नैराश्य, उदासीनता, राग व चिडचिड वाढण्याचे एक कारण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे हेही आहे. कोणतीही व्यक्ती कितीही प्रिय असली आणि कितीही जवळची असली तरीही ती आपल्या सर्वच अपेक्षांवर खरी उतरू शकत नाही म्हणूनच माणसाने लोकांकडून कशाचीही अपेक्षा ठेवू नये. आपण मात्र लोकांना त्यांचे हक्क द्यावेत. लोकांशी शरीयतनुसार वागावे आणि आपल्या सर्व आशा, अपेक्षा अल्लाहवर ठेवाव्यात. निर्मात्या ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची हीच खरी शान असते की, तो आपले प्रत्येक कार्य केवळ अल्लाहसाठीच करतो आणि त्याचे बक्षीसही अल्लाहकडेच मागतो. आदरणीय पैगंबर (स) यांनी केलेल्या प्रार्थनेवरून हेच स्पष्ट होते,
अल्लाहुम्मज-अलनी मिम्मन तवक्क-ल अलय-क फ-कफय-तहू वस्तहदा-क फ-हदय-तहू वस्तन्सर-क फ-नसर्-तहू. (कन्जुल उम्मालुल अद्ईयतल् मुत्लकह-5106) (adbimiras.com)
अनुवाद
हे अल्लाह! मला त्या लोकांमध्ये सामील कर ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला तेंव्हा तू त्यांच्यासाठी पुरेसा ठरला, ज्यांनी तुझ्याकडे मार्गदर्शन मागितले तेंव्हा तू त्यांना मार्गदर्शन केले आणि ज्यांनी तुझ्याकडे मदत मागितली तेंव्हा तू त्यांना मदत केली.
माणसाला दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा असते, दुसऱ्यांकडून आदर हवा असतो, स्वत:चा मान सन्मान ठेवण्याची अपेक्षा असते, इतरांकडून प्रेम हवे असते. प्रत्येक व्यक्ती स्वत:चा सुखसमाधान शोधत असते. अशा परिस्थितीत दुसऱ्यांनी आपल्या आनंदासाठी झटावे ही अपेक्षाच चुकीची आहे, म्हणून अपेक्षाभंग होऊन दु:खी होण्याचे टाळायचे असेल, तर कोणी आपली काही मदत करेल, कोणी आपल्याकडे लक्ष देईल यासारखे विचार सोडून द्यावे. कोणी आपल्याशी कसे बोलावे, वागावे, राहावे याकडे फारसे लक्ष न देता, दुसऱ्यांना सुखी, समाधानी व आनंदी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो या विचारानुसार जे जगतात, वागतात, त्यांच्या प्रत्येक गरजेच्या वेळी अल्लाह त्यांच्यासाठी पुरेसा असतो.
या जगात आणि मृत्युनंतरच्या जीवनात प्रत्येक गरज पुर्ण होण्यासाठी माणसाने आपले डोळे केवळ अल्लाहकडेच लावावेत. आपल्या निर्मात्याशी आपले संबंध अधिकाधिक मजबूत करावे व दृढ विश्वासाने त्याच्याकडूनच प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ठेवावी.
........................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment