ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिम युवकाने रात्री एका उंदराला ठार केले. तिथल्या एका दक्ष कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मीने तातडीने दखल घेत त्या युवकाला अटक करून त्याच्याविरुद्ध १५१ (शांतता भंग) च्या कलमाखाली गुन्हा नोंदवला.
काही दिवसांपूर्वी जयपूर-मुंबई एक्सप्रेस या रेल्वेत एक दक्ष कर्तव्यनिष्ठ रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस कर्मी चेतन सिंग याने आपल्याकडील शस्त्राने चार माणसांना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या घालून हत्या केली. का तर त्यातील तीन मुस्लिम प्रवाशी होते आणि भारतात राहणाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये हे हत्या केल्यानंतर इतर प्रवाशांना सांगितले आणि स्वतःचा व्हिडिओसुद्धा लोकांकडून करवून घेतला. नोएडातील पोलीस कर्मीने उंदराच्या हत्याऱ्याला ठार केले असते पण कदाचित त्याच्याकडे शस्त्र नसावे.
ही मानसिकता आजवर सामान्य नागरिकांची झाली होती, पण आता त्या मानसिकतेने सशस्त्र पोलीस सुरक्षा दल असो की सामान्य पोलीस, सर्वांची झाली आहे. ट्रेनमध्ये जी दुर्दैवी घटना घडली ती या एकाच घटनेवर थांबली नाही आणि चेतन सिंगकडून प्रेरणा घेऊन इतर सुरक्षा कर्मींनीही अशाच हत्या करण्याचे सुरू केले तर याचे किती भयंकर परिणाम उमटतील हे सांगायची गरज नाही. आजवर फक्त मोर्चे, शोभायात्रा, जनआक्रोश आंदोलनांद्वारे नागरिकांच्या मनात द्वेष पेरले जात होते, त्याचे फलस्वरुप ही विषबाधा आता पोलीस कर्मींमध्ये झालेली आहे. संप्रदाय एकमेकांशी भिडले तर पोलीस त्यांना नियंत्रणात आणू शकतात, पण जर सुरक्षाकर्मींनीच इतर जातीधर्मांविरुद्ध वर्तणूक केली तर त्यांच्यावर नियंत्रण कोण करणार?
त्याचबरोबर आसाममध्ये काही संस्था तरुणांना सशस्त्र प्रशिक्षण देत आहेत. आज आसाम, उद्या देशभर ही योजना राबवण्यात आली तर याचे काय परिणाम होतील याची कल्पना केली तरी अंगाचा थरकांप उडतो. एवढेच नाही तर नव्या योजनेनुसार सैन्यदलात भरती करून घेणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन काहींना काही वर्षे सेवेत रुजू करणार आणि बाकीच्या सैन्य प्रशिक्षण घेतलेल्यांना बाहेरच सोडून देणार. उद्या म्हणजे आजपासून चारएक वर्षांनी सैन्य प्रशिक्षण घेतलेले हे तरुण बाहेर येऊन जसे चालत्या ट्रेनमध्ये एका शिपायाने चार लोकांना गोळ्या घालून ठार केले तसे हे लोक वस्तीवस्तीत, शहराशहरांत, घराघरांत शिरून लोकांना ठार करत निघाले तर मग काय होईल? याची दखल वेळीच आपल्या सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही तर येणारा काळ कुणासाठीही धोकादायक ठरेल.
उत्तर प्रदेशातील बरेलीत काही कांवडियांवर शांतता भंग करण्यासाठी एका निष्पक्ष पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाठीचार्ज करताच तीन तासांच्या आत त्याची बदली करण्यात आली. याचा धडा उघड आहे की कुणा पोलीस अधिकाऱ्याने निष्पक्ष कारवाई करू नये. मग काय चेतन सिंगचे अनुकरण करावे? परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट पाहू नये. ती आधीच गेलेली आहे. देशात शांतता कशी पूर्ववत होईल याकडे जर लक्ष दिले गेले नाही तर काळ कुणाच्याही बाजूने उभा राहत नसतो, याचे भान ठेवावे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment