Halloween Costume ideas 2015

कुरआनच्या भारतीय भाषांतील अनुवादाचा इतिहास


कानडी भाषांतर 

आदिलशाही आणि बहामनी मुळे कानडी भाषा मुस्लिम राजवटीतल्या विद्वानांच्या संपर्कात आली. आदिलशाहीतल्या अनेक विद्वानांनी त्यांच्या कवितांमध्ये कानडी शब्दांचा वापर केल्याचे दिसून येते. शिवाय कानडी भाषेत आदिलशाही, टिपू सुलतान यांचे अनेक फर्मान उपलब्ध आहेत. कानडी आणि मुस्लिमांच्या सहसंबंधांचा हा इतिहास पाहता कुरआनचे अनुवाद मध्ययुगीन काळातच कानडी भाषेत व्हायला हवे होते. पण ते झाल्याची नोंद कुठेही आढळत नाही. पण इस्लामच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी कानडीतून प्रयत्न झाल्याचे संदर्भ मात्र उपलब्ध आहेत. कानडी भाषेत कुरआनचे भाषांतर मुस्लीम राजवटीत होऊ शकले नाही. पण ही उणीव म्हैसूरचे प्रागतिक विचारांचे राज्यकर्ते श्री कृष्णराज वडीयार यांनी कुरआनच्या कानडी अनुवादाची गरज बोलून दाखवली. म्हैसूर दरबारात व्यंकटरमण्णा हे भाषांतरकार म्हणून सेवा बजावत होते. त्यांनी महाराजांच्या आदेशाने कुरआनचे भाषांतर सुरु केले. पण पहिल्या अध्यायाचे भाषांतर केल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हे भाषांतर पुर्ण करण्यासाठी म्हैसूरचे एक विद्वान आराय केसरी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यांनी एक वर्षात अनुवाद पुर्ण केले. १९४९ साली हे भाषांतर पवित्र कुरआनच्या नावाने हे प्रकाशित करण्यात आले. पण हे भाषांतर योग्य नव्हते. कारण अनुवादकांना अरबी भाषा ज्ञात नव्हती. त्यांनी युसूफ अली यांच्या इंग्रजी अनुवादावरुन हे कानडी रुपांतर केले होते. त्यामुळे सय्यद कासीम यांनी कुरआनचे अनुवाद सुरु केले. आणि त्याच्या पहिल्या अध्यायाचे भाषांतर करुन ते प्रकाशित केले. पण हे भाषांतर पुर्ण झाले अथवा अपूर्ण राहिले याची माहिती मिळत नाही.१२

मल्याळम भाषांतर 

मल्याळम ही दक्षिणेतील महत्वाची भाषा आहे. सन १८७० मध्ये पहिल्यांदा कुरआनचे मल्याळम भाषांतर झाले. मायान कुट्टी इलय्या (अरकाल) यांनी पहिल्यांदा कुरआनचे भाषांतर केले. मायान कुट्टी यांनी आरकालच्या शाही घराण्यात त्यांचे लग्न झाले होते. त्यामुळे त्यांनी कुरआनचे मल्याळम भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. मायान कुट्टी यांनी यांनी केलेले हे भाषांतर सहा खंडात उपलब्ध आहे. भाषांतर केल्यानंतर त्याचे प्रकाशन मुंबई येथून करण्यात आले. पण मालबारच्या किनारपट्टीवर हे अनुवाद लोकप्रिय ठरले नाही. उलेमांनीही यावर नापसंतीची मोहर उमटवली. ही नापसंती कशासाठी होती, हे मात्र स्पष्ट होत नाही. मायान कुट्टी यांनी केलेल्या भाषांतरीत कुरआनची एक प्रत इस्लामिक सेंट्रल सिवील स्टेशन कालीकट येथे उपलब्ध आहे. मल्याळम भाषेतील दुसरे अनुवाद वेंकम अब्दुल कादर स्वातंत्र्यपुर्व काळात दुसऱ्यांदा कुरआनच्या अनुवादाचे प्रयत्न केले. पण इंग्रजांच्या षडयंत्रामुळे ते पुर्ण होउ शकले नाही. कालांतराने हैदराबादच्या निजाम ट्रस्टच्यावतीने मौलवी अदासरीन यांनी मल्याळम भाषेत अनुवाद प्रयत्न सुरु केले. त्यांनी एका अध्यायाचे भाषांतर केले. आणि एका अध्यायानंतर हे भाषांतर थांबले. कुरआनचे मल्याळम भाषेतील दुसरे संपूर्ण अनुवाद मालापुरम येथील उमर मौलवी यांनी केले. मायान कुट्टी यांच्यानंतर संपुर्ण भाषांतर करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्याशिवाय सुरैल एम. कोयाकुट्टी, एस.एम. कृष्णराव, कोचीन, मौलाना सी. एन. अहमद बाकवी यांनी अनुवाद केल्याची नोंद उपलब्ध आहे. 

मराठी भाषांतर

मराठी भाषेत मुस्लिमांच्या साहित्यनिर्मितीचा इतिहास शेख मोहम्मद यांच्याही पूर्वीपासून आढळतो. मुस्लिम राजवटींनीही मराठी भाषेत अनेक फर्मान काढल्याचे दिसून येतात. आदिलशाही, टिपू सुलतान यांचे काही मोडी फर्मान उपलब्ध आहेत. मध्ययुगापासून मराठीत साहित्य निर्मिती करणाऱ्या मुसलमानांनी मराठीत इस्लामविषयी केलेल्या लिखाणाचे काही त्रोटक दाखले उपलब्ध आहेत. दौलताबाद परिसरातील काही सुफींनी मराठी कवींनी त्यांच्या कवितांमध्ये  इस्लामी तत्त्वज्ञानाच्या काही सुत्रांचा वापर केल्याचे दिसून येते. त्यामुळे कुरआनच्या अनुषंगाने मराठीत मध्ययुगापासून लेखन होते असे म्हणायला वाव आहे. पण कुरआनचे अनुवाद मराठी भाषेत इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाले आहे. हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली यांनी हे अनुवाद प्रकाशित केले होते. हकिम मीर मोहम्मद याकुब खान यांनी हे भाषांतर केले होते. सन १९१५ साली खान यांनी हे भाषांतर पूर्ण केले. भाषांतर पूर्ण झाल्यानंतर निजाम मीर उस्मान अली यांच्याकडे हे भाषांतर प्रकाशित करण्यासाठी मदत मागितली. ८ फेब्रुवारी १९१५ रोजी प्रकाशनासाठी ७५०० रुपये मंजूर करण्यात आले. त्याशिवाय मराठवाड्यातील मसजिद आणि मदरश्यांमध्ये वितरीत करण्यासाठी निजाम सरकारच्यावतीने मराठी कुरआनच्या या प्रती मोठ्या प्रमाणात विकत घेण्यात आल्या.१३ हकिम मीर मोहम्मद याकूब खान यांनी केलेले हे भाषांतर पहिले आणि अखेरचे असे भाषांतर होते जे मूळ अरबीतून मराठीत करण्यात आले होते. त्यांच्यानंतर मराठीत जितके अनुवाद झाले ते इतर भाषांमधील अनुवादांचे रुपांतरण होते. त्यामुळे हकिम मीर मोहम्मद याकूब खान यांचे भाषांतर विस्मृतीत गेले असले तरी त्याचे महत्व अबाधित आहे. याव्यतिरिक्त राजर्षी शाहू महाराजांनीदेखील कुरआनच्या अनुवादासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी २५ हजार रुपये निधी यासाठी मंजूर केला होता. अनुवादासाठी तीन लोकांची एक समिती बनवली होती. ज्यामध्ये हकिम भोरे खान, अब्दुल इनामदार, मास्टर गुलाम अहमद हे त्याचे सदस्य होते. शिवाय एक मौलवी मदतनीस म्हणून दिले होते. मराठी अनुवादासाठी मसुदा कलप्पा निटवे यांच्या जय नंदरा मुद्रणालयात छपाईचे काम सुरु करण्यात आले. पण ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर हे छपाईचे काम पूर्ण होऊ शकले नाही.१४    

गुजराती भाषांतर 

मुसलमानांचा संबंध किनारपट्टीवरील प्रदेशाशी दहाव्या शतकाच्या पुर्वीपासून आला आहे. गुजरात हे किनारपट्टीवरील राज्य असल्यामुळे येथेही मुसलमान प्रेषितांच्या काळापासून येत असल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे इस्लामचे संस्कृतीकारण गुजरातमध्ये इतर राज्यांपेक्षा जुने आहे. वली गुजराती हा मुसलमान कवी गुजरातीतला कालीदास मानला जातो. त्यामुळे मुसलमानांचे संस्कृतीकारण या राज्यात खूप प्रबळ राहिले आहे. गुजराती भाषेत कुरआनचे अनुवादही इतर प्रादेशिक भाषांपेक्षा काही काळ आधी झाले आहे. सन १८७९ मध्ये अब्दुल कादर बीन लुकमान१५ यांनी गुजरातीमध्ये कुरआनचे भाषांतर केले होते. त्यांच्यानंतर मराठीत कुरआनचा अनुवाद करणारे हाकिम मीर मोहम्मद याकूब खान यांनी कुरआनचे गुजराती भाषांतर केले होते. त्यांनी मराठीप्रमाणेच गुजरातीच्या अनुवादासाठी निजाम मीर उस्मान अली यांच्याकडून मदत घेतली होती.१६   

बंगाली भाषांतर 

शाहिस्तेखानच्या काळात बंगालमध्ये अनेक बदल घडून आले. त्याने हुगळी नदीच्या किनाऱ्या शहराची रचना करताना अनेक कलाकेंद्रे निर्माण केली. इब्राहीम आदिलशाहप्रमाणे त्यानेही बंगालमध्ये विद्वानांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंगालमध्ये अकबरी दरबाराप्रमाणे एक विद्वत्त परंपरा निर्माण झाली होती. त्याच्या काळातच अनेक अरबी, फारसी शायर बंगालमध्ये आश्रयाला आले होते. त्यामुळे बंगालला समृध्द अशा मुस्लिम साहित्यीकांची परंपरा लाभली आहे. या परंपरेतूनच इस्लामविषयीची चर्चा बंगालमध्ये सुरु झाली. आणि त्यातूनच कुरआनच्या तिसऱ्या अध्यायाचे १८६८ साली भाषांतर केले. गुलाम अकबरअली मिर्झापुरी यांनी हे अनुवाद केले होते. पण कुरआनच्या अनुवादाचा हा पहिला प्रयत्न नव्हता असे अनेक विद्वानांचे मत आहे. त्यांच्या मते मौलवी अमिरुद्दीन यांनी कुरआनचे पहिले भाषांतर केले होते. पण मौलवी अमिरुद्दीन यांच्याविषयी इतिहासाच्या साधनांमध्ये आधिक तपशील आढळत नाही. कुरआनच्या भाषांतराची संकल्पना बंगालीमध्ये कुणी मांडली अथवा तसा प्रयत्न कुणी केला हा वादाचा विषय असला तरी पहिले समग्र अनुवाद कुणी केले याविषयी निश्चित असे संदर्भ उपलब्ध आहेत. बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सुरेशचंद्र सेन यांनी १८८० साली केला होता. १८८० साली अनुवाद झाल्यानंतर त्याच्यात काही दुरुस्त्या करुन १८८२ साली हे भाषांतर प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर १८९९ नईमुद्दीन आणि गुलाम सरुर यांनी पुन्हा कुरआनचे अनुवाद केले.१७ अशाप्रकारे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालेल्या अनुवादाची ही परंपरा बंगालमध्ये आजही कायम आहे.    

पंजाबी भाषांतर

पंजाबी भाषेत सुफींच्या कव्वाल्या, सुफी गीतांची परंपरा यातून कुरआनचे परिचय १६ व्या शतकापुर्वीच झाले होते. पण कुरआनचे थेट अनुवाद मात्र पंजाबीत हाफीज मुबारकउल्लाह यांनी १८७० मध्ये केला होता. त्यानंतर कुरआनचा काही भाग मौलाना नवाशाह यांनी भाषांतरीत केला होता. हे भाषांतरीत अध्याय लाहोरहून प्रकाशित करण्यात आले होते. पंजाबी भाषेमध्ये प्रेषित यूसुफ (अ.) यांच्या आयुष्यावर आधारित सूरह यूसुफ या अध्यायाचे विश्लेषण करण्यात आले. पंजाबीत तब्बल १३ जणांनी सूरह यूसुफ या अध्यायाचे विश्लेषण केले आहे. 

समारोप- कुरआनच्या भाषांतराची परंपरा भारतात मध्ययुगीन काळापासून पाहायला मिळते. ही परंपरा आजही कायम आहे. कुरआनचा अर्थ लावण्याच्या विविध ज्ञानपरंपरा जेंव्हापासून निर्माण झाल्या तेंव्हापासून अनुवादाविषयी मतभेद व्हायला लागले, असे दिसून येते. त्यामुळे वेगवेगळ्या पंथांच्या विद्वानांनी आपआपल्या पंथनिष्ठांनुसार अनुवाद करुन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे एकट्या उर्दू भाषेत पन्नासहून आधिक अनुवाद झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनुवादसोबत विश्लेषणातही मतभिन्नतेमुळे विपुलता आढळते. १८५७ नंतर भारतात उर्दू भाषेत अनुवाद करण्याची जणू चढाओढ लागली होती. सर सय्यद यांच्यापासून जर आपण कुरआनच्या विश्लेषणाचा आणि अनुवादाचा इतिहास समजून घ्यायला सुरुवात केली तर खूप वेगवेगळे संदर्भ आपल्याला दिसून येतात. सर सय्यद यांनी आधुनिक दृष्टीतून कुरआनचे विश्लेषण केले होते. पण सर सय्यद यांनी केलेल्या या विश्लेषणावर टिका करताना विश्लेषण विज्ञानवादी असल्याचे म्हटले गेले.१८ सर सय्यद यांच्यानंतर आधुनिक दृष्टीने कुरआनचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मौलाना आझाद यांनी केला. त्यांनी सूरह फातिहाचे केलेले विश्लेषण जगभर चर्चेचा विषय ठरले.१९ कुरआनच्या आधुनिकदृष्टीने केलेल्या विश्लेषणामध्ये मौलाना वहीदुद्दीन खान२० यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो. मौलाना अबुल आला मौदूदी, मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्या अनुवादित कुरआनचे रुपांतरण अनेक प्रादेशिक भाषांमध्ये करण्यात आले आहे.

ज्या पध्दतीने मुस्लिमेतर विद्वानांनी काही प्रमाणात कुरआनचे भाषांतर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच्या कैक पटीने मुस्लिम विद्वानांनी आणि राज्यकर्त्यांनी अनेक हिंदू धर्मग्रंथांचे फारसी, उर्दू आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादासाठी प्रयत्न केले आहेत. भगवद्‌गीतेचे भाषांतर तर मध्ययुगीन काळापासून अनेकवेळेस करण्यात आले. अकबर, इब्राहीम आदिलशाह, दारा शुकोह अशा राज्यकर्त्यांनी आणि राजघराण्यातील लोकांनी हिंदू धर्मग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी अथवा त्याच्या अभ्यासासाठी एक मोहीमच चालवली होती. त्यांच्या कालावधी सिंहासन बत्तीशीपासून ऋग्वेदापर्यंत अनेक हिंदू धर्मग्रंथांची भाषांतरे झाली त्याच्यावर ग्रंथ लिहीण्यात आले. भारतात कुरआन आणि हिंदू धर्मग्रंथांच्या अनुवादाची ही जी परंपरा निर्माण झाली आहे ती खरोखरच गौरवास्पद आहे. 

(लेखक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत. फारसी, उर्दू भाषेचे आणि मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

संदर्भ- 

१२) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ५५६

१३) सय्यद दाऊद अश्रफ, किताबों के कदरशनास आसिफ साबीह, पृष्ठ क्र. २२-२३

१४) सय्यद शाह गाजीउद्दीन, राजर्षी शाहू महाराज हयात और कारनामें, पृष्ठ क्र. १६१

१५) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ५६३

१६) सय्यद दाऊद अश्रफ, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. २४-२५

१७) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ५६६-६७

१८) अल्ताफहुसैन हाली, हयात ए जावीद, भाग १, पृष्ठ क्र. १८४

१९) मौलाना आझाद, तर्जुमानुल कुरआन, खंड १ -२

२०) मौलाना वहीदुद्दीन खान, तजकीरुल कुरआन खंड १-२

(भाग ३, समाप्त)


- सय्यद शाह वाएज


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget