Halloween Costume ideas 2015

मगर ये देश रहना चाहिए...

लोकशाही देशांमध्ये निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व असते. आपला नेता कोण आणि आपली विचारधारा कोणती याची स्पष्टता घेऊनच लोक मतदान करतात. लोकशाहीत विचारधारा आणि त्यांची धोरणे याबरोबरच लोकांना वाटणारा पक्षावरील विश्वास हाही महत्त्वाचा असतो.अलीकडे हा विश्वासच अधिक डळमळीत होईल अशी स्थिती संबंध देशभरात निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष आपला प्रबळ विरोधक कोणीही नसावा या अहंमगंडातून विरोधी विचारधारा जोपासणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची दडपशाही वापरून आपल्याला अनुकूल धोरणे ते कसे घेतील यासाठीच पूर्ण आपली शक्ती खर्ची घालताना दिसून येत आहे. २०१४ च्या विजयानंतर भाजपला जी सत्तेची झिंग चढलेली आहे ती पाहता या पक्षाची आगामी काळात वाताहत होईल हे विधान आज धाडसाचे वाटत असले तरी ते नक्की होणार यात कसलेही दुमत नाही. भष्टाचार आणि राष्ट्रद्रोही म्हणून टीका करणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही अलीकडच्या काळात या पक्षाने आपल्यात सामावून घेतलेले आहे. माणसाला एकदा सत्ता आणि पदांची हाव लागली की माणूस त्यासाठी काहीही करू शकतो हे अजित पवारांच्या उदाहरणावरून दिसून येते.

केवळ तपासयंत्रणांच्या दहशतीमुळे अजित पवार गट भाजपात सामील झाला हे अजित पवारांचे काहीशे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला गेला हे तितकेसे खरे नाही. अजित पवारांची राजकीय अभिलाषा काही लपून राहिलेली नाही. त्यांनी ती वेळोवेळी तशी जाहीर भाषणांमधून महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रदर्शित केलेली आहे.आपल्या काकांच्या हयातीतच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकी आपल्यालाच मिळावी अशी त्यांची मनोभूमिका आहे.सुप्रिया सुळे यांना पक्षात दिलेले जाणारे अवाजवी महत्त्व ओळखून आगामी काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली हा पक्ष वाटचाल करेल आणि त्यात अपेक्षीतच आपले स्थान दुय्यम राहील हे हेरूनच अगदी पद्धतशीरपणे त्यांनी आपल्याला अनुकूल अशा आमदारांचा एक गट त्यांनी पक्षात जिवंत ठेवला. हा गट शरद पवार राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तो निर्णय कायम ठेवावा यासाठीच प्रयत्नांची पराकाष्ठा करून शरद पवार हे आता घेतलेला निर्णय कायम ठेवतील अशीच आशा बाळगून होता. परंतु शरद पवारांवर प्रेम करणारा जो सामान्य मतदारवर्ग महाराष्ट्रामध्ये होता त्याचे एक दडपण आणि अजित पवारांची संभाव्य रणनिती स्पष्ट दिसत असताना आपण हा घेतलेला निर्णय आत्मघातकी होऊन शिवसेनेसारखी आपल्या पक्षाची वाताहत होऊन आपलाच पक्ष आपल्या हातातून जाईल अशी एक साधार भीती शरद पवार बाळगून होते. त्यातूनच त्यांनी आपला निर्णय बदलला आणि अजित पवारांना आता काहीतरी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. यावेळी आपण जर काही करू शकलो नाही तर आपल्या सोबत असलेल्या आमदारांचाही आपण विश्वास गमावू अशी शक्यता लक्षात घेऊन अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे सोबतीला घेऊन आलेल्या आमदारांना सत्तेचे लाभ मिळाले आणि काहीअंशी आपल्यावरील विश्वासही कायम ठेवता आला. आजचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीला अनुकूल निर्माण झाले आहे. पक्षांची पडझड झाली आमदार पळवले गेले तरी उध्दव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते नाउमेद न होता शांत राहून सोबतीला असलेल्या संघटनाच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्यां  बळावर नव्याने पक्षाची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्यास आपला पक्ष त्यास सामोरे जाईल इतपत त्यांनी आपला प्रभाव आणि जम बसवलेला आहे.

अशास्थितीत एकनाथ शिंदे गटाने दिल्लीश्वरांच्या राजकीय बळावर आणि आशीर्वादाने शिवसेना पक्ष  चिन्ह स्वतःकडे ठेवून घेऊन ही लढाई आपण  जिंकली असे भासवत असले तरी शिवसेना पक्षप्रमुख असा स्वतःचा कुठेही ते उल्लेख  करताना दिसत नाहीत. याउलट मुख्य नेते अशी काहीशी ते त्यांची ओळख करून देत आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपाच्या वळचणीला गेल्याने त्यांना भाजपच्या दिशानिर्देशानुसारच काम करावे लागेल नव्हे तसे त्यांनी मान्यच केले आहे. नव्याने सामील झालेल्या अजित पवार गटामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार हेही आता वेगळे सांगण्याची गरज नाही.

२०२४  च्या निवडणुकांत निश्चितच महाविकास आघाडीची स्थिती मजबुत होणार हे आतापासूनच दिसत आहे. एकेकाळचे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे छोटे मित्रपक्षही आता भाजपविरोधी बाकावर बसण्यास सुरूवात झाली आहे. अगदी देशपातळीवर विरोधी पक्षांची एकजुट घडवून आणण्यातही शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही झुकला नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा स्वाभिमानाचा आणि जाज्वल्यांचा आहे. त्यातूनच नव्याने निर्माण झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत महत्वाची भूमिका महाराष्ट्रातील नेते वठवित आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची प्रतिमा उजळली आहे. नव्याने शिक्षेवरील सुनावणीला सर्वाच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यांना खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून यथावकाश प्रदान करण्यात आल्यानंतर लोकसभेत ज्या जल्लोषात इंडिया आघाडीकडून त्यांचे संसद आवारात स्वागत झाले त्यामुळे एक नवा विश्वास आणि नवी उमेद या विरोधी आघाडीत निर्माण झाली आहे. गेली नऊ वर्षे केवळ आणि केवळ लोकांना स्वप्नरंजनात रमवून धार्मिकतेच्या नावावर मंदीर मस्जिदांमध्ये लोकांना खिळवून ठेवून लोकशाहीची फळे चाखण्याचीपासून वंचित ठेवले जात असल्याची भावना आता देशभरातील सामान्य मतदारामध्ये निर्माण झाली आहे. मणीपूर अजूनही जळते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही जबाबदारी असताना त्यांनी त्यावर हेतूपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. ते माध्यमांनाही कधी कोणत्या विषयावर प्रतिक्रिया देत नाहीत किंवा पत्रकार परिषद ही घेत नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विरोधक पंतप्रधानांनी निवेदन करावे म्हणून अविश्वास प्रस्ताव आणत आहेत, तरूण बेरोजगारीने त्रस्त आहेत, शेतकरी निराश आहे, बॅक प्रणालीसह संपूर्ण अर्थव्यवस्था धनाढ्यांकडून लुटली जात आहे. भारतीय जनता पक्षाने जे विष गेली सात दशके या देशभर पेरले आहे. त्याला आता सुरूंग पेटून त्यांच्या ज्वालेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी हेतूपूर्वक पसरवलेली धार्मिक विध्वंसात जळून भारत हे राष्ट्र नवाने मोकळा श्वास घेईल. हे वेळोवेळी ऐतिहासिक दाखल्यावरून सिद्ध झालेले आहे. सरतेशेवटी पक्ष, विचारधारा आणि संसदीय राजकारण यापलीकडे भारत नावाचा देश हा इथे असलेल्या हाडामांसाच्या माणसांपासून बनलेला आहे. देशभर हिंसाचारांचा आगडोंब उसळला जात आहे. अशा स्थितीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या ह्या कवितेच्या ओळी आठवतात...

"सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी

मगर ये देश रहना चाहिए..."


-हर्षवर्धन घाटे

नांदेड, ९८२३१४६६४८

(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget