Halloween Costume ideas 2015

आज मानवजातीला शांततेची गरज

- मिनहाज शेख, पुणे
शांती, प्रगती व मुक्ती या तिन्ही गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. कारण माणूस हा आयुष्यभर आपल्या जीवाचा आटापिटा करतो आणि त्यानंतरही महत्त्वाची उद्दिष्टे जर का तो साध्य करू शकला नाही तर त्याचे जीवन हे अर्थहीन आहे.
    बाह्य दृष्टीने बघितले तर आज माणसाने खूप प्रगती केली आहे. काही वर्षांपूर्वी कल्पनाही न करू शकणार्या गोष्टी आज तो चुटकीसरशी करतो. सातासमुद्रापलीकडे बसलेल्या माणसाशी तो क्षणार्धात बोलू शकतो. आज ज्या ए.सी. रूममध्ये बसून आपण काम करतो तो आराम भूतकाळातल्या राजामहाराजांनादेखील प्राप्त झाला नाही. त्यांनासुद्धा पंखा हलविणार्या कोणावर तरी अवलंबून रहावे लागत होते. थोडक्यात... माणसाने प्रगती खूप साधली, पण प्रगतीची ही व्याख्या परिपूर्ण आहे का? जरा वास्तविक परिस्थिती पाहू या. सकाळी वर्तमानपत्र उघडले की क्राइम डायरी उघडल्यासारखा भास होतो. शेतकर्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बलात्कार, अत्याचार, अराजकता अशा गोष्टी आपणास सर्रास दिसून येतात. म्हणजे एकीकडे आमचा प्रगतीचा आलेख वर आला आणि दुसरीकडे आमच्या चारित्र्यसंवर्धनाचा आलेख शून्यावर.
    हो... म्हणजे आधी बलात्कारासारखी घटना खूप गंभीर वाटायची. आज ती ’कॉमन’ या सदराखाली जमा झाली. म्हणजेच नकळत आपण या नकारात्मक परिस्थितीशी कुठेतरी हातमिळवणी केली आहे, असा याचा अर्थ होतो.
    आज सर्वांकडे सर्व काही आहे चैन किंवा शांती सोडून. महिना लाखाच्या घरात कमाई करणारी आमची तरुण पिढीसुद्धा शांतीपासून दूर. सर्वांत जास्त नैराश्य आढळते इथे. म्हणजेच उच्चशिक्षण, पैसा या गोष्टींचा मानसिक शांतीशी संबंध नाही हे समजावयास हवे. आत्महत्या करणार्या गटामध्ये आमचा 12 ते 16 हा नाजुक वयोगट कधी सामील झाला हे आम्हाला कळलेसुद्धा नाही. वाढते घटस्फोट, कौटुंबिक दुरावा, धर्मांध राजकारण, दुर्बलांवर अत्याचार, अल्पसंख्यांक गटांची मुस्कटदाबी, गरीब-श्रीमंतांची वाढती दरी, स्त्रियांवरील अत्याचार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, नैतिकतेची घसरलेली पातळी, एका निष्पाप जीवावर जमावाने तुटून पडणे इथपावेतो की त्याचा जीव जावा; इथपर्यंत माणसाने क्रूरतेचा कळस गाठलेला आहे. या सर्व वरील घटनांवर नजर टाकली की लक्षात येईल की आज संपूर्ण मानवजातीला शांतीची किती गरज आहे!
    जिथे शांती व प्रगती नाही तिथे मुक्ती कशी साधणार? कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर खराब, हार्डवेअर खराब तर एका चांगल्या प्रोजेक्टची आशा कशी करू शकणार? इथे मुक्तीचा अर्थ जीवनमूल्यापासून सुटका एवढाच कदापि नाही, किंवा मोक्षसुद्धा नाही; तर मृत्युपश्चात मिळणारे सफल जीवन जे अनंतकाळ टिकणार आहे आणि जे या जीवनातील आपल्या चांगल्यावाईट कर्मांचे फळ असणार आहे, हा अर्थ इथे अपेक्षित आहे.
    प्रश्न तर खूप आहेत, पण उत्तर... अवघड आहे असे अजिबात नाही. या सर्व समस्यांचे एकच परिपूर्ण उत्तर म्हणजे इस्लामची शिकवण. पण त्यासाठी गरज आहे ती ही शिकवण समजून घेण्याची. खरे तर इस्लामच्या शिकवणींकडे एक धर्म म्हणून न पाहता एक जीवनप्रणाली म्हणून पाहण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपणास ही शिकवण परिपूर्ण, सर्वसमावेशक व मौल्यवान अशी आढळून येईल. कारण इस्लाम हा मानवनिर्मित धर्म नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित होते, ईश्वराचा अवतार नव्हते. जे आदेश त्यांच्यावर उतरत असत ते ईश्वराकडून होते, स्वरचित नव्हे. या आदेशांत बदल करण्याचा अधिकारही त्यांना नव्हता. इस्लामचा शाब्दिक अर्थ ’शांती’ असा होतो.
    इस्लामच्या शिकवणींचा मूलभूत पाया हा वैयक्तिक मूल्यांवर आधारित आहे. त्या आधारे मग कौटुंबिक, सामाजिक, राजकीय व इतर सर्व क्षेत्रांत वैचारिक व परिपूर्ण अशी पायाभूत मूल्ये आढळतात. म्हणजेच इमारतीचा पाया मजबूत तर इमारत मजबूत हा सिद्धान्त इथे आढळतो. मनुष्याचे चरित्र, नीतिमत्ता, सात्विक मूल्ये एका उच्च पातळीवर नेण्याची शक्ती या शिकवणींमध्ये आहे, जेणेकरून मनुष्य सहजासहजी कोणताही गुन्हा करू शकणार नाही आणि चुकून झाला तरी तो पश्चात्ताप करण्याचा प्रत्न करीत राहील. अति नीच मनुष्य अति चरित्रवान बनण्यापर्यंतचे हृदयपरिवर्तन करण्याची शक्ती या शिकवणींमध्ये आहे. ’शांती, प्रगती व मुक्ती’ या गोष्टी केवळ मला मिळाल्या तर मी सफल झालो, या विचाराला इस्लाम आळा घालतो. तर तुमच्याबरोबर इतर सर्व मानवजातीची सफलता हाच सफलतेचा परिपूर्ण अर्थ आहे, त्याशिवाय तुम्ही सफल होऊच शकत नाही, हे इस्लाम सांगतो.
    प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे जे युद्धकैदी अटक होऊन येत असत, आधी त्यांना भोजन द्यावे आणि उरल्यास शिपायांनी खावे असा आदेश प्रेषितांचा होता. तेव्हा कैदीसुद्धा अचंबित झाले आणि जाणून घेण्यास उत्सुक झाले की अशी ही कोणती शिकवण आहे जी माणसाला स्वार्थाच्या चौकटीबाहेर विचार करण्यास भाग पाडते! आता ही मौलिक शिकवण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणे आवश्यक आहे. कारण सर्वचजण एका गोंधळलेल्या भांबावलेल्या स्थितीत आहेत. आपण सर्व शर्यतीतल्या घोड्यांप्रमाणे पळत आहोत. बाजूचा पडला, मेला, खपला हा विचार करायला कुणाकडे वेळ नाही.
    मी कोण आहे? कोठून आलो? कोठे जायचे आहे? मृत्युपश्चातही आणखी जीवन आहे का? जीवनात सत्कर्म करणार्यावर अन्याय होतो त्यांचे काय? कुणा निष्पापाचा उगीचच बळी जातो त्याची भरपाई कोण करणार? या व अशा सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पवित्र कुरआनात आपणास मिळतात. गरज आहे ती फक्त ही उत्तरे लोकांपर्यंत पोहोचविण्याची!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget