मातीची कष्टानं निगराणी करून, मातीतून तरारणारं पीक हातात येऊ घातलं असतांनाच त्या कर्त्याधर्त्या शेतकऱ्यांच्या जीवनात अचानक संकटांनी गच्च काळोख पसरावा, जणू त्या शेतकऱ्यांच्या अंगावर डोंगर कोसळावा, तशी अवस्था ना. धों. महानोर यांच्या जाण्याने झाली आहे. निसर्ग कवी म्हणून नामदेव धोंडो महानोर हे त्यांच्या लेखणीने महाराष्ट्राच्या सारस्वतातील मानाचे सुवर्ण पान ठरले होते. त्यांच्या लेखणीने सतत समाजभान जपलं. शेतशिवारातील काळ्या आईची संवेदनशील भाषा त्यांनी आपल्या कवितेतून अख्ख्या मराठी माणसाच्या हृदयात नेली. त्यांनी शेतकऱ्यांची रानावनातली, वाड्यावस्त्यांवरची दुःखं आपल्या कवितेतून सातत्याने समाजासमोर, सरकारसमोर मांडली. ते शेतकऱ्यांचा मुकनायक बनले. अर्थात त्यांनी शेतकऱ्यांची दुःख आणि प्रश्न विधीमंडळात पोटतिडकीने मांडले.
महानोर हे निसर्गाचे कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित होते, मात्र ते सर्वप्रथम पक्के सुजाण शेतकरी होते. त्यामुळे शेती, शेतकरी आणि त्यातून त्यांनी लिहिलेल्या प्रतिभासंपन्न कविता या इतक्या एकजीव आणि समरस झाल्या होत्या, की असा वास्तववादी चित्रण करणारा कवी यापूर्वी झाला नाही आणि पुढे नजीकच्या काळात होणे नाही. संत तुकोबारायांच्या अभंगाशी आणि खानदेशातील बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्यांशी पावलांवर पाऊल टाकत पुढे जाणारी आणि तळागाळातील शेतकऱ्यांच्या वेदना अंतःकरणाने जाणणारी त्यांची कविता होती.
१९६५ नंतर साठोत्तरी मराठी साहित्य कात टाकत असतानाच "या नभाने या भुईला दान द्यावे" असे विनम्र आवाहन करणाऱ्या त्यांच्या शब्दकळांनी कवितेच्या प्रांतात भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्या "रानातल्या कविता" उगवल्या तेव्हा समग्र मराठी वाचकांना ओल्या मातीचा गंध अनुभवायला मिळाला. त्यांची प्रत्येक कविता ही काळ्याभोर मातीतून नूकतीच तरारून वर आल्यासारखी वाटते. त्यांच्या प्रत्येक कवितेला मृगाच्या पहिल्या सरी पडून गेल्यावर ओल्या मातीला पोटात घेतलेल्या दाण्याला कोंब फुटून आणण्यासाठी जी अनावर उत्कट भावना निर्माण होत असेल, तशी महानोरांची कविता संवेदनशील मनातून येत होती आणि म्हणूनच ती काळ्याभोर मातीशी नातं सांगणारी होती. ती अस्सल मऱ्हाटी वावरातली होती. महानोरांच्या कवितांनी तत्कालीन विविध कवितेला धक्का दिला आणि खडबडून जागे ही केले.
महानोर हे हाडाचे शेतकरी होते. त्यांनी शेतात प्रत्यक्ष कष्ट करून अनेक नवीन प्रयोग ही केले. त्या वेळी जे त्यांनी अनुभव घेतले, त्यातून त्यांची कविता अस्सल मातीतून आल्यासारखी वाटतेय. त्यांनी रानावनातला, शेतशिवारातला निसर्ग आपल्या कवितेतून मांडला. त्यांची कविता शेतकऱ्यांच्या जीवनातला साजशृंगार लेवून समोर आली. तशी ती अस्सल रोमॅंटीकही होती, तथापि तत्कालीन रोमॅंटीझमला धक्का लावत एक वेगळी सौजन्यपूर्ण उंची त्यांच्या कवितेला लाभली होती. निसर्ग हा त्यांच्या जगण्या-मरण्याचा श्वास होता. त्यामुळे त्यांची शब्दकळा ही मराठमोळी ग्रामीण जगातील निसर्गाशी नाते सांगणारी होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील जगणं, त्यांची सुख दुःख, दुष्काळ, पावसाच्या सरी, पावसानं दिलेली हुलकावणी, शेतातल्या वाफपेरणी, नांगरणी, कोळपणी, भांगलण या दुर्लक्षित गोष्टी आपल्या कवितेतून व्यक्त केल्या. एक प्रतिभावंत कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला, तो या त्यांच्या निसर्गातल्या कवितेंमुळेच.
रानातल्या कविता, पावसाळी कविता, अजिंठा (दीर्घ कविता), पानझड, पक्ष्यांचे लक्ष थवे, गंगा वाहू दे निर्मळ, वाहटूळ, पळसखेडची गाणी यांसारख्या त्यांच्या कवितासंग्रहाच्या शीर्षकापासूनच निसर्गाचे नाते सांगितले आहे. ते केवळ कवितेच्या प्रांतात रमले असे नाही, तर त्यांनी कथा, कादंबरी, ललित साहित्यातही मुशाफिरी केली आहे. गांधारी (कादंबरी), गावातल्या गोष्टी (कथा), यशवंतराव चव्हाण आणि मी, पु. ल. देशपांडे व मी, शरद पवार व मी, ऐसी कळवळ्याची जाती, त्या आठवणीचा झोका, गपसप, रानगंधाचे गारूड (लोककथा संग्रह), गावगारूड (नाटक), कवितेतून गाण्याकडे, रानगंध यांसारख्या अनेक साहित्याची निर्मिती त्यांच्या नावावर आहे. शिवाय शेती, पाणी, आणि पर्यावरण याविषयीची त्यांची शेतकरी दिंडी, शेतीसाठी पाणी, सीताफळ बागेची गोष्ट, दिवेलागण, शेती,आत्मनाश व नवजीवन, या शेताने लळा लाविला, विधीमंडळातून आदी साहित्य संपदा आहे.
जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक, अबोली, मुक्ता, दोघी, थांग, मालक, उरूस, अजिंठा, यशवंतराव चव्हाण: बखर एका वादळाची, आदी मराठी चित्रपटांना गीतरचना केली आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याने मोहोर उमटवली आहे. १९७८ ते १९८४ मध्ये ते महाराष्ट्र सरकार राज्यपाल नियुक्त आमदार होते. याच कालावधीत ते महाराष्ट्र शासन चित्रपट, नाट्य व सांस्कृतिक कार्य विभागाचे सदस्य होते. १९९० ते १९९५ या काळात ते विधान परिषदेचे आमदार होते. याबरोबरच ते विश्वकोश मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य अकादमी, दिल्ली व सरदार सरोवर समिती या संस्थेचे सदस्य म्हणून जबाबदारीने काम केले आहे.
महानोर हे केवळ निसर्ग कवी नव्हते, तर गद्य साहित्यांत ही त्यांनी आपले खणखणीत नाणे वाजवून दाखविले आहे. त्यांनी आमदार म्हणून विधीमंडळात केलेलं काम ही महत्वपूर्ण ठरलं आहे. फळबाग लागवड व जलसंधारण यामध्ये त्यांनी भरभक्कम व महत्वाची भूमिका बजावली आहे. हा भव्यदिव्य स्वप्नं पहाणारा आणि ती स्वप्नं मातीतून वास्तवात साकारणारा शेतशिवारातला हा शेतकऱ्यांचा मूकनायक मातीआड गेला, त्यांच्या जाण्याने शेतशिवार आणि शेतकरी अबोल झाला, गहीवरला, यात संदेह नाही.
-डॉ. सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर, भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)
Post a Comment