Halloween Costume ideas 2015

जातीय हिंसेमधून देशाची मोठी हानी


31 जुलै 2023 रोजी जयपूर-मुंबई रेल्वेमध्ये चेतनसिंह चौधरी नावाच्या सीआरपीच्या एका जवानाने आपल्या बंदुकीतून सोबत असलेले टिकाराम मीना यांना गोळी घातली. त्यानंतर वेचून तीन मुस्लिम प्रवाशांना गोळ्या घालून ठार केले. तिसऱ्याला ठार केल्यानंतर त्याने सांगितले की, या देशात रहायचे असेल तर मोदी आणि योगी यांचं ऐकूण रहावं लागेल. नेहमीप्रमाणे यावेळेसही या चेतनसिंह चौधरी याला आतंकवादी न म्हणता ’माथेफिरू’ असे म्हणून मीडियाने या घटनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तो माथेफिरू किंवा मनोरूग्ण होता तर त्याच्या हातात रायफल कोणी दिली? त्याचा विलाज का केला गेला नाही? दोन-तीन डब्यात फिरून त्याने इतर प्रवाशांना हानी न पोहोचविता केवळ मुस्लिम प्रवाशांनाच हेरून कसे काय ठार केले? आणि ह्या हत्याकांडानंतर त्याला घटनास्थळावरून पळून जाण्याची समज कशी मिळाली? यावरून तो माथेफिरूही नव्हता आणि मनोरूग्णही नव्हता हे सिद्ध होते. 

31 जुलैलाच रात्री हरियाणाच्या नूह आणि गुरूग्रामच्या से्नटर नं. 57 मध्ये एका मशिदीमध्ये घुसून एका जमावाने नायब इमाम साद या तरूणाची गोळा घालून हत्या केली आणि दुकानांना आगी लावल्या. अनेक वाहने पेटवून दिली.

एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक या दोघांची हानी झालेली आहे. पण नेहमीप्रमाणे अल्पसंख्यांकांची जास्त झाली. केंद्र आणि हरियाणा राज्य दोन्हींमध्ये भाजपची सत्ता आहे. नेहमीप्रमाणे ही दोन्ही सरकारे गप्प आहेत. राष्ट्र, भाषा, प्रांत, जात, वर्ण अशा अनेक विभागात विभागालेल्या भारतीय समाजात ज्या वेगाने आपसातील घृणा वाढत आहे त्यातून देशाला जी हानी होत आहे ती एक दिवस देशाला नुकसानीच्या खोल दरीत लोटून देईल व देशाला कित्येक वर्षे मागे घेऊन जाईल यात शंका नाही. या घृणेचे मूळ हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वर्ण व्यवस्थेत आहे. ज्यांना जन्माच्या आधारावर समाजात विशेष सवलती व विशेष सन्मान मिळत आहे. ते सुखासुखी कशाला त्या सोडतील. उलट ती व्यवस्था कशी दृढ होईल यासाठी त्याला खतपाणी घालतील. यातूनच आपल्या देशात जातीवाद फोफावलेला आहे. त्यामुळेच उत्तरोत्तर समाज खंडित होत चालला आहे. ही घृणा केवळ मुसलमानांच्या विरूद्ध आहे असे नाही. मुंबई आणि गुजरातमध्ये युपी आणि बिहारींच्या विरूद्ध केवळ ते दुसऱ्या प्रदेशातील आहेत, एवढ्याच कारणावरून अनेकवेळा हिंसक कारवाया केल्या जातात. हे मजूर हिंदू असूनही त्यांच्याविरूद्ध हिंसा केली जाते. त्यामुळे हा प्रश्न केवळ हिंदू आणि मुस्लिमांपुरता मर्यादित आहे असे नाही. म्हणून यावर सखोल चर्चा करणे गरजेचे आहे. वरवरचा विचार करून ही समस्या सुटणार नाही. 

हानीकारक सांप्रदायिक विचार

राजकीय सत्ता हाती यावी व ती अबाधित रहावी, यासाठी संघाने भाजपला पुढे करून, ’’हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे तत्वज्ञान देशासमोर मांडले. या तत्वज्ञानावर आधारित सरकार केंद्रात आणि अनेक राज्यात आणण्यात संघाला यश सुद्धा प्राप्त झाले. वर्ण, वंश, देश, प्रदेश, भाषा, कातडीचा रंग इत्यादींना मुलभूत तत्व माणून आपल्या देशातच लोकांना संघटित केले जाते असे नाही तर असे अनेक ठिकाणी केले जाते. इतिहासात रोमण लोकांनी वंशाच्या श्रेष्ठत्वाचे तत्वज्ञान मांडून, ’’द ग्रेट रोमन अ‍ॅम्पायर’’ उभे केले होते. तर नाझी वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या पायावर हिटलरने जर्मनीत आपला जम बसविला होता. राष्ट्रवादाचा यशस्वी प्रयोग करून मुसालेलीनीने इटालित सत्ता काबिज केली होती. तर ब्रिटिशांनी गोऱ्या कातडीच्या श्रेष्ठत्वत्वावर आधारित ब्रिटिश साम्राज्य जगभर उभे केले होते. या तत्वज्ञानामागील मानसिकतेची अनेकदृष्टीने अनेक लोकांनी व्याख्या केलेली आहे. मात्र सर्वात समर्पक अशी व्याख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी यांनी त्यांचे पुस्तक ’’मसला-ए-कौमियत’’ अर्थात राष्ट्रवादाचा प्रश्न यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. 

या संबंधी मौलाना म्हणतात, ’’अंधार युगातून सांस्कृतिक युगात जेव्हा माणसाने प्रवेश केला तेव्हा त्याला विविधतेतून एकता निर्माण करण्याची गरज भासली. समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक झाले. संस्कृतीच्या विकासासोबतच संघटित एकतेचे वर्तूळही विस्तारत गेले. एवढे की एक मोठी जनसंख्या या वर्तुळात दाखल झाली. याच संघटित समुहाचे नाव जमात किंवा समुदाय होय. यातूनच, ’आपला समुदाय’ या संकल्पनेचा जन्म झाला. सुरूवातीला ’आपला समुदाय’ ही संकल्पना निरागस होती. कोणाला हानी पोहोचविण्याचा त्यामागे उद्देश्य नव्हता. फक्त सामुहिक प्रयत्नातून आपल्या समुहाच्या गरजा पूर्ण करणे हाच या समुदायवादाचा उद्देश्य होता. व्यक्तिगत प्रयत्नांऐवजी सामुहिक प्रयत्नातून जास्त लवकर आणि जास्त चांगले परिणाम मिळू शकतील, याच गृहितकावर सुरूवातीला समुदायाची स्थापना झाली.’’

मौलानांच्या मते या वर्ण, वंश, भाषा, देश, प्रदेश, कातडीचा रंग इत्यादीच्या पायावर स्थापन झालेल्या समुदायाच्या स्थापेनचा पहिला नैसर्गिक परिणाम ’अस्बीयत’  अर्थात ’पक्षपाताच्या’ रूपाने जगासमोर आला. जेव्हा प्रत्येक समुह आपापले स्वारस्य (हित) जपण्यासाठी आपल्या सारख्या माणसांचा समुदाय गोळा करतो. त्यासाठी त्यांना एका वर्तुळाची गरज भासते. साहजिकच त्या वर्तुळाबाहेरची माणसं, आपली राहत नाहीत. ह्यातूनच आपल्या वर्तुळातील माणसं चुकली तरी त्यांना सांभाळून घेण्याची प्रवृत्ती वाढते व ती चूक दुसऱ्या समुदायाच्या माणसाने केली तर केवळ त्यालाच दंडित केले जात नाही तर त्याच्या समुदायातील प्रत्येकाला दंडित करण्याची प्रवृत्ती बळावते. काही वर्षापूर्वी गुजरातमध्येही असेच झाले. सांबरकांठा जिल्ह्यात एका बिहारी माणसाने 14 महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेवरून समस्त उत्तर भारतीयांच्याविरूद्ध हल्ले सुरू झाले व 50 हजारांपेक्षा जास्त लोकांना गुजरात सोडावे लागले.

याच मानसिकतेतून मग कठुआ सारख्या प्रकरणात 8 वर्षाच्या चिमुरडीवर झालेले डोंगराएवढे लैंगिक अत्याचार दिसत नाहीत. आपल्या समुदायातील लोक जरी दोषी असले तरी ते कायद्याच्या कचाट्यात अडकू नयेत, असे वाटते. त्यासाठी मग मोर्चे निघतात व त्यात आपल्या वर्तुळातील माणसे तर सोडा मंत्री दर्जाची माणसेसुद्धा विवेक हरवून दोषींच्या समर्थनात निर्लज्जपणे पुढे येतात. याच जमातवादी मानसिकतेतून हिटलर सारख्याला दुसऱ्या समुहातील लाखो ज्यूंची कत्तल करण्याची प्रेरणा मिळते. याच कारणामुळे मणिपूरचा वनवा अडिच महिन्यानंतरसुद्धा धगधगत राहील याची व्यवस्था केली जाते.  आज 21 व्या शतकातसुद्धा काही लोक याच मानसिकतेतून हिटलरला आपला आदर्श मानतात. त्यात त्यांना जरासुद्धा लाज वाटत नाही. जमातवादाचा पगडा इतका जबरदस्त असतो की, मानवतेचे जंगल ज्या कुऱ्हाडीने कापले जाते त्या कुऱ्हाडीचा दांडा केवळ आपल्या समुदायाचा म्हणजेच लाकडाचा आहे म्हणून जंगलातील बहुसंख्य झाडे कुऱ्हाडीचे समर्थन करतच राहतात. त्यातूनच मानवतेची अपरिमित अशी हानी होते.

जमातवादाचे वैशिष्ट्ये

कुठल्याही आधारावर का असेना एकदा का समुदायाची स्थापना झाली की त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या समुदायात एकात्मतेची ठोस भावना निर्माण होते. आपल्या समुदायातील हितासाठी कोणताही आणि कितीही मोठा त्याग करण्यासाठी त्या समुदायातील माणसे प्रेरित होतात. किंबहुना तसा त्याग करून ते स्वतःला धन्य समजतात. त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण पक्षपात करून दुसऱ्या आपल्याच सारख्या मानवी समुदायाच्या हक्कांची पायमल्ली करीत आहोत.

उलट प्रतिस्पर्धी समुदायाला शत्रुस्थानी समजण्याची  व त्यातून त्या समुदायाचे जास्तीत जास्त नुकसान करण्याची प्रवृत्ती बळावते. विशेष म्हणजे याला वाईट समजण्याएवढी प्रगल्भता सुद्धा जमातवादाने बाधित समाज हरवून बसतो. मौलाना मौदूदी म्हणतात ही सैतानी प्रवृत्ती आहे. सैतान एका समुदायाला दूसऱ्या समुदायाविरूद्ध लढवून मानवतेची शिकार करीत असतो.

याच जमातवादी मानसिकतेतून माणसांनी आपल्या मर्जीने राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये कृत्रिम सीमा आखून स्वतःला एका राष्ट्रात कैद करून घेतले आहे. हा माणसाच्या मनाचा कोतेपणा आहे. प्रत्येकाने स्वतःला पृथ्वीचा रहिवाशी का म्हणवू नये? माझा देश ही माझी पृथ्वी आहे असे का म्हणू नये? अर्थात असा व्यापक विचार करण्यापासून त्याला जमातवाद व राष्ट्रवादाने रोखले आहे?

जी गोष्ट राष्ट्राची तीच वंशाची. एक स्त्री आणि एका पुरूषापासून सुरू झालेल्या प्रत्येक वंशामध्ये कालांतराने दुसऱ्या वंशाचे लोक येवून मिळतातच. अगदी ज्याला ब्रिटीश रॉयल फॅमिली संबोधले जाते त्यातही रॉयल पुरूषांनी आपल्या वंशाबाहेरच्या अनेक महिलांशी लग्न करून त्यांना आपल्या वंशात सामील करून घेतले आहे. त्यामुळे तो वंशही आता रॉयल राहिलेला नाही. जेव्हा ब्रिटिश वंश रॉयल नाही तेव्हा बाकीच्या वंशाचे काय? जर अशी परिस्थिती असेल तर पृथ्वीवरील सर्व माणसे एकाच वंशाचे आहेत, असा व्यापक विचार का करण्यात येवू नये?

यासंबंधी मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’माणसांचे विविध गट व वंश यांची आपसातील ओढाताण, त्यांच्यातील भेदा-भेद, एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना, स्पृश्य-अस्पृश्यतेची भावना या आधारहीन आणि कृत्रिम आहेत. या मानवनिर्मित कल्पना आहेत. यांना कुठलाही ठोस आधार नाही. आपल्या मूळ प्रवृत्तीच्या विरूद्ध जावून माणसांनी कृत्रिमरित्या आपसात हे मतभेद उभे केले आहेत.

मतभेद कोणामध्ये होत नाहीत? एकाच वंशातील लोकांमध्ये सुद्धा होतात. एवढेच कशाला दोन सख्या भावांमध्ये सुद्धा होतात. खरे पाहता मानवा-मानवामध्ये मतभेद फक्त एकाच आधारावर होऊ शकतात ते म्हणजे श्रद्धा, नितीनियम आणि वर्तणूक. याच आधारावर एकाच आई-वडिलांची दोन मुले वेगवेगळी ठरू शकतात व याच आधारावर जगाच्या पुर्वेला राहणारा एक माणूस पश्चिमेला राहणारा दूसरा माणूस एक असू शकतो. राहता राहिला वर्ण, वंश, भाषा या वेगळेपणावर मैत्री किंवा शत्रुत्व ठरवणे निरर्थक आहे. असे म्हणणे कितपत तर्कपूर्ण आणि योग्य आहे की, अमूक डोंगर, नदी किंवा रेषेअलिकडे जी मूलं जन्माला येतात, अमूक एक भाषा बोलतात, त्यांच्या त्वचेचा रंग अमूक आहे तो आपला आहे आणि त्याला आमच्यावर संपूर्ण अधिकार प्राप्त आहेत. मात्र या पलिकडे जे मूल जन्माला येते, तमूक भाषा बोलते, त्याच्या त्वचेचा रंग तमूक आहे तो परका आहे. त्याच्यात आणि आमच्यात कोणताच संबंध नाही. याशिवाय, भाषासुद्धा समुदाय निर्मितीचा आधार असणे उचित नाही. भाषा फक्त संवादाचे एक माध्यम आहे. एकच भाषा बोलणाऱ्यांमध्ये आपसात आपोआपच स्नेहनिर्मिती होत असते. पण हा स्नेह दूसरी भाषा बोलणाऱ्यांविषयी द्वेषात रूपांतरित होतो ही जमातवादाची मोठी शोकांतिका आहे.

भाषेप्रमाणेच त्वचेचा रंग हा सुद्धा जमातवादाचे एक मोठे कारण आहे. ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे ते आमचे नाहीत, असे गोऱ्यांनी समजावे, यासारखा दूसरा अज्ञानीपणा तो कोणता? पण ही मुर्खपणाची भावना कोट्यावधी गोऱ्या लोकांमध्ये अनेक शतकांपासून रूजलेली आहे. ती आजतागायत कायम आहे. 

धर्माला नाकारून पाश्चिमात्य देशांनी राष्ट्रवादाच्या गोंडस नावाखाली पश्चिमेमध्ये जमातवाद जोपासला. त्यांनी राष्ट्रवादाला एवढे महत्व दिले की जणू राष्ट्रवादासारखे दूसरे पुण्य कर्मच नाही. जमातवाद हा राष्ट्रवादाचा मुख्य ’कलमा’ (ब्रीदवाक्य) बनला. त्यातूनच मग ’हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व’ किंवा ’अमेरिका फर्स्ट’ सारख्या संकल्पनांचा जन्म झाला. त्यातूनच प्रत्येक देश आपल्या हिताचा विचार करायला लागला. आजमितीला ही पृथ्वी 200 पेक्षा जास्त देशांमध्ये विभाजित झालेली असून, प्रत्येक देश आपल्या देशापुरतेच पाहत आहे.

यामुळे अनेक गरीब देशांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. पृथ्वीच्या या विभागणीला कुठलाही ठोस आधार नाही. केवळ राजकीय व आर्थिक हित साधण्याइतपत मर्यादित असा हा संकुचित विचार आहे. 

इस्लामचा वैश्विक विचार 

जगाच्या या संकुचित विचारापेक्षा वेगळा आणि व्यापक असा जो विचार इस्लामने जागतिक मानवसमुदायासमोर 1445 वर्षांपूर्वी मांडला तो आजही ताजा असून, मानवजातीच्या कल्याणाचा हाच विचार तारणहार आहे. तो विचार कोणता हे पहायचे असेल तर  कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,

1.लोकहो ! आम्ही त्याला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले. आणि मग तुमची राष्ट्र आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक पाहता अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चित अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. (संदर्भ : अल हुजरात आयत नं.13)

2.  लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरूष व स्त्रीया जगभरात पसरविल्या. (संदर्भ : सुरह निसा आयत नं.1)

संपूर्ण कुरआनमध्ये कुठेच राज्य, राष्ट्र, देश, प्रदेश, वर्ण, भाषा, वंश यावरून माणसा-माणसामध्ये भेद करणारी एक आयातसुद्धा कोणाला सापडणार नाही. प्रत्येक ठिकाणी अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी विपुल मार्गदर्शन केलेले आहे. कुरआनचे संबोधन सर्व मानवसमाजासाठी आहे. हाच कुरआन हा ग्रंथ वैश्विक असल्याचा पुरावा आहे. इस्लामला पक्षपात मान्य नाही. उलट इस्लाम पक्षपाताला शत्रुस्थानी मानतो. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अरबस्थानातील पक्षपाती अरबी टोळ्यांसमोर इस्लामचा जेव्हा व्यापक विचार मांडला तेव्हा प्रत्येक कबिल्याकडून त्यांना विरोध झाला. त्यामागे कबिल्यांची जमातवादी मानसिकताच कारणीभूत होती.

आज 1445 वर्षानंतर या पृथ्वीवर 180 कोटी लोक इस्लामच्या या सर्वसमावेशक तत्वावर विश्वास ठेऊन गौरवान्वित होऊन समतामुलक जीवन जगत आहेत. मात्र बहुसंख्य मुस्लिमांचा कुरआनशी शऊरी (जाणीवपूर्वक) संबंध तुटल्याने त्यांना या उदात्त संकल्पनेची समज नाही ते स्वतःला एक समुदाय समजतात व त्यातूनच एकमेकांच्या विरूद्ध लढत राहतात. याच मानसिकतेतून काही ठिकाणी मुस्लिम्मेत्तरांसोबत जो पक्षपात केला जातो, तो तसे करणाऱ्याचा दोष आहे इस्लामचा नाही. उलट आपल्या या इस्लामविरोधी कृत्यासंबंधी त्यांना अंतिम निर्णयाच्या दिवशी सुनावणीस सामोरे जावे लागेल व अल्पसंख्यांक मुस्लिम्मेत्तर पीडितांची पैरवी साक्षात प्रेषित मुहम्मद सल्ल. हे करतील, असे हदीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

इस्लामवर मुस्लिमांचा एकाधिकार नाही. ज्या मुस्लिम्मेत्तर बांधवांना मुस्लिम चुकत आहे असे वाटत असेल तर त्यांनी पुढे यावे व इस्लामची खरी शिकवण जगासमोर मांडावी. कारण इस्लाम हा सर्वांसाठी आहे. इस्लाम इज फॉर ऑल. देशातील घृणेला संपविण्याचा इस्लामशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. कोणाला पटो किंवा न पटो मात्र सत्य हेच आहे. 


- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget