Halloween Costume ideas 2015

इस्लाम आणि मानवाची वास्तविकता

मित्रानों ! जगाचं एक मुलभूत सत्य आहे़ ज्याच्या आधारे जगाची संपूर्ण व्यवस्था चालत आहे़ आपण (मनुष्य) सुद्धा या जगापासून वेगळे नाही तर या जगात त्याचा एक अंश म्हणून राहत आहोत़ म्हणून सर्वांसाठी हे सत्य ज्याप्रमाणे मुलभूत आहे त्याच प्रमाणे आपल्यासाठी सुद्धा मुलभूत सत्य आहे़
    सध्या हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तिसाठी आणि जगातील सर्व माणसांसाठी एक बिकट समस्या बनली आहे की, आम्हा माणसांच्या जीवनातून शांती व समाधान लोप का पावले आहे? आमच्यावर संकटे सदैव का कोसळत असतात? आमच्या जीवनाची घडी का विस्कटली आहे? राष्ट्रा-राष्ट्रामध्ये संघर्ष का निर्माण झाला आहे? त्यांच्यात ओढातान का होत आहे? माणूस माणसाचा शत्रू का बनला आहे? जगात लक्षावधी माणसे मरत आहेत़ जगाचे अब्जावधीचे नुकसान होत आहे़ वस्तीच्या वस्ती बेचिराख होत आहेत़ बलवान आणि श्रीमंत लोक दुर्बलांना गीळंकृत करीत आहेत़ राज्यकारभारात अत्याचार होत आहेत. न्यायालयामध्ये अन्याय होत आहे, संपत्तीमध्ये अतिरेक, सत्तेमध्ये उन्माद आहे, मैत्रीत लबाडी आहे़ नितीमत्तेत सचोटी राहिली नाही़ माणसावरून माणसाचा विश्वास उडाला आहे़  धर्माच्या रूपात अधर्म होत आहे. मानवजात अनेक गटामध्ये विभागली गेली आहे़  प्रत्येक गट दुसऱ्या गटास दग्या-फटक्याने जुलूम अत्याचाराने बेईमानी व लबाडीने हानी पोहोचविण्यास पुण्यकार्य समजत आहे़ या सर्व वाईटाचे कारण काय आहे? अल्लाहच्या सृष्टीत आपण पाहतो सर्वत्र शांती पसरलेली दिसते़ ताऱ्यांमध्ये शांतता आहे़, हवेत शांतता, पाण्यात शांतता, झाडे झुडपे आणि जनावरांमध्ये शांतता आहे. संपूर्ण सृष्टीचा कारभार पूर्णपणे शांततेत चालू आहे़ कोठेही उपद्रव आणि अव्यवस्थेचा लवलेशही आढळत नाही़ परंतु, केवळ मानवी जीवनच शांततेपासून वंचित आहे?
    हा एक अवघड प्रश्न आहे, जो सोडविण्यासाठी नाकीनऊ येत आहेत़ याचे थोडक्यात उत्तर असे आहे की, माणसाने आपले जीवन सत्य आणि वास्तवतेच्या विरोधी शक्तींना सोपवले आहे़ म्हणून मानवास कष्ट भोगावे लागत आहे़ जोपर्यंत मानव स्वत:ला सत्य आणि वास्तविकेतच्या सुपूर्द करीत नाही तोपर्यंत त्यास कधीही शांतता प्राप्त होणार नाही़ उदा़ तुम्ही चालत्या आगगाडीच्या दारास आपल्या घरचे दार समजलात आणि ते उघडून बिनधास्त बाहेर पडलात जणू आपल्या घरच्या दालनात पाय टाकत आहात़ तर तुमच्या गैरसमजुतीमुळे रेल्वेचे दार घरचे दार बनणार नाही आणि ते मैदान सुद्धा की, ज्यावर आपण फेकले जाऊ घराचे दालन ठरणार नाही़ तुम्ही आपल्या ठायी काहीही समजले तरी वास्तविकतेमध्ये किंचितही बदल होणार नाही़ भरधाव चाललेल्या आगगाडीच्या दारातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल त्याचा जो परिणाम होणार तो झाल्याशिवाय राहणार नाही मग पाय मोडल्यानंतर, डोके फुटल्यानंतर सुद्धा आपण हे मान्य करू नये की, आपण जे कांही समजले होतो ते चुकीचे होते? अगदी त्याचप्रमाणे आपण समजलो की या जगाचा कोणीही पालनकर्ता नाही किंवा आपण स्वत:च आपले ईश्वर बणून रहाल अथवा ईश्वराशिवाय अन्य एखाद्याचे ईशत्व मान्य कराल तर आपल्या अशा समजुतीमुळे वस्तुस्थिती कदापी बदलणार नाही़ ईश्वर हा ईश्वरच राहणाऱ त्याचे जबरदस्त साम्राज्य ज्यामध्ये आपण केवळ प्रजा म्हणून राहत आहोत़ सर्वाधिकारानिशी त्याच्याच अखत्यारित राहणार आहे. उलट आपल्या अशा चुकीच्या समजुतीमुळे जी जीवन पद्धती स्विकारली त्याची कटू फळे आपणास चाखावी लागतील मग यातना भोगल्यानंतर सुद्धा अशा चुकीच्या जीवनास आपल्या ठायी अचूक का समजावे?
    सकल जगाचा ईश्वर कोणाच्या केल्याने सर्वव्यापी ईश्वर बनलेला नाही तो काही लाचार नाही, आपण त्याचे इशत्व मान्य करू तेव्हाच तो ईश्वर ठरेल़ आपण मान्य करा अथवा न करा तो तर स्वत: ईश्वर आहे़ त्याचे ईशत्व स्वबळावर उभे आहे़ त्याने स्वत: आम्हाला या संपूर्ण ब्रम्हांडाला बनविले आहे़  ही पृथ्वी, हा सूर्य आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या आदेशाच्या आधिन आहे़ या सृष्टीमध्ये जितक्या शक्ती कार्यरत आहेत़ त्याच्या आदेशाखाली आहेत. त्या सर्व वस्तू ज्यांच्या बळावर आपण जीवंत आहोत त्याच्या अधिकाराधीन आहेत़ स्वत: आपले अस्तित्व त्याच्या अधिकारात आहे़ आपण हे मान्य केले अथवा नाही तरी वस्तू स्थिती हीच आहे. या सर्व अवस्थेत सत्याचे तर काहीच वाईट होत नाही़ परंतु, फरक असा होतो की, आपण जर वस्तुस्थिती मान्य करून आपले तेच स्थान मान्य केले़ जे या सृष्टीमध्ये आपले वास्तविक स्थान आहे तर आपले जीवन योग्य राहील. आपल्याला सुख, शांती, समाधान लाभेल़  आपल्या जीवनाची घडी व्यवस्थित बसेल. परंतु, जर आपण व्यवस्थेविरूद्ध अन्य कोणतेही स्थान स्विकारले तर परिणाम तेच निघेल जो भरधाव चाललेल्या रेल्वेच्या दारास आपल्या घराचे दार समजून बाहेर पडण्याने निघतो. आघात आपल्या स्वत:ला सोसावा लागेल, पाय आपले मोडणाऱ, डोके आपले फुटणार, यातना आपल्या स्वत:ला भोगाव्या लागतील़ परिस्थिती जशी होती तशीच राहणार. आपण प्रश्न कराल की परिस्थितीनुसार आमचे उचीत स्थान कोणते आहे? त्याचे उत्तर असे आहे की, जर एखाद्या नोकरास आपण पगार देऊन नोकरीस ठेवले असेल़  तर त्या नोकराचे वास्तविक स्थान काय आहे? हेच की त्याने आपली़ नोकरी करावी, आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करावे़ मालकाच्या मर्जीनुसार काम करावे आणि नोकरीची मर्यादा ओलांडू नये़ नोकराचे काम नोेकरी करण्याशिवाय अन्य काय असू शकते? आपण जर अधिकारी आहात आणि एखाद्या हाताखाली असेल तर हाताखालच्या व्यक्तिचे काय काम असेल? हेच की त्याने ताबेदारी करावी़ अधिकाऱ्याच्या ऐटीत राहू नये.          
    जर आपण एखाद्या इस्टेटीचे मालक असाल तर त्या इस्टेटीमध्ये आपली इच्छा काय राहील? अशीच की तिच्यावर आपली मर्जी चालावी़ आपल्याला काही हवे असेल तेच तिच्यात घडावे, आपल्या इच्छेविरूद्ध तिथले पानसुद्धा हलू नये़ आपल्यावर जर एखादी सत्ता काबीज असेल आणि सर्व अधिकार तिच्या ताब्यात असतील तर अशी राजेशाही असताना तेथे आपले काय स्थान असते? हेच की आपण सरळ प्रजा बणूून रहावे आणि शाही कायद्याच्या बाहेर पाउल टाकू नये़ बादशाहाच्या राज्यात राहत असताना जर आपण स्वत:च बादशाहीचा दावा किंवा अन्य एखाद्याची बादशाही मान्य करून त्याच्या आदेशानुसार वागत असाल तर आपलं बंड खोट ठरेल़  बंड खोराशी जो व्यवहार केला जातो तो आपल्याला माहीत आहे़
    या उदाहरणावरून आपण समजू शकतो की अल्लाहच्या या राज्यात आपले स्थान काय आहे? अल्लाहने आपल्याला बनविले आहे़ स्वाभाविकपणे आपले काम याशिवाय अन्य कोणतेही नाही की आपण आपल्या बनविणाऱ्याच्या मर्जीनुसार चालावे. अल्लाह आपले पालन करीत आहे़ त्याच्या खजिन्यातून आपण पगार घेत आहोत़  याशिवाय, आपले अन्य कोणतेही स्थान नाही की, आपण त्याचे नोकर आहोत़ आपला आणि सर्व जगाचा तो मालक आहे़ त्याच्या अधिकारात आपले स्थान दासाशिवाय अन्य काय असू शकते? ही पृथ्वी आणि हे आकाश सर्व त्याचीच इस्टेट आहे़ या इस्टेटीमध्ये त्याचीच मर्जी चालेल आणि त्याचीच मर्जी चालली पाहिजे. आपणास येथे स्वत:ची मर्जी चालविण्याचा कोणताच हक्क नाही़  जर आपण आपली मर्जी चालविण्याचा प्रयत्न कराल तर तोंडघशी पडाल. या राज्यात त्याची सत्ता त्याच्या ताब्यात आहे़ या राज्यात ईश्वराची सत्ता त्याच्या स्वत:च्या बळावर उभी आहे़ पृथ्वी आणि आकाशाची सर्व सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आपण यावर राजी असो किंवा नाराज असो, कोणत्याही परिस्थितीत आपण त्याचे रयत (गुलाम) आहोत़ आपला अथवा अन्य कोणत्याही माणसाचा दर्जा मग तो लहान असो की मोठा, गुलाम असण्याखेरीज अन्य कोणताही नाही. त्याचाच कायदा साम्राज्यात आहे आणि त्याचाच हुकूम हा हुकूम आहे़ गुलामापैकी कोणासही असा दावा करण्याचा हक्क नाही की मी ’हिज मॅजिस्टी’ आहे किंवा ’हिज हायनेस’ आहे अथवा हुकूमशाह किंवा सर्व सत्ताधिकारी आहे. कोणत्याही व्यक्तिस अथवा लोकसभेस किंवा विधानसभेस अथवा मंडळास हा अधिकार प्राप्त नाही, की या साम्राज्यात अल्लाहच्या कायद्याशिवाय आपल्या स्वत:चा कायदा लागू करावा आणि अल्लाहच्या रयतेला सांगावे की, आमच्या कायद्याचे पालन करा. कोणत्याही मानवीय सत्तेस हा अधिकार पोहचत नाही की, अल्लाहच्या आदेशाची उपेक्षा करून अल्लाहच्या दासावर आपला हुकूम चालवावा हे उचीत नाही अशा सर्व अवस्था बंडाच्या आहेत़ याची शिक्षा बंड करणारे व त्यांचे आदेश स्विकारणारे दोघांनाही मिळणे निश्‍चित आहे. मग ती शिघ्र मिळो अथवा उशीरा. आपले आणि जगातील प्रत्येक मुनष्याच्या डोक्यावरील केस अल्लाहच्या मुठीत आहेत. हवे तेव्हा धरून त्याने ओढावे़  त्याच्या या पृथ्वी आणि आकाशाच्या राज्यातून पळून जाण्याची ताकद कोणातही नाही़ त्याच्यापासून पळ काढून आपण कोठेही आश्रय मिळवू शकत नाही़ मातीत मिसळून आपला कण न् कण जरी विखूरला गेला, आगीत जळून आपली राख हवेत पसरली, पाण्यात वाहून आपण माशाचे भक्ष बनलो किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळून गेलो़ तरी अल्लाह प्रत्येक ठिकाणाहून आपणास पकडून बोलावील़ वारा त्याचा दास आहे, पृथ्वी त्याची दास आहे, मासे आणि पाणी सर्व त्याच्या आदेशाच्या आधीन आहेत़ एका इशाऱ्यासरशी चोहोकडून आपण पकडीत सापडू मग तो आपल्यापैकी प्रत्येकाला बोलावून विचारेल की माझी रयत असूनही सत्ताधिशाचा दावा करण्याचा हक्क तुम्हाला कोठून प्राप्त झाला होता? माझ्या राज्यात आपले आदेश चालविण्याचे अधिकार तुम्ही कोठून आणले होते़ ? माझ्या सत्तेमध्ये आपला कायदा चालविणारे तुम्ही कोण? माझे दास असूनही इतरांचे दास्यत्व पत्करण्यावर तुम्ही राजी कसे झालात? माझे दास असूनही तुम्ही इतरांच्या आज्ञा कशा पाळल्यात? माझ्याकडून पगार घेऊन इतरांना तुम्ही अन्नदाता आणि पालनकर्ता मानलेत़ माझे गुलाम असूनही इतरांची गुलामी केलीत, माझ्या राज्यात राहून सुद्धा इतरांची सत्ता तुम्ही मान्य केली व इतरांच्या कायद्यांना कायदा समजलात आणि इतरांच्या हुकूमाचे पालन केले़ ही बंडखोरी तुमच्यासाठी वैध कशी ठरली होती? आपणापैकी कोणापाशी या आरोपाचे उत्तर आहे सांगा बघू? कोणते वकील तेथे आपल्या युक्त्या लावून बचावाचा मार्ग काढू शकतील? या बंडखोरीच्या अपराधाची शिक्षा भोगण्यापासून तुम्हास कोण वाचविणार आहे?
    ही माणसाची वास्तविकता आहे़ त्या वास्तविकतेशी जुळवून घेऊन, त्या एकमेव सत्ताधिशाच्या आज्ञांचे पालन केल्यास अर्थात त्याने सांगीतल्याप्रमाणे जीवन जगल्यास माणसाच्या आणि संपूर्ण जगताच्या जीवनात शांतता नांदवून तो विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल़ वास्तविक मालकाच्या कायद्याचे पालन करणे म्हणजे त्याची आराधना करणे होय. हेच मानवाच्या मुक्तीचे गमक आहे आणि हाच इस्लाम आणि हीच वास्तविकता आहे़

अब्दुल मजीद खान, नांदेड
9403004232

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget