Halloween Costume ideas 2015

ख्वाजा मैनुद्दीन अजमेरी – चिश्ती विद्रोहाचे मुलाधार आणि परिवर्तन

इस्लाम हे जीवनाची मूल्ये सांगणारं तत्त्वज्ञान आहे. समाजातील शोषणाची दखल घेऊन त्याची सर्वकालीक कारणमिमांसा इस्लामने केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक शोषणाच्या व्यवस्थेला मूलभूत नकार देऊन, त्याला पर्यायी नैतिभ्क तत्त्वज्ञानाची उभारणी कुरआन आणि प्रेषितांच्या इस्लामी क्रांतीतून घडली. इस्लामच्या या मूल्यात्मक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व सूफींनी उभ्या केलेल्या चळवळीने जगाच्या विभिन्न प्रदेशात केले. जी व्यवस्था प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरब समाजात निर्माण केली, त्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सूफींनी अरबेतर अनेक देशांमध्ये संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष इस्लामच्या प्रसारासाठी जसा कारणीभूत आहे, तसा मानवी समाजात नव्या चिंतनाला जन्म देण्यासाठीदेखील उपकारक ठरला आहे.
सुफींच्या उदयाची कारणमिमांसा आणि त्याच्या उद्भवाच्या इतिहासाविषयी विविध मतांतरे आहेत. सूफिवादाच्या अर्थ विवेचनाविषयी देखील काही मतप्रवाह आणि प्रवाद आढळतात. या सर्व प्रवाहांनी सूफीवादाची व्याख्या केली आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या ‘तसव्वूफ’ या शब्दाशी निगडीत आहेत. तर काही व्याख्या सुफ्फा, सफ, सोफता, सोफानता, या शब्दांच्या आधारे मांडल्या जातात. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात मस्जिदीच्या दालनात राहणाऱ्यांना ‘अहले सुफ्फा’ म्हटले जात असे. त्यातून हा सूफी शब्द आल्याचे काहींचे मत आहे. वादांच्या आणि प्रवादांच्या गुंत्यामध्ये कोणतीही व्याख्या अंतिम मानता येत नाही. पण एक मात्र निश्चितपणे सांगता येईल की, इस्लामच्या तत्त्वचिंतनातून, सामाजिक शोषणाची दखल घेऊन परिवर्तनासाठी जीवनभर संघर्षरत राहण्यासाठी सूफींनी सर्व प्रकारचे समर्पण दिले. त्यांनी मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत इस्लामी सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक, राजकीय आणि जीवनविषयक मूल्यांच्या प्रस्थापनेचा प्रयत्न केला. भारतामध्ये इस्लामचा प्रसार हा तलवार आणि राज्याचा आधार घेऊन झाल्याचे मिथक मांडले जात असले तरी त्याची ऐतिहासिकता सिद्ध होऊ शकत नाही. कारण सूफी चळवळीच्या इतिहासाचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनांमध्ये आढळतात. ज्यामध्ये त्यांच्या मैदानी मानवी कार्याची आणि त्याद्वारे झालेल्या इस्लामच्या प्रसाराची माहिती विस्ताराने आली आहे.
भारतीय समाजाच्या उत्पादन व्यवस्थेतील जातप्रेरित शोषणाला सूफींनी नाकारले. इस्लामी श्रमसंहीततेतील शोषणविरहीत तत्त्वज्ञानाच्या प्रात्यक्षिकेतून त्यांनी श्रममूल्याचा इस्लामी सिध्दान्त भारतातील जातसंरचनेसमोर समतेचा पर्याय म्हणून मांडला. श्रमाचे मूल्य हे जन्मावरून अथवा अनैसर्गिक वर्णावरून निर्धारीत न करता श्रमाच्या व त्यातून निर्माण झालेल्या उत्पादनाच्या आधारे निर्धारीत करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या शोषणाची कारणमिमांसा करून सूफींनी विशेषतः चिश्ती संतांनी त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी सुलतानांना करप्रणालीतील दोष दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांच्याविरोधात आवाज उठवला. दुष्काळात शेतकऱ्यांच्या दुःखाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी दरबारी राजकारणाला आव्हान दिले. सूफी आणि राज्यकत्र्यांचा संघर्ष सत्तेच्या राजकारणातून नाही तर सामाजिक समस्यांच्या प्रतिनिधित्वातून उदयाला आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख व त्याचे निवारण हे सूफी आंदोलनातील सामाजकारणाची मुख्य प्रेरणा होती. इस्लामी समता व अर्थव्यवस्था हे त्यांच्या चळवळीचे मूलभूत तत्त्व आणि सद्भावना, प्रेम, संवाद हे त्याचे माध्यम होते.
भारतात सूफींचे आगमन
मॅक्झीम रॅन्डीन्सन हे इस्लामच्या आर्थिक संघर्षाचे टिकात्मक विश्लेषक मानले जातात. त्यांनी ‘इस्लाममुळे झालेले अर्थव्यवस्थेतील बदल, इस्लामची व्याजविषयक भूमिका, नफ्यातील श्रमाचा वाटा, गुंतवणुकीत श्रमिकांचे स्थान याविषयी सांगितलेल्या नियमांसंदर्भात विस्ताराने लिखाण केले आहे. इस्लामने अध्यात्मात केलेले बदल असतील अथवा अर्थव्यस्थेविषयी मांडलेले नवे तत्त्वज्ञान त्यामध्ये मानवी जीवनाच्या शोषणाविषयी त्याने घेतलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. अर्थकारणातील नैतिक अध्यात्माधारीत क्रांती हे इस्लामचे वैशिष्ट्य आहे.’ भारतातदेखील इस्लामचा प्रवेश हा बाजारातील हस्तक्षेपातून झाला आहे. मुस्लिम विजेत्यांनी भारतात पाऊल टाकण्याआधी अरब व्यापाऱ्यांनी इथे इस्लामी आर्थिक प्रेरणांच्या माध्यमातून नवविचारांची कृतीशील मांडणी केली होती. त्यांच्यापश्चात सूफींनी भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात हस्तक्षेपास सुरुवात केली.
त्यांचा हा हस्तक्षेप विद्रोहात्मक जरी असला तरी त्या विद्रोहाला विध्वंसाची किनार नव्हती. विद्रोहाची कृतीशील प्रबोधनात्मक मांडणी हे सूफींचे वैशिष्ट्य होते. भारतातल्या सूफी समाजक्रांतीचे सामाजिक दुःखाचे निवारण हे मुख्य कार्य होते. सूफींनी शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रात दिलेले योगदान प्रचंड मोठे आहे. रिचर्ड इटन हे भारतातल्या सूफी चळवळीचे आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक सूफी संताच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यावर संशोधन केले आहे. सूफींमधील चिश्ती पंथीय संताविषयीचे त्यांचे कार्य संशोधनशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या पध्दतीने मॅक्झीम रॅडीन्सन यांनी इस्लामी क्रांतीच्या आर्थिक परिणामाला आपल्या लेखनातील प्रमुख घटक मानले आहे. त्याच पध्दतीने रिचर्ड इटन यांनीदेखील सूफींच्या भारतातल्या जातसंरचनेतील अर्थकारणाची दिशा, त्यातून होणारे शोषण आणि सूफींच्या क्रांतीनंतर जातसंस्थेतील शोषणातून शेतकरी व श्रमिकांची झालेली मुक्ती याविषयी मांडणी केली आहे. पण त्यांचे हे संशोधन दखनेपुरते मर्यादित आहे.
दक्षिणेत आलेले सूफी हे मूलतः चिश्ती आणि कादरी पंथाचे होते. अपवादात्मक ठिकाणी अन्य पंथांचे संत व त्यांच्या कार्याचे दाखले आढळतात. दक्षिणेत मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या चिश्ती संतांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र दिल्लीच होते. दिल्ली परिसरात ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती, नसिरुद्दीन चराग दहेलवी, ख्वाजा निजामुद्दीन औलीया यांनी या आंदोलनाचे विशेषत्वाने नेतृत्व केले. त्यामुळे चिश्ती आंदोलनाच्या भारतातील स्थापनेची भूमिका समजून घेण्यासाठी उत्तरेतला या चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे.
चिश्ती आंदोलनाची भारतात सुरुवात आणि त्याचा प्रसार ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्यामुळे झाला. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांनी भारतात आगमनानंतर इथले समाजवास्तव समजून घेऊन आपल्या कार्र्याची दिशा ठरवली. प्रस्थापित सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थेतील बदलासाठी त्यांनी समन्वय, संवाद आणि प्रबोधनातून विद्रोह अशी भूमिका घेतली. दिल्ली परिसरात त्यांनी उभ्या केलेल्या अनेक अन्नछत्र (लंगर), विद्यापीठे, वैद्यकीय केंद्रांमुळे सामान्य माणसाशी त्यांचा संवाद प्रबळ होत गेला. त्यामुळे समाजजीवनात क्रांतीकारक बदल घडून आले. या कारणानेच सूफी चळवळीत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांचा अभ्यास विशेषत्वाने केला जातो. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती सूफीवादातील चिश्ती शाखेची सुरुवात ख्वाजा अबू अहमद अब्दाल चिश्त (मृ. ९६५ इसवी) यांच्यापासून मानली जाते. ज्या चिश्तमधून चिश्ती विचारधारा जन्मली तिथे त्याचा प्रसार होऊ शकला नाही. सुरुवातीला चिश्ती परंपरेचे वैचारिक नेतृत्व (खिलाफत) ख्वाजा अहमद, ख्वाजा रुक्नुद्दीन, ख्वाजा हाजी शरीफ यांनी केले. पण त्यांच्यानंतर या विचारधारेचा विकास होऊ शकला नाही. काही काळ या शाखेच्या प्रसाराला मर्यादा आली असली तरी नंतरच्या काळात भारतीय उपखंडातून चिश्ती परंपरेला ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांचे सक्षम नेतृत्व मिळाले. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांचा जन्म अफगाणिस्तानात सिस्तान प्रांतातील संजर शहरात इसवी सन ११४२ साली पत्करले. खुरासानमध्ये असतानाच त्यांची भेट सूफी अवलिया इब्राहीम कन्दोजी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या सान्निध्याने युवावस्थेतील मैनुद्दीन यांच्यामध्ये मोठे परिवर्तन घडून आले. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती विकली. आणि त्यातून मिळालेला पैसा गरीबांत वाटला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कधीही गरजेपेक्षा अतिरिक्त संपत्तीचा संचय केला नाही. रुबेन लेव्ही यांनी वरकड संपत्तीचा त्याग करण्याच्या प्रेषितांच्या धोरणाविषयी अत्यंत विस्ताराने लिखाण केले आहे. प्रेषित सातत्याने आपल्याकडे असणारा अतिरिक्त पैसा सायंकाळी घरी परतण्याआधी गरीब, वंचित, गरजूंमध्ये वाटत असत. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांनी प्रेषितांच्या जीवनविषयक धारणांना आपली जीवनमूल्ये म्हणून स्वीकारले होते. त्यांनी कधीही संपत्तीचा संचय केला नाही. कोणत्याही याचकाला त्याची गरज पूर्ण करण्याची साधने उपलब्ध असतील तर निराश करून परत पाठवले नाही. खुरासानमध्ये राहिल्यानंतर काही काळाने त्यांनी निशापूर येथून भारताकडे प्रस्थान केले. निशापूरवरून भारताला येत असताना त्यांना प्रवासात अनेक सूफी साधक भेटले. सुरुवातीला ते आपल्या साधकांसह बगदादला गेले. वैद्यकीय केंद्र आणि विद्यालयांची स्थापना
भारतात आल्यानंतर हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांनी सामान्य माणूस व त्याच्या नैसर्गिक हक्क अधिकारांसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी दिल्ली व अजमेर परिसरात आपल्या साधकांना या कार्यासाठी प्रेरीत केले. मक्तब, मदरसा आणि वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षणासाठी प्रयत्न केले. तत्कालीन भारतीय शिक्षणव्यवस्थेत ही बदलांची नांदी होती. भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये युनानी, अरबी तत्त्वज्ञानाचा प्रवेश या सूफी शिक्षणपद्धतीमुळे घडून आला. त्या काळात मदरसा आणि विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी कोणालाही बंदी नव्हती. सूफींच्या कव्वाली या प्रबोधन काव्यातून जीवनाच्या हक्क, अधिकार आणि सामाजिक कर्तव्यांपासून गाफील असणाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करुन दिली जात असे. चिश्ती सूफींनी उभ्या केलेल्या मदरसा आणि विद्यालयांना तत्कालीन मुस्लिम शासकांनी कालांतराने प्रचंड मदत केली. मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांनुसार दिल्लीत १३ व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्ली परिसरात शेकडो विद्यालये सुरु होती. त्यामध्ये तुर्कस्तान, बगदाद, अफगाणिस्तान इराण वगैरे भागातून आलेले शिक्षक सेवा बजावत होते. विद्याथ्र्यांना राहण्यासाठी वस्तीगृहांची सुविधादेखील करण्यात आली होती. दिल्ली व राजस्थानच्या काही भागांमध्ये शिक्षणांच्या प्रचंड सुविधा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळेच देशविदेशातील विद्यार्थी येथे शिक्षणसाठी येत असत. अल् बेरुनी, जियाउद्दीन बरनी, मिनहाजुल सिराज वगैरे इतिहासकारांनी दिलेल्या माहितीवरुन तत्वâालीन शिक्षणपद्धतीची माहिती मिळते. त्या वेळी तत्त्वज्ञान, युनानी विचारवंत, अरब साहित्य, अरबी भाषा, व्याकरण, कुरआन, कुरआन विश्लेषण, हदीस शास्त्र, मौखिक इतिहास कथन परंपरा व त्याच्या पद्धती यांसह अनेक भाषांचे शिक्षण दिले जात होते. मुहम्मद हबीब यांचे नसिरुद्दीन चराग दहेलवी यांच्याविषयचे संशोधन महत्त्वाचे आहे. त्यावरुन तत्वâालीन समाजजीवन व सूफी प्रणित बदलांच्या प्रक्रियेची माहिती मिळते.
हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्या साधकांमध्ये अनेक हकीमदेखील होते. त्या हकीमांच्या माध्यमातून सामान्य माणसांसाठी वैद्यकीय सुविधादेखील उपलब्ध करुन दिल्या होत्या. जहांगिरनामाच्या नोंदीवरुन या हकिमखान्यांमधल्या सुविधा व त्याविषयीच्या इतिहासाची माहिती मिळते. सामान्य माणसाला वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी सूफींनी प्रयत्न केले होते. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्या खानकाह (सूफी केंद्र) मध्ये वैद्यकीय उपचारासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत. सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतेविषयी भूमिका ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती हे अजमेर परिसरात येण्यापूर्वी पृथ्वीराजच्या दरबारात अनेक साधू आश्रयाला होते. मैनुद्दीन चिश्ती अजमेरमध्ये निवासास आल्याची बाब त्याला समजली. मैनुद्दीन चिश्ती यांच्या अजमेर निवासामुळे पृथ्वीराज नाराज होता. त्याने आपल्या दरबारातील राजगुरु रामदेव यांना मैनुद्दीन चिश्ती यांच्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी पाठवले. शास्त्र, तत्त्वज्ञानविषयक चर्चेसाठी रामदेव आल्यानंतर मैनुद्दीन चिश्ती यांनी त्यांचे स्वागत केले. चर्चेच्या पहिल्याच टप्प्यात राजगुरु रामदेव यांनी पराभव स्वीकारला. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या साधकांसह इस्लामचा स्वीकार केला. सूफी चळवळीचे अभ्यासक रामपूजन तिवारी यांनी या चर्चेची माहिती विस्ताराने दिली आहे. या घटनेनंतर जादूगार जयपाल योगी याला पृथ्वीराजने आपल्या जादूच्या प्रभावाने ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांना नष्ट करण्याविषयी आदेश दिला. जयपाल योगी हा मैनुद्दीन चिश्ती यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी आपल्या अलौकीकज्ञानाने त्याच्याकडून दृष्टिभ्रमाचा आधार घेऊन केल्या जाणाऱ्या जादूचा फोलपणा उघड केला. जयपाल योगीचा हा पराभवच होता. त्याच्या पराभवामुळे परिसरातील त्याची दहशत मोडीत निघाली व त्याने पसरवलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झाली. एके दिवशी मैनुद्दीन चिश्ती यांनी आपल्या आश्रमात स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यांनी आश्रमातील प्रत्येक व्यक्तीला जेवणाच्या पंक्तीवर बसण्यासाठी बोलावण्याची सूचना साधकांना केली. साधक उठले आणि आश्रमात प्रत्येक व्यक्तीला त्यांनी बोलावले. पण एका अस्पृश्य जातीतील सफाई कामगाराला त्यांनी बोलावले नाही. हे पाहून मैनुद्दीन चिश्ती यांनी साधकांना त्याचे कारण विचारले तेव्हा साधकांनी तो अस्पृश्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मैनुद्दीन चिश्ती यांनी जोपर्यंत त्या अस्पृश्य समजलल्या जाणाऱ्या भावंडाला इथे बोलावले जात नाही तोपर्यंत आपण जेवण करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर साधकांनी त्यांची क्षमा मागितली व त्या व्यक्तीस बोलावले. मग मैनुद्दीन चिश्ती यांनी त्याच्यासोबत जेवण केले. अस्पृश्यता व जातीय विषमतेच्या विरोधातील असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येऊ शकतील.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वर्णवर्गस्त्री-दास्यांतासाठी जी भूमिका अरबस्तानात घेतली होती, त्यासाठी हजरत मैनुद्दीन चिश्ती यांनी भारतात संघर्ष केला. इस्लामच्या वर्णवर्ग स्त्रीदास्यांतविरोधी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी इथे चिश्ती चळवळीची मूहुर्तमेढ रोवली. त्यांच्या प्रयत्नातून हजारोंच्या संख्येने वर्णशोषितांना मुक्ती मिळाली. भारतात त्यांनी चार दशकांहून अधिक काळापर्यंत हे मानवतावादी कार्य केले. पण दुर्दैवाने भक्ती आंदोलन, वारकरी चळवळीची भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात दखल घेतली जाते, तशी दखल सूफी चळवळीची घेतली जात नाही.

–सरफराज अहमद
मो.क्र.९५०३४२९०७६
(सदस्य गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget