Halloween Costume ideas 2015

दिल्लीवर स्वारी!

आज पक्षाचा वर्धापनदिन होता. भल्या पहाटे उधोजीराजेंना जाग आली तेव्हाच अंगात उल्हास सळसळत होता. पहाटे पहाटेच स्वर्गीय पिताश्रींनी स्वप्नात येऊन आशीर्वाद दिले होते.शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविण्याचे वचन पूर्ण केले त्याबद्दल त्यांनी पाठही थोपटली होती आणि मुख्य म्हणजे आपल्या अत्यंत लाडक्या शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविल्याबद्दल अभिनंदनही केले होते !    आणि त्या आनंदाच्या भरात उधोजीराजेंनी आपल्या स्वर्गीय पिताश्रींना, 'आता मी तुमच्या लाडक्या शिवसैनिकास पंतप्रधान बनविणारच, बनविणार म्हणजे काय नक्कीच बनविणार. किंबहुना मी तर म्हणीन की मनातल्या मनात मी तसे बनवून ही टाकले आहे. कोणाला जर भविष्यात डोकावण्याची सिद्धी प्राप्त असेल तर त्याला आजपासून चार वर्षानंतरच्या वर्तमानपत्रात पंतप्रधान म्हणून शिवसैनिकाचं नाव आजही दिसू शकेल. माझं वचन म्हणजे पांढऱ्या कागदावर छापलेली काळी अक्षरं आहेत. ती मिटवली नाही जाऊ शकत. कोणी कितीही दगाबाजी केली तरी ती मिटवली नाही जाऊ शकत. फारतर तो कागद त्या अक्षरांसोबत रद्दीत जाऊ शकतो !'असं वचनही देऊन टाकलं होतं. पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं असं म्हणतात, पण पहाटेच्या स्वप्नात दिलेलं वचनही खरं होतं का, हे कोणाला तरी विचारायला हवं असा विचारही त्यांच्या मनात डोकावून गेला. आजच्या वर्धापनदिनाच्या शुभमुहूर्तावर ही घोषणा करून आपल्या मावळ्यांमध्ये नवीन प्राण पुâंकायचेच असा निश्चय करून राजेंनी चहाचा कप तोंडाला लावला.
-२-

घोषणा करून दोन दिवस झाले होते. उधोजीराजे सकाळी प्रसन्न चित्ताने 'मातोश्री'च्या गॅलरीत उभे होते. अचानक समोरून तोंडाला मास्क लावलेला एक जाडगेलसा घोडेस्वार येऊन गेटवर थांबला. एक लिफाफा द्वारपालाच्या हातात देत गॅलरीकडे पाहून तो काहीतरी बोलला. याला आधी कुठेतरी पाहिलं असावं असं उधोजींना वाटत होतं. मास्कच्या आडून तो आपल्याकडे पाहून हसतोय असाही त्यांना क्षणभर भास झाला. थोड्याच वेळात द्वारपालाने कुर्निसात करीत त्यांच्या हातात एक लिफाफा दुरूनच ठेवला आणि परत कुर्निसात करून तो निघून गेला.उधोजींनी सोफ्यावर बसत लिफाफा उघडला आणि ते वाचू लागले.
‘प्रिय छोटा भाई उधोजी, केम छो ? बहोत दिनोसे तुमसे मिला नही. तुमची काळजी वाटते. हे करोना आणि चपटे नाकवाले यांनी परेशान कर रख्खा है, वरना मीच तुमच्या मुलाकतीला आलो असतो. मागच्या वेळी तुम्ही छोटूला घेऊन आला होता. मी छोटूला जवळ घेत त्याच्या पाठीवरून प्रेमाने हातही फिरवला होता. फिरवला होता की नाही फिरवला होता ? याद तो छे ना ? मै तो अब तलक नही भुला.अजून त्या आठवणी ताज्या आहेत. आने स्नेह कहेवामा आवे छे . मी कधीपासून तुम्हाला दोघांना भेटण्यासाठी बेचैन आहे आणि आता बातमी आली की तुम्ही दिल्लीच्या तख्तावर कब्जा करण्याचे ठरविले आहे.खात्री करून घ्यावी म्हणून तुमच्या जुन्या मित्राला फोन केला तर तो म्हणतो, ' वो कुछ भी कर सकता है !' तुमचा फारच धसका घेतलेला दिसतो त्याने !आतापर्यंत तुमचे ते बोरूबहाद्दर संपादक दिल्लीची रेकी करायला निघाले सुद्धा असतील. तुम्हाला मी छोटा भाऊ मानतो, म्हणून तुमचं हित कशात आहे हे तुम्हाला सांगणं मी माझं कर्तव्यच समजतो. तुम्ही मुख्यमंत्री बनून पछतावत आहात हे मला माहित आहे. हुं भगवाननी शपथ लेवू छुं , मी पण पंतप्रधान बनून तुमच्यापेक्षाही जास्त पछतावतो आहे. आधीच एक दुःख भोगत असतांना परत त्याच्यापेक्षा मोठं दुःख तुम्ही स्वतःहून ओढवून घेऊ नये असे वाटते. छोट्या भावाने मोठ्या भावाला तख्तावरून खाली खेचणे कसे वाटते ? ते सारू लागे छे ? असं करायला आपण का मोगल आहोत का ? तुम्ही राहता तो महाराष्ट्र शिवरायांचा आहे. हा देशही शिवरायांचाच आहे. आहे की नाही ? मग आमच्या सोबत या. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या त्या बोरूबहाद्दराला रक्षा मंत्री बनवून एक मोठा बांबू हातात देऊन चीनच्या सीमेवर उभा करून टाकू ! ही चिट्ठी घेऊन मुद्दामच तुमच्या जुन्या मित्राला पाठवत आहे. जमल्यास परत जुळवून घ्यावे. अध्र्या रात्री काहीही गरज पडली तर सांगा, राज्यपालांना सांगतो. सुज्ञास सांगणे न लगे.'
आपला सख्खा मोठा भाऊ
नमोजी दिल्लीवाले


पत्र वाचून बुचकाळ्यात पडलेल्या उधोजीराजेंनी एकदा गॅलरीत जाऊन खाली डोकावून पाहिले. तो मास्क लावलेला घोडेस्वार वरतीच पाहत उभा होता. परत आत येत सोफ्यावर बसून राजेंनी कागद पेन हातात घेतला.
आदरणीय नमोजी, आपली चिट्ठी मिळाली. चिट्ठी घेऊन येणारा कोण होता हे कळले. हल्ली या मास्कमुळे मी माझ्या दारावरच्या चपराश्यालाही ओळखत नाही.असो. बरे झाले आपण येणाऱ्या टपाल्याबद्दल कल्पना दिली ते. आता पूर्ण 'मातोश्री' गोमूत्राने धवून घ्यावी लागेल. मागे ही  'वर्षा' बंगला शुद्धीकरणासाठी आठ दिवस गोमूत्रात बुडवून ठेवावा लागेल असे आमच्या पुरोहिताने सांगितल्यामुळे तेथे राहावयास जाणे रद्द केले होते. आता दिल्लीच्या तख्तावर चालून येण्याचं म्हणाल तर मी माझ्या पिताश्रींना स्वप्नात तसा शब्द देऊन बसलोय आणि स्वप्नात दिलेलं वचनही पाळण्याची आपली भारतीयांची परंपरा आहे, हे काय मी तुम्हाला सांगायला हवं का ? मी मुख्यमंत्री बनून पछतावतोय हे साफ खोटं आहे. तुम्हाला तशी खबर देणारा खोटारडा असावा. असावा काय आहेच मुळी. किंबहुना मी तर म्हणीन की त्याला खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही जमतच नसावं. तुम्ही  पत्र लिहिण्यास थोडा उशीरच केला. आतापर्यंत आमचे सरदार दोनदा दिल्लीची रेकी करूनसुद्धा आले. संरक्षण मंत्रीपद आम्हाला नको. आपली इच्छा असल्यास आमच्या मंत्रिमंडळात ते खाते नव्याने निर्माण करून या आपल्या टपाल्याला देऊन टाकीन. कळवावे. तूर्त आपल्या मदतीची गरज नाही. बारामतीकर समर्थ आहेत. एकाच वेळी दोन घोड्यांच्या पाठीवर बसता येत नाही एवढं ज्ञान मला आहे. तरी गरज पडलीच तर आपल्याला कळवतो.
आपला लहान भाऊ
‘महाराष्ट्रश्री'
उधोजीराजे वांद्रेकर

ता. क. :- आपल्या आठवणीने छोटू अजूनही मोहरून उठतो. लहान आहे. अजून समज आली नाही.येईल हळूहळू.

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र.:७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget