Halloween Costume ideas 2015

इस्लाम शांती आणि विकासासाठी

- म. हुसैन गुरुजी, धुळे (मो.: 7588102941)

समस्त जगांसाठी कृपा असलेले पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रतिपादन आहे, ”सारे मानव एकाच माता-पित्याची संतती असून परस्परात बंधुभगिनींच्या रक्ताच्या नात्याने जोडले गेले आहेत.” प्रेम, शांती व क्षमा त्यांनी जगताला दिलेली अमूल्य देणगी होय.
    इतिहास साक्षी आहे जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अत्यंत भयानक व वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अतिप्राचीन युद्धास युक्तीपूर्णरित्या उत्कृष्ट शैलीने समाप्त करण्याची यशस्वी पराकाष्ठा केली, ज्यामुळे सदैवासाठी गोड सांगता झाली. तेच अरब शांतीचे ध्वजवाहक बनले. मानवतेचे उद्धारक दयासागर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर लोकांसोबत दयेचा व्यवहार केला. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ज्यू व ख्रिश्‍चनांनासुद्धा बंधुभावाचे आवाहन केले.
    आज स्वत:ला शांतीचे पुरस्कर्ते समजणारेसुद्धा हिंसेचा आधार घेऊन कार्यरत आहेत. अफगाणिस्तानला बेचिराख करणार्‍या अमेरिकेने जेव्हा एक-दीड दशकात इराकसमवेत जगाच्या विभिन्न देशांत दहशतवादाच्या समाप्तीसाठी निकृष्ट प्रकारचा दहशतवाद सुरू केला आहे. याचे समर्थन कोणी करू शकणार नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मक्का पादाक्रांत केल्यानंतर कोणाकडून कोणता बदला घेतला नाही. किंबहुना सकलजनास माफ केले. ज्याच्या परिणास्वरूप केवळ मक्का व मदीनेत नव्हे तर समस्त अरब जगतात शांती व सौहार्दाचे वारे वाहू लागले. या पश्‍चात जिथे -जिथे इस्लाम पोहोचला तिथे अशांतीची समाप्ती झाली.
    पैगंबर मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन मानवतेला जोडण्यात, त्यांच्यात एकात्मता कायम करण्यात आणि मानवतेला इहलोक व परलोकाच्या त्रासापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी होते. या सार्‍या रेखांवर अत्यंत व्यापकतेसह कार्य केले. म्हणून जगाने पाहिले की ते एक असे शिक्षक, पालक, राजनितिज्ञ, नेता आणि मार्गदर्शकसुद्धा झाले की यापूर्वी जगाने असे उदाहरण बघितले नव्हते न याच्यापश्‍चात एखादे असे उदाहरण पृथ्वीतलावर निर्माण झाले आणि न भविष्यात निर्माण होईल! इस्लामी इतिहास साक्षी आहे की मुस्लिमांनी शिक्षण व प्रशिक्षणात उन्नती करून उच्चता प्राप्त केली आहे. ज्ञान अंधकारातून प्रकाशाच्या मुक्तीमार्गाचे माध्यम होय. अल्लाहने पवित्र कुरआनात फरमावले आहे,
”वाचा (हे मुहम्मद स.) आपल्या पालनकर्त्याच्या नावासह ज्याने मानवाला गोठलेल्या रक्ताच्या गोळ्यापासून निर्माण केले आणि तुमचा रब मोठा अनुकंपाशील आहे. ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले. ते ज्ञान शिकविले जे तो जाणत नव्हता.” (सूरह अलक)
उपरनिर्दिष्ट आयती आहेत ज्यापासून ज्ञानाची असाधारण उपयुक्तता व महत्त्व स्पष्ट होते. ज्ञान अल्लाहची एक विशेषता आणि प्रेषितांचा वारसा आहे. त्याच्याव्यतिरिक्त मानवतेचे मार्गदर्शन शक्य नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे उद्गार आहेत, ”ज्ञान प्राप्त करा, मातेच्या कडेपासून थडग्यापर्यंत.” शिक्षण कोणत्याही समाजाच्या विकासाचे मूलभूत घटक आहे. जे समाज मागासलेपणाचे बळी ठरले आहेत त्याच्या शिक्षणाची गुणवत्तासुद्धा अप्रगत आहे. ज्या समाजात शिक्षणास प्रथम प्राधान्य दिले जाते त्यांची माणसे सर्वोच्च प्रकारच्या सेवा पार पाडत असतात. ’ज्ञान तलवारीपेक्षा बलवान आहे.’ यास्तव ज्ञानास आपल्या समाजात आणि देशात भरपूर वाव द्यावा. मग आपणास कोणतीही बलाढ्य शक्ती पराभूत करू शकणार नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे फरमान अतिशय अर्थपूर्ण आहे. ज्यावर आम्हास अंत:करणपूर्वक आचरण करायला हवे. समाजात जितके लोक विद्याविभूषित असतील ते तितक्या उत्कृष्ट प्रकारे राष्ट्राची संरचना आणि विकासकार्यात सहभागी होतील. शिक्षण एका व्यक्तीलाच नव्हे तर एक परिवार आणि समाजास ज्यात आपण राहत असतो उत्कृष्ट साच्यात परिवर्तीत करण्यास सहाय्यभूत ठरते. सर्वांगीण विकासाचे रहस्य वास्तविक जनतेच्या उच्च विद्यालंकारांनी सुशोभित होण्यातच आहे.
समाजाची परिभाषा प्रगतीच्या व्याख्येत स्वत:चा विशेष अर्थ बाळगत असते. ते सतत चालणारे कर्म होय. जे कोणत्याही देशाच्या जीवनाच्या सर्व विभागांत चांगल्या प्रगतीची संपूर्ण परिक्रमा करीत असते. शिक्षणामुळे समाजातील व्यक्ती आपल्या साधनांशी सुपरिचित होतात. समस्यांचे उपाय शोधून त्या कृतीत आणण्याचा विवेक त्यांना प्राप्त होतो. शिक्षणामुळे जनमानसात सांस्कृतिक आणि राजकीय विवेक जागृत होतो. सांस्कृतिक मूल्ये कायम राखली जातात. उज्ज्वल विचारसरणीमुळे लोकशाही मूल्यांचे प्रशिक्षण लाभते. विद्याविभूषित समाज हा राजनैतिक, सामाजिक व संरक्षणाच्या दृष्टीने सर्वतोपरी विकास साधत असतो. असा समाज अहंकारापासून दूर असतो. तिथे अपराधांचे प्रमाण अत्यल्प राहते. म्हणून शिक्षणामुळे सुखसमृद्धीचे जीवन व्यतीत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान आदींच्या प्रगतीने आमचा जीवनस्तर उंचावला जात आहे.
सारांश- इस्लाम व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांना शांततापूर्ण सहजीवनाकरिता मानवतावादी दृष्टिकोनातून शांती व विकासाचा उदात्त मार्ग प्रदान करतो. मानवी कल्याणासाठी मार्गदर्शक असलेल्या पवित्र कुरआन आणि जगाचे उद्धारक प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आदर्श पवित्र जीवनचरित्राच्या विविध पैलूंचा अभ्यास निश्‍चितपणे सकलजनास फार लाभदायक, बहुमूल्य आणि मार्गदर्शनार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अल्लाह आम्हास त्यावर आचरण करण्याची सुबुद्धी प्रदान करो, ही प्रार्थना. आमीन!

स्लामचा मतितार्थ आहे शांती, सुरक्षा आणि अल्लाहच्या पुढ्यात संपूर्णत: समर्पण. हा ईश्‍वरनिर्मित धर्म असून कोणत्याही मानवाने त्याची प्रस्थापना केलेली नाही. शांतिदूत मुहम्मद (स.) यांनी फरमाविले, ”सकल मानवजात अल्लाहचा परिवार आहे.” माता हजरत आएशा (रजि.) यांना लोकांनी पृच्छा केली, ”प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चारित्र्य कसे होते?” त्या उत्तरल्या, ”तुम्ही कुरआन वाचले नाही काय? त्यांचे चारित्र्य म्हणजे दिव्य कुरआनची आदर्श प्रतिकृती होय!”

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget