Halloween Costume ideas 2015

सम तिथी, विषम तिथी आणि भिडे गुरुजींचे आंबे!

सक्काळी सक्काळी कोपऱ्यावरच्या ‘जय जलाराम नाष्टा सेंटर'मध्ये उधारीवर इंदोरी पोह्यांसोबत जिलेबी हादडणे आणि नंतर त्यावर बादशाही चहा रिचवत तिथे येणारी सर्व वर्तमानपत्रे वाचणे हा आमचा नित्यक्रम कधी चुकत नाही. नाही म्हणायला चार-सहा महिन्यांची उधारी थकल्यावर गल्ल्यावरच्या टकल्याच्या तोंडावर त्याचे पैसे फेकून मारत नाही तोपर्यंत दोन-तीन दिवस खाडे पडतात तेव्हढेच! माणूस स्वाभिमानी असला की असे होणारच, त्याला इलाज नाही. त्या टकल्याला पैसे मागायची लाज वाटत नसेल, पण तो भिकाऱ्यासारखा आमच्याकडे पैसे मागतो याची आम्हाला लाज वाटते ना!
आजही सकाळी तोंडात उधारीचे इंदोरी पोहे भरलेले असतांनाच फुकटाच्या वर्तमानपत्रात, ‘इंदोरीकर महाराजांवर अखेर गुन्हा दाखल.' असा मथळा वाचला आणि ज्या अधाशीपणाने इंदोरी पोहे खात होतो त्याच अधाशीपणाने मथळ्याखालची बातमी वाचून काढली. (हल्ली इंदोरीकर महाराजांचं नाव वाचलं, काढलं की आमची नजर आपोआपच ‘खाली' जायला लागली आहे.) वाईट वाटलं. गल्ल्यावरच्या टकल्याने उधारीसाठी टोकल्यावर वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त वाईट वाटलं. एखाद्याने लोकांना निरपेक्षपणे मार्गदर्शन करावं (म्हणजे  एखाद्या ‘बापू'सारखा सक्रिय सहभाग न नोंदवता!), त्यांच्या इच्छापूर्तीचा मार्ग दाखवावा (तेही स्वतः कोणाच्याही ‘मार्गा'त न घुसता!) आणि तरीही त्याला कोर्टाची पायरी चढावी लागावी, याला काय म्हणावे?अहो, पुत्रप्राप्तीसाठी लोक काय नाही करत? (हा प्रश्न आम्ही दादा कोंडकेंइतक्याच निरागसतेने विचारीत आहोत, वाचणाऱ्यांच्याच मनात जर सेन्सॉर बोर्डाप्रमाणे अश्लीलता भरली असेल तर त्याला आम्ही काय करणार?) म्हणजे देवाला नवस करतात, सोनोग्राफी करतात, पुत्रमोहापोटी चार-सहा मुलीसुद्धा जन्माला घालतात, थकून जातात बिचारे, पण पुत्रप्राप्ती काही होत नाही. अशा थकल्याभागलेल्यांना, रंजल्यागांजलेल्यांंना आमच्या इंदोरीकर महाराजांनी (त्यांचे अभ्यासाचे विषय पाहून आम्हाला त्यांच्याबद्दल आपोआपच आपुलकी वाटू लागली, त्याला काय करणार? संत दादा कोंडकेंबद्दलही आम्हाला अशीच आपुलकी वाटत असे. असो!)  किती सोपा उपाय सांगितला, सम तिथी! विषम तिथी!आता कॅलेंडरवर आपल्याला हव्या असलेल्या तिथीवर खूण करायची आणि लागायचे ‘कामा'ला! झाले!म्हणजे होईल! जे हवं ते होईल!कित्ती सोप्पं! कित्ती इंटरेस्टिंग!बरं इतकंच मार्गदर्शन करून इंदोरीकर महाराज थांबले नाहीत, तर जर तुम्हाला एकदम वाया गेलेलं पोरगं आपल्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल, म्हणजेच एखादा यशस्वी राजकारणी आपल्या पोटी जन्माला यावा असं जर वाटत असेल तर अशुभ तिथी ‘कामा'ला आणा असा बहुमूल्य सल्ला देऊनही ते मोकळे झाले!आता कोणी कोणत्या तिथीला
‘मोकळं' व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! आयोजकांकडून रग्गड पैसा घेणाऱ्या, पण सर्वसामान्य लोकांना मात्र असं बहुमूल्य मार्गदर्शन विनामूल्य देणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यामागे एखादा ‘तृप्ती' न झालेला अतृप्त आत्मा असावा का?असो.
आपल्या या महाराष्ट्रात लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी झटणारे इंदोरीकर महाराज काही एकटे नाहीत. मागे भिडे गुरुजींनी त्यांच्या झाडाचे आंबे खाल्ल्याने हमखास पुत्रप्राप्ती होते, असे कोणाचीही भीडभाड न बाळगता सांगितले होतेच की नाही! हल्ली तर रेडिमेड भाजी-पोळीसुद्धा मिळते. घरी स्वयंपाक करण्याची गरज नाही. घरी आणा. गरम करा आणि खा. गुरुजींचे आंबेही तसेच असतील का? घरी काही करायची गरजच नाही! फक्त गुरुजींचा आंबा खा आणि पुत्ररत्न मिळवा! खरं म्हणजे अशा नररत्नांना
‘भारत रत्न' देऊनच त्यांचा गौरव केला पाहिजे. ते तर राहिलं दूर, उलट त्यांना पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या वाऱ्या कराव्या
लागतायेत. कोणाचं भलं करण्याचे दिवसच राहिले नाहीत हेच खरं. विचारा हवं तर आसाराम बापूंना. असो.
ज्यांना काड्या करायची सवय असते ते काड्याच करत फिरतात, म्हणूनच मग सम-विषम तिथीवाले महाराज, आंबेवाले गुरुजी अशा परमार्थींना त्रास सहन करावा लागतो. आसारामच्या जीवनात राम उरत नाही. याउलट ज्यांना धंदाच करावयाचा असतो ते कुठेही धंदाच शोधतात. धंदाच करतात. आमचा एक
‘केवलधंदानी' नावाचा मित्र आहे. आपल्या नावाला जागून तो चोवीस तास फक्त आणि फक्त धंद्याचाच विचार करीत असतो.
(आंबटशौकिनांनी उगाच हुरळून जाऊ नये. त्यांच्या घरात फक्त
पुरुषच नावाला जागतात!) आता त्याने वर्तमानपत्रात त्याच्या नवीन धंद्याची जाहिरात अशी दिली आहे, ‘आम्ही सम तिथीला भिडे गुरुजींचे आंबे घरपोच आणून देतो. निराशा टाळण्यासाठी आजच नोंदणी करा. मर्यादित साठा. सलग चार किंवा त्यापेक्षा जास्त मुली असणाऱ्यांना (दयाबुद्धीने) सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येईल. टीप :-नकली मालापासून सावधान!नकली माल वापरून नकली माल पदरात पडल्यास काय कराल?'

- मुकुंद परदेशी
मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र.:७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget