Halloween Costume ideas 2015

स्पर्धा परीक्षेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या अल्प यशाला कारणीभूत असलेले मुस्लिम समुदायातील प्रश्न

महाराष्ट्र राज्यसेवा २०१९ चा अंतिम निकाल काल आयोगाने जाहीर केला. मागील वर्षीच्या दुष्काळानंतर या वर्षी मुस्लिम समाजातील ४ विद्यार्थ्यांनी अंतीम यादीत स्थान प्राप्त केले, या सर्वांचे सर्वप्रथम अभिनंदन. कु. वसिमा शेख हिने महाराष्ट्रात मुलींमधून तिसरा क्रमांक पटकावून उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तीचे विशेष कौतुक. मुस्लिम समाजातील मुलींसमोर तिने एक आदर्श निर्माण केला आहे. हा निकाल आनंददायी असला तरी समाधानकारक निश्चितच नाही. या निकाला सोबत मुस्लिम समाजातील शिक्षण आणि शासकीय नोकरीतील मागासलेपणा / प्रतिनिधित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील ४ वर्षांची आकडेवारी पाहा-
 
राज्यसेवा जागा यशस्वी मुस्लिम उमेदवार
२०१९- ४३१ ४ (०.९२ टक्के)
२०१८- १३६ ० (० टक्के)
२०१७- ३७७ २ (०.५३ टक्के)
२०१६- १३० ० (० टक्के)

( टीप : २०१६ आणि २०१७ च्या निकालाचे pdf उपलब्ध नसल्याने माहिती मधे थोडा फार बदल असू शकतो.)
महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समाज हा ११.५ टक्के (२०११ सेन्सस) आहे पण शासकीय नोकरीमध्ये हे प्रमाण ०-१ टक्के इतके कमी म्हणजे नसल्यातच जमा आहे. यामुळे मुस्लिम समाजाची शैक्षणिक आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये झालेली वाताहत, त्यांचा मागासलेपणा यांची कारणमीमांसा करणे, याविषयी उघड चर्चा करणे आणि प्रत्यक्ष उपाययोजना करणे अत्यावश्यक बनते.
आत्मपरीक्षण करताना दुसऱ्यांवर दोषारोप करण्यापूर्वी समाजातील अस्तित्वात असलेल्या प्रश्नांवर उहापोह करणे आवश्यक आहे.

१) अज्ञान किंवा माहितीची अनुपलब्धता :
मुस्लिम समाजातील बहुतांश लोकांना स्पर्धा परीक्षा, त्याची पद्धत, त्याची रचना या बद्दल फारशी माहिती नाही किंवा असली तरी ऐकीव माहिती आहे. उदा. यूपीएससी मध्ये तीन टप्पे असतात प्रीलिम, मेन्स, इंटरव्ह्यू आणि या सर्वांच्या शेवटी अंतीम निकाल जाहीर होतो. पण मुस्लिम व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मागच्या वर्षीच्या उत्तीर्ण झालेल्या मुलांची यादी या वर्षीच्या तिन्ही टप्प्याच्या निकालावेळेस फिरत असते.मग अंतीम निकाल लागल्यावर पुन्हा नवीन यादी याच चक्रातून जाते. म्हणजे वर्षभरात यूपीएससी चा व्हॉट्सअप ग्रुप वर ४ वेळा निकाल लागतो. यावरून समाजात किती अज्ञान आहे याची प्रचिती येते.

२) मराठी भाषेचे अपुरे ज्ञान :

साधारणपने समाजातील गरीब वर्गातील मुले उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात तर उच्च वर्गातील मुले ही इंग्लीश माध्यमातून शिक्षण घेतात त्यामुळे मराठी भाषेचं त्यांचं ज्ञान फार मर्यादित आहे. पण एमपीएससी साठी उपलब्ध संदर्भ ग्रंथ, मार्गदर्शन, अभ्यास साधने ही बहुतांश मराठीत उपलब्ध आहेत. तसेच एमपीएससी मेन्स मध्ये एक पूर्ण पेपर हा मराठी भाषा विषयाचा आहे. त्यामुळे भाषा हा सर्वात मोठा अडथळा मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर आहे. (उत्तर भारताचा विचार केला तर तेथील मुस्लिम समाज हा हिंदीशी एकरूप झालेला आहे आणि उर्दू ही तिथली दुय्यम राजभाषा देखील आहे तसेच दक्षिणेतील मुस्लिम समाज हा तेथील प्रादेशिक भाषेत निपुण आहे पण महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचे भाषेच्या बाबतीत मात्र मराठी, उर्दू आणि इंग्रजी मधे सँडविच झाले आहे.)

३) पदवीधर युवकांचे अत्यंत कमी प्रमाण :

लोकसेवा आयोगाच्या बहुतांश सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पात्रतेची अट ही 'कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे' ही आहे. मात्र सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम पदवीधर युवकांचे प्रमाण केवळ २.२ टक्के इतके कमी आहे. कदाचित आता ते ३ टक्के पर्यंत पोचले असेल . याचा दुसरा अर्थ असा की समाजातील ९७ टक्के विदयार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्रच नाहीत म्हणजे यांना शासकीय नोकरी भेटण्याचा प्रश्नच नाही. उरले फक्त ३ टक्के.

४) पर्यायी रोजगाराची उपलब्धता :
महाराष्ट्र हा उद्योगप्रधान आणि प्रगतिशील राज्य आहे, यामुळे आयटी, खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे मेडिकल, इंजिनिअरिंग, व्यावसायिक पदवी उत्तर्ण झाल्यावर मुलांचा काल हा या क्षेत्राकडे जातो. तसेच मुस्लिम समाजात स्वतःचा व्यवसाय करण्याचे प्रमाण खूप मोठे आहे त्यामुळे मुलाला आपल्या वडिलांकडून चांगला प्रस्थापित झालेला व्यवसाय वश्र्यामध्ये मिळतो आणि मुलगा पुढे तोच व्यवसाय सांभाळतो. (युपी, बिहार मधे अशी परिस्थिती नाही. खाजगी नोकऱ्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांसमोर स्थलांतर करणे किंवा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणे हे दोनच उपाय शिल्लक राहतात. यामुळे तिथल्या मुस्लिम समाजातील युवकांचा शासकीय नोकरीतील प्रमाण जास्त आहे.)

५) मोठे ध्येय / स्वप्न नसणे ( अल्पसंतुष्ट ) :
व्यवसायिक पदवीनंतर महाराष्ट्रात सहज चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध असल्याने मुस्लिम युवक त्यातच समाधान मानतात किंवा घरची आर्थिक परिस्थिती त्यांना तस करण्यास भाग पाडते. लवकर कमावते होण्यासाठी मोठी स्वप्न पाहण्यास , आयुष्यात धोका पत्करन्यास ते टाळतात. इथे आपण समाजातील स्पर्धापरीक्षेत यशस्वी होण्यासाठी सर्वात क्षमतावान (पोटेन्सियल) असलेला युवक वर्ग गमावतो. ६) स्पर्धा परीक्षांबद्दल समाजात असलेले गैरसमज :
मुस्लिम युवकांना स्पर्धापरीक्षा पासून दूर ठेवण्यात समाजातील याबद्दल असलेले गौरसमज मोठ्याप्रमाणावर कारणीभूत आहेत. उदा. अपने बच्चे होते राहते क्या उसमे पास , इंटरव्यू में पास नहीं करते वो अपनेकू इ. सोबतच एका महाभागांनी माहिती नसताना उगाच आरोप करत एक व्हिडिओ बनवला, त्यांच्या मते- 'हे चार ऑप्शन वाले पुढे चालून आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलांना एमपीएससी / यूपीएससी करू देऊ नये.' अशा या गैरसमजुतीने आईवडील सुध्धा मुलांना स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र निवडू देत नाहीत किंवा विदयार्थी स्वतः या क्षेत्राकडे येण्याचे टाळतात.
या सर्व दिव्यातून जाऊन जर कोणी स्पर्धा परीक्षा करण्याचे ठरवलेच तरी त्यांच्या सर्व समस्या येथे संपत नाहीत तर आता कुठे त्या सुरू होतात. त्याची चर्चा आपण पुढील लेखात करू या.
स्पर्धा परीक्षांचे विश्व हे घोड्यांच्या अदृश्य शर्यती प्रमाणे आहे.धावणारे घोडे एकमेकांना दिसत नाहीत पण प्रत्येकजण आपापल्या वेगाने धावत असतो.अंतीम निकाल जाहीर होपर्यंत कोणालाच याची कल्पना नसते की सर्वात वेगाने कोणते घोडे धावत होते.शर्यतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कमकुवत घोडे मागे पडत जातात आणि सरतशेवटी सर्वात सशक्त अश्या २००-३०० घोड्यांना विजयी घोषित केले जाते.
आता या शर्यतीची गंमत आशी आहे की , धावणाऱ्या सर्व घोड्यांचे अंतीम ध्येय (फिनिशिंग लाइन) समान आहे, परंतु ट्रॅक मात्र समान नाही. प्रत्येक घोड्याला आपला मार्ग स्वतःच शोधायचा आहे. यादरम्यान एकाला
कमी किंवा दुसऱ्याला जास्त अडचणी असू शकतात.काही घोड्यांचा मार्ग हा सिमेंट काँक्रिटचा तर काहींचा मुरुमाचा, काहींचा खडकाळ तर काहींचा मातीचा असू शकतो. काहींच्या मार्गामध्ये ट्रॅफिक कमी तर काहींच्या मार्गात जास्त असू शकते. या सर्वांमधून जो लवकर फिनिशिंग लाइन पर्यंत पोहोचेल तो विजेता. पण तरीसुद्धा शर्यत ही सर्वांसाठी समान आहे असे आयोजकांचे मत!

घोडा कसा धावतो आणि शर्यती दरम्यान त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची चर्चा आपण या लेखात करणार आहोत.

१) आर्थिक परिस्थिती :
घोड्याला शर्यतीसाठी तयार करायचे असल्यास त्याला योग्य तो खुराक द्यावा लागतो.घोड्याच्या मालकाला त्याचा आर्थिक भार सहन करावा लागतो.मात्र मुस्लिम विद्यार्थी नावाच्या घोड्याच्या मालकाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना घोड्याच्या खुराकाचा खर्च न झेपणारा आहे, परिणामी योग्य खुराका अभावी घोडा शर्यतीतून बाहेर पडतो.
महेमूदुर रेहमान समितीच्या अहवालानुसार ६० टक्के महाराष्ट्रीयन मुस्लिम हे दारिद्र्यरेषेखाली आपले जीवन व्यतीत करत आहेत तर २५ टक्के महाराष्ट्रीयन मुस्लिम हे दारिद्र्यरेषेच्या किंचित वर आहेत. याचा अर्थ असा की ८५ टक्के महाराष्ट्रीयन मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थितीच नाही की ते स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या मुलांवर लाखो रुपये खर्च करून त्यांना महागडे खाजगी क्लास लावू शकतील किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तयारी साठी पाठवू शकतील. त्यामुळे अशा घोड्यांना जर शर्यतीत सहभागी व्हायचे असेल तर आहे त्या ठिकाणी राहून उपलब्ध मर्यादित साधनांचा वापर करून तयारी करावी लागते.
उर्वरित १५ टक्के मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती ही खूपच चांगली आहे अशातला काही प्रकार नाही.त्यातला बहुतांश समाज हा लोअर मीडल क्लास किंवा मीडल क्लास या श्रेणी मध्ये मोडतो. या श्रेणीतील समाजाने आपली आहे ती आर्थिक ताकत आधीच मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी खर्च केलेली असते.आणि त्यांची अशी रास्त इच्छा असते की मुलांना चांगले शिक्षण मिळून ती लवकर कमावती व्हावेत. तरी सुध्धा ते कर्ज काढून किंवा पैशांची जुळवाजुळव करून मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी पाठवतात. लाखाच्या घरात असलेली खाजगी क्लास ची फी भरतात. पण स्पर्धा परीक्षा ही अनिश्चिततेने भरलेली असल्याने १-२ वर्षांपेक्षा जास्त ते हा खर्च झेपू शकत नाहीत. 

२) पेठेतील अग्नीपरिक्षा :
आर्थिक जुळवाजुळव करून सर्व गृहितके, मिथके, गैरसमज यांना फाटा देऊन जे मुस्लिम युवक अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यात येतात त्यांना सर्वप्रथम पेठेच्या अग्नीपरिक्षेतून जावे लागते.समाजात मुस्लिमांकडे संशयाने बघण्याच्या वृत्तीमुळे, प्रचलित गैरसमजुतींमुळे मुस्लिम युवकांना पेठेत रूम आणि मेस मिळण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. काहींना ही अतिशोक्ती वाटेल पण हा संघर्ष श्झ्एण् च्या अंतीम यादीत येण्यासाठी लागणाऱ्या संघर्षापेक्षा कमी नाही. आयएएस अंसार शेख यांचे उदाहरण आपल्या समोर आहेच. कित्येक विदयार्थी तर क्लासची फी भरून सुद्धा फक्त रूम न मिळाल्याने वापस गावी परतल्याची उदाहरणे आहेत.
पेठेत रूम न मिळाल्याने बहुतांश मुले कॅम्प किंवा कोंडवा भागात नाईलाजाने राहतात. पण क्लास अभ्यासिका पेठेत असल्याने त्यांचा बरासचा वेळ हा ट्रॅव्हलिंग मध्ये वया जातो.पण इतर घोड्यांना मात्र हा इतका त्रास सहन करावा लागत नाही. ते आपापल्या वेगाने कमी अडथळ्यांच्या मार्गाने धावत असतात.

३) माहितीची असमानता :
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला तरी त्याचा आवाका इतका जास्त आहे की काय वाचावे, काय वाचू नये, अभ्यासाचे तंत्र काय असावे, विद्यापीठांच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेचे स्वरूप कसे वेगळे आहे, आयोगाच्या अपेक्षा काय आहेत..? या सर्व प्रश्नांची उकल होण्यामध्ये खूप कालावधी जातो. चुकीचे अभ्यास तंत्र अवलंबल्याने, चुकीचे संदर्भग्रंथ वाचल्याने मुलांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. क्लासवाले सुध्दा फक्त वरवरची माहिती देतात.
कॅम्प, कोंडवा या भागात मार्गदर्शन, अभ्यासिका उपलब्ध नसल्याने मुलांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही. पण पेठेत अभ्यासिकांमध्ये सिनियर विदयार्थी, गावाकडील आधीपासून तयारी करत असलेले मित्र असल्याने त्यांच्यात माहितीची देवाण घेवाण सुलभतेने होते. स्पर्धा परीक्षांमध्ये सिनियर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन बहुमोलाचे ठरते कारण त्यांचा अनुभव, त्यांनी केलेल्या चुका या नवीन विद्यार्थ्यांना टाळता येतात. पण मुस्लिम भागात अशी सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांशी प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी नावाचा घोडा हा स्वतःच 'ट्रायल अँड एरर' पद्धतीने आपल्या योग्य मार्गाच्या शोधात भटकत राहतो. यादरम्यान दुसरे घोडे मात्र योग्य मार्गाने शर्यतीत कधीच त्याच्या पुढे निघून गेलेले असतात. मुस्लिम समाजातील किंवा इतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन येणाऱ्या पिढीला मिळावे याची मुस्लिम समाजात संस्थात्मक व्यवस्थाच नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शुन्यातून सुरुवात करावी लागते. हे एनईईटी, जेईई, सीएटी, एनईटी-जेआरएफ, एसईटी, जीईटी सारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागू होते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅम्प , कोंडवा भागात मिळून फक्त एक अभ्यासिका उपलब्ध आहे , डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट (डीएमआय) ची. ती सुद्धा फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत चालू असते. म्हणजे फक्त १० तास मात्र पेठेतल्या अभ्यासिका या २४ तास खुल्या असतात. कॅम्प आणि कोंडवा ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. प्रत्येक शहरातील मुस्लिम मोहोल्यांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच विदारक आहे. मोहल्यांमध्ये खाण्या पिण्याच्या आणि मनोरंजनाच्या गोष्टींची प्रचंड मांदियाळी आहे पण अभ्यासिका, बुक स्टॉल यासाठी विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागते.
(टिप : लेख लिहिताना मला याची पूर्ण जाणीव आहे की समाजात अनेक गोष्टींना अपवाद आहेत आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा यशस्वी सामना अनेकांनी केला आहे. लेख लिहिण्याचा हेतू फक्त सर्वसामान्य कारणांचा शोध घेऊन आत्मपरीक्षण करणे हा आहे.)
(सौजन्य: https://www.facebook.com/MarathiMuslman)

- शहेबाज म. फारूक मनियार

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget