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. वातावरणात गारवा भरला होता. हबीब बरोबरच आज घोड्यालाही अस्तबल बाहेर निघावेसे वाटत नव्हते. परंतु हबीबचे वडील अतिशय जिद्दी माणूस. काही जरी झाले तरी बाजार चुकवायचा नाही असा त्यांचा नियम. गावात एखादी व्यक्ती मरण पावली असेल आणि बाजाराचा दिवस असेल तर हबीबचे वडील मयताच्या घरी भेट देवून यायचे आणि सरळ बाजारासाठी निघून जायचे. कोणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर म्हणायचे,
’जाणारं गेलं. त्याला दफन करणारे आहेत. हा फर्ज किफाया आहे. सगळ्यांनीच थांबावे असे काही नाही. बाजार गमावला तर खायचं काय? त्यातच येणारी उधारी अडकून पडते.’
हबीबच्या वडिलांच्या अंगी असलेली सक्ती वास्तविक पाहता ती त्यांची शिस्तप्रियता होती. स्वातंत्र्यापूर्वी ते सैन्यात होते. स्वातंत्र्य मिळाले तरी हैदराबाद स्टेट कायम होते. पोलीस अॅक्शन नंतर ते भारतात विलीन झाले. त्या वेळेस बऱ्याच दंगलीही घडल्या. आपण निजामाच्या सैन्यात होतो; त्यामुळे आपल्याला अटक करण्यात येईल. या भीतीपाई आपले गाव सोडून त्यांनी मुलाबाळांसह सासुरवाडीचा रस्ता धरला. सर्व होत्याचं नव्हतं झालं होतं. नंतर अनेक शिपाई परत भारतीय सैन्यात रुजू झाले परंतु; हबीबचे वडील एकदा जे गाव सोडून आले ते परत गेलेच नाहीत. सासरवाडीतच त्यांनी शून्यातून जीवन उभं करायला सुरुवात केली होती.
पावसाची रिपरिप चालूच होती. हबीब घोड्याची लगाम धरून उभा होता. पोत्याचे घोंगटे अंगावर घेऊन दोघे बापलेक निघाले. तंबाखू भिजू नये म्हणून त्यावरही पोते टाकले होते. त्याचा फायदा घोड्यालाही होत होता. चिखल इतका जास्त होता की बूट घालायची सोय नोव्हती. चिखल तुडवत बाजाराचे गाव जवळ करत होते.
अशा पावसाच्या रिमझिममध्ये कोण तंबाखू खरेदी करायला येणार? असा प्रश्न हबीबच्या मनात पुन्हा-पुन्हा येत होता. पण बापाला विचारण्याची हिम्मत मात्र नव्हती. पावसाच्या बुर्बुरीत थंड वाऱ्याची झुळूक यायची. ती अंगाला अधिकच बोचायची. थंडीमुळे काळीज अकडून गेले होते. चिखल तुडऊन तुडऊन पाय सुन्न झाले होते. गुडघ्यापर्यंत पायजमा खोऊन घोड्याप्रमाणे मान खाली घालून हबीब शांतपणे चालत होता.
शेवटी ते बाजारात पोहोचले. बाजारात चार दोन दुकाने लागली होती. बोटावर मोजावी इतकी माणसे बाजारात छत्र्या, घोंगड्या घेऊन फिरताना दिसत होती. बरेचसे लोक झाडांचा, दुकानांचा आश्रय घेऊन थांबले होते. पाऊस उघडण्याची वाट पाहत होते.
थोड्या वेळाने पाऊस उघडलं. इकडे तिकडे दडून बसलेले लोक बाजाराच्या दिशेने निघाले. व्यापाऱ्यानीही आपापली दुकानं थाटायला सुरुवात केली. पावसामुळे बाजारात चिखल झालेला होता. त्यामुळे जिथे जिथे चिखल नव्हते उंचवट्याचे भाग पाहून तिथे दुकानं लावल्या जात होत्या. हबीबच्या वडिलांनीही झटपट आपले दुकान लावले. तंबाखूच्या गाठोड्या सोडल्या. एकेक ग्राहक यायला सुरुवात झाली. तेवढ्यात त्यांनी हबीबला चहा सांगण्यास सांगितले.
हबीबने विचारले,किती चहा सांगू? त्याला वाटले, वडील दोन चहा सांगायला सांगतील. थंडीमुळे सगळं शरीर गार झालं होतं. विस्तव खावा असं वाटत होतं. (उर्वरित पान 7 वर)
गरम गरम चहा प्यायला मिळाला तर थोडी गर्मी येईल असे त्याला वाटत होते; परंतु वडील लगेच उत्तरले, किती म्हणजे काय, एक चहा सांग.
हबीब चुपचाप चहाच्या हॉटेलात एक चहा सांगून आला. वडिलांच्या शेजारी थांबला. थोड्या वेळाने वडिलांनी त्याला किराणा सामान आणि भाजीपाला आणायला सांगितले. हबीबने पिशव्या काढल्या. तेवढ्यात चहा वाला, चहा घेऊन आला. त्याच्या वडिलांनी चहाचे घोट घ्यायला सुरुवात केली. अर्धा चहा पिऊन झाला इतक्यात तंबाखू साठी गिèहाईक आले. वडीलांनी चहा बाजूला ठेवला आणि तंबाखू मोजू लागले. त्याने वडिलांना आठवण करून दिली चहा थंड होत आहे. हबीबला वाटले अर्धा कप तरी आपल्याला भेटेल. परंतु वडील म्हणाले, ठीक आहे, मी पिऊन घेईन तु जा अगोदर किराणा सामान, भाजीपाला घेऊन ये. तो चुपचाप तिथून निघून गेला.
संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने आईला ही सर्व हकीगत सांगितली. आईला वाईट वाटले. मग तिने जेवण झाल्यानंतर हबीबला चहा करून दिला.
सय्यद झाकीर अली परभणी
9028065881
Post a Comment