कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरपूर राहुल गांधींचा अमेरिका दौरा अनेक गोष्टींमुळे गाजला. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे त्यांनी मुस्लिम लीग या पक्षाला ’धर्मनिरपेक्ष पक्ष’ म्हणून संबोधित केले. यामुळे भारतामध्ये गदारोळ न माजला असता तरच नवल. अपेक्षेप्रमाणे अनेक पक्षांचे प्रवक्ते आणि स्वयंघोषित उग्रराष्ट्रवादी जल्पकांनी (ट्रोल्स) राहुल गांधींच्या या विधानाचा भरपूर निषेध केला. त्यांचा हा निषेध इतका पोटतिडकिने करण्यात आला होता की, अनेक तटस्थ लोकांनाही वाटू लागले आहे की, राहुल गांधींनी मुस्लिम लीग या पक्षाला धर्मनिरपेक्ष म्हणून संबोधायला नको होते. अशा परिस्थितीत मुस्लिम लीग राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच धर्मनिरपेक्ष आहे किंवा नाही, याची नेमकी माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या आठवड्यात हा विषय चर्चेसाठी घेतला आहे.
या आठवड्यात वॉश्गिंटन डिसीमध्ये पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी हे विधान केले होते. सर्वसाधारणपणे भारतीयांमध्ये असा समज पसरलेला आहे की, ऑल इंडिया मुस्लिम लीग हा पक्ष 76 वर्षांपूर्वी फाळणीसाठी जबाबदार होता. विशेष म्हणजे, हा प्रश्न राहुल गांधींनाच नव्हे तर यापूर्वी सुद्धा त्यांची आजी इंदिरा गांधी आणि पंजोबा जवाहरलाल नेहरू यांनाही विचारण्यात आला होता. तेव्हासुद्धा त्यांनी त्याच वेळेस या प्रश्नाचे उत्तर देऊन ठेवलेले होते. मात्र सामुहिक स्मरणशक्ती ही अल्प असते म्हणून या प्रश्नाचे उत्तर नव्याने देण्याची गरज निर्माण झालेली आहे.
सर्वप्रथम वाचकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, भारतामध्ये मुस्लिम समाजाएवढा धर्मनिरपेक्ष समाज दूसरा कोणताही नाही. या समाजाने स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या नेतृत्वाचा गळा आवळून हिंदू नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे. देशातील अनेक मुस्लिम बहुल मतदार संघांमधून हिंदू उमेदवार निवडून येतात. मात्र हिंदू बहुल मतदार संघातून मुस्लिम उमेदवार अपवादानेच निवडून येतो. मुस्लिम उमेदवाराला ठरवून पाडण्यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या बिगर मुस्लिम मतदारांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे.
मुस्लिम लीगबद्दल गैरसमज होण्याचे सर्वात मोठे कारण या पक्षाचे नाव आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग यामध्ये जो फरक आहे तोच बहुसंख्यांकांच्या लक्षात येत नाही. ऑल इंडिया मुस्लिम लीग ही स्वातंत्र्यापूर्वी स्थापन करण्यात आलेली होती आणि निर्विवादपणे त्यांनी फाळणीची मागणी केली होती. मात्र ऑल इंडिया मुस्लिम लीग ही स्वातंत्र्यानंतर 1948 साली स्थापन करण्यात आलेली आहे. या पक्षाची स्थापना तत्कालीन मद्रास प्रोव्हिन्समधील मोहम्मद इस्माईल या व्यक्तीने केलेली होती आणि अगदी स्थापनेच्या दिवसापासूनच हा पक्ष भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहील, असे स्पष्ट करण्यात आलेले होते. आजमितीला या पक्षाचा प्रभाव केरळ राज्यापुरता मर्यादित असला तरी केरळच्या प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये या पक्षाचे लोक मंत्री म्हणून असतातच. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक बी.आर.पी. भास्कर यांच्यामते, ’’या पक्षाचे लोक आपल्या नावामध्ये मुस्लिम जरी लावत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्यांची राजकीय वर्तणूक कधीच जातीवादी राहिलेली नाही, हा माझाच नव्हे तर केरळच्या प्रत्येक नागरिकाचा अनुभव आहे. म्हणून केरळामधील सुजान जनता या विषयाला जास्त लावून धरत नाही.’’
केरळ राज्यामध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाने 2021 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 8.27 टक्के मतं प्राप्त केली होती व या पक्षाचे 15 उमेदवार निवडून आलेले आहेत. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पक्षाने 5.48 टक्के मतं प्राप्त केली होती व दोन खासदार निवडून आले होते. याशिवाय, तामिळनाडूमध्ये सुद्धा एक जागेवर विजय प्राप्त केला होता. गेल्या अनेक दशकापासून केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (युडीएफ)मध्ये हा पक्ष सामील आहे.
औपचारिक धर्मनिरपेक्षता आणि वास्तविक धर्मनिरपेक्षता
ऑल इंडिया मुस्लिम लीग असो का दूसरा कोणताही मुस्लिम पक्ष असो त्यात बिगर मुस्लिमांना बरोबरीचीच नव्हे तर प्राधान्य तत्वावर वागणूक देण्याचा मुस्लिम पक्षांचा इतिहास राहिलेला आहे. आठवण करा बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना नांदेडमध्ये कसे खांद्यावर उचलून घेतले होते. ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन एवढे लांबलचक नाव असलेल्या पक्षातसुद्धा अनेक हिंदू नगरसेवक निवडून आलेले आहेत. 1967 मध्ये केरळामध्ये ईएमएल नम्बुंद्रीपाद (ब्राह्मण) यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा पहिल्यांदा कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले तेव्हा आययुएमएलला सत्तेमध्ये स्थान देण्यात आले होते. त्यावेळेस या पक्षाने घोषणा केली होती की, ’’सांप्रदायिक लीग मेली आहे, आमची लीग धर्मनिरपेक्ष लीग आहे.’’ केरळच्या जनतेचा जमिनीवरचा अनुभव हा आहे की, हा पक्ष दुसऱ्या धार्मिक समुदायाविरूद्ध ध्रुवीकरण करण्याच्या अभियानामध्ये कधीच सहभागी होत नाही. हां! मुस्लिम समाजाच्या सामाजिक व राजकीय सक्षक्तीकरणामध्ये या पक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. केवळ नावात मुस्लिम हा शब्द असल्यामुळे ती जातीयवादी असणारच असा जो जल्पकांनी (ट्रोल्स) होरा बांधलेला आहे तो त्यांच्या अल्पबुद्धीप्रमाणे जरी बरोबर असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. म्हणूनच राहुल गांधी यांना चिठ्ठी पाठवून ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दल त्यांनी म्हटले आहे की, ’’मुस्लिम लीग मध्ये धर्मनिरपेक्षतेच्याविरूद्ध कुठलीही गोष्ट नाही. मला वाटते की ज्या व्यक्तीने ही चिठ्ठी पाठविलेली आहे त्याने मुस्लिम लीगबद्दल व्यवस्थित वाचन केलेले नाही.’’
एक महत्त्वपूर्ण नोंद करण्याचा मोह येथे आवरता येत नाही. ती नोंद म्हणजे या पक्षाचे दोन मोठे दिग्गज नेते होवून गेलेले आहेत. एक बॅ.जी.एम. बनातवाला आणि दूसरे इब्राहीम सुलेमान सैत. 1992 मध्ये बाबरी मस्जिदच्या विध्वंसानंतर पक्षाचे नेते इब्राहीम सुलेमान सैत हे उग्र प्रतिक्रिया देण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाध्यक्ष बॅ.जी.एम. बनातवाला यांच्या नेतृत्वात पक्षाने त्यांना तशी प्रतिक्रिया न देण्याची सूचना केली. हा मतभेद एवढ्या टोकाला गेला की, पक्षामध्ये मानाचे स्थान असणारे इब्राहम सुलैमान सैत हे राजीनामा देऊन पक्षाच्या बाहेर निघून गेले.
मागच्या वर्षी संसदेमध्ये मागासवर्गीयांच्या अधिकारांसाठी या पक्षाच्या चारही खासदारांनी आवाज उठविला होता. जेव्हा त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले नाही तेव्हा त्या चौघांनीही संसदेसमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन विरोधसुद्धा केला होता.
इंडियन युनियन मुस्लिम लीग
इंडियन युनियन मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये भारतीय मुस्लिमांच्या अधिकारांना सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने झाली होती. 1938 ते 1942 या काळामध्ये जेव्हा देशात दंगलींचा आग्यामोहोळ उठला होता तेव्हा 1938 साली महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वार्तालाप केला होता. पण हा वार्तालाप कुठल्याही निर्णयाशिवाय संपला. तेव्हा मुस्लिम लीगने मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्या चौकशीसाठी एक समिती देखील स्थापन केली होती. मुस्लिमांच्या हिताच्या संरक्षणासाठी हा पक्ष जागरूक होता. काँग्रेसकडून मोहभंग झाल्यामुळे जिन्ना यांनी या पक्षाचे नेतृत्व स्विकारले होते. 23 मार्च 1940 रोजी सर्वात प्रथम लाहोरमध्ये ’पाकिस्तान प्रस्ताव’ मांडला गेला होता. काँग्रेस ही मुस्लिमांच्या हितांचे संरक्षण करण्यास उत्सुक नाही. म्हणून आम्हाला वेगळा पाकिस्तान हवा, अशी भूमिका त्यावेळेस या मुस्लिम लीगने घेतली होती. 22 आणि 23 मार्च 1942 मध्ये सर स्टिफर्ड क्रिप्स हे दिल्लीला आले आणि त्यांनी लीग आणि काँग्रेसच्या नेत्यांशी विस्तृत चर्चा केली आणि 30 मार्चला स्क्रिप्स मिशन ने आपला प्रस्ताव सादर केला ज्याला लीग आणि काँग्रेस दोघांनीही विरोध केला. त्यामुळे भारत छोडो आंदोलनाला सुरूवात झाली.
सप्टेंबर 1944 मध्ये महात्मा गांधींनी पहिल्यांदा मुस्लिम लीगच्या वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीबद्दल लीगचे म्हणणे ऐकूण घेतले. परंतु कुठलाठी ठोस निर्णय झाला नाही. कारण जिन्नांना वेगळा पाकिस्तान हवा होता आणि गांधींना हिंदू बहुमत असलेली तात्पुरती सरकार हवी होती ज्यात मुसलमानांची ओळख सुरक्षित राखण्याची हमी देण्यात येईल. हे मतभेद एवढे टोकाचे होते की, यातून मार्ग निघणे शक्यच नव्हते. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन पासून स्वतःला विलग करून इंडियन युनियन मुस्लिम लीगने वेगळ्या देशासाठी मुस्लिमांचे आंदोलन सुरू केले. त्यामुळे तुफान हिंसा झाली. याची सुरूवात 16 ते 18 ऑगस्ट 1946 च्या दरम्यान कलकत्ता येथे झाली. ज्यात चार हजार लोक मारले गेले. या घटनेला ’ग्रेट कॅलकटा किलिंग्ज’ म्हणून इतिहासात संबोधण्यात आले. याच हिंसेची आग बंगालच्या नोवाखाली जिल्ह्यात व बिहारपर्यंत पसरली. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की नाईलाजाने महात्मा गांधींना वेगळ्या पाकिस्तानची मागणी मान्य करावी लागली. येणेप्रमाणे 14 ऑगस्ट 1948 रोजी पाकिस्तान नावाचा एक देश नव्याने निर्माण झाला.
फाळणीचा इतिहास एवढा कटू आहे की, त्याच्या आठवणी आजही लोकांच्या स्मरणातून जात नाहीत. फाळणीचा फटका साहजिकच अल्पसंख्यांक मुसलमानांना जास्त बसला होता. तरी तिच्या कटू आठवणी विसरून भारताच्या प्रगतीमध्ये मुस्लिम समाजाने स्वतःला झोकून दिले. ज्या-ज्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी राष्ट्र बांधणीमध्ये आपली भूमिका बजावली. तरी परंतु भारतीय मुस्लिमांना काही जल्पक ’पाकिस्तान समर्थक’ याच नजरेतून पाहतात. चॉकलेटसाठी रडणारा मुलगा जसा चॉकलेट मिळताच शांत होतो तसा पाकिस्तान मागणारा मुठभर जमीनदारांचा समूह पाकिस्तान मिळताच शांत झाला. उर्वरित भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तान मागितलाच नव्हता किंवा त्या मागणीचे समर्थनही केले नव्हते. म्हणून पाकिस्तान मिळाला तरी हे मुसलमान स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रामध्ये राहण्याची संधी सोडून भारतातच राहिले. त्यांच्या या भावनेचा आदर केला जाणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने तसे झालेले नाही. बहुसंख्य मुस्लिम हे त्यावेळेसही काँग्रेस समर्थक होते, आजही काँग्रेस समर्थकच आहेत.
पाकिस्तान मागितलेही व मिळाल्यावर तेथे गेलेही नाही, असे कसे शक्य होईल? एवढी साधी गोष्ट काही लोकांना कळत नाही व पाकिस्तान समर्थक संबोधून ते भारतीय मुसलमानांच्या बावन्नकशी निष्ठेचा पदोपदी अपमान करतात.
सारांश, एकंदरित केरळमध्ये सध्या असलेली ऑल इंडिया मुस्लिम लीग ही पूर्वाश्रमीची इंडियन युनियन मुस्लिम लीग नाही व तिचे चरित्रही जातीयवादी नाही. हे राहुल गांधीचे विधान सत्य आहे. उलट या निमित्ताने बहुसंख्यांकांतील किती पक्ष जातीयवादी आहेत, याचा सुजान वाचकांनी स्वतः विचार करावा व नंतरच आपले राजकीय मत बनवावे. त्याशिवाय देश प्रगती करू शकणार नाही.
- एम. आय. शेख
Post a Comment