Halloween Costume ideas 2015

मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा ताण


आयुष्यात येणारा ताण आणि त्यातून येणाऱ्या नैराश्याच्या कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे माणसाचा होत असलेला अपेक्षाभंग. आपल्याला स्वत:साठी एखादी गोष्ट चांगली वाटते पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. कधी-कधी तर उलट परिस्थितीतून जावे लागते. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअरची खूप इच्छा असते पण प्रवेश न मिळाल्याने दुसरा मार्ग निवडावा लागतो. माणूस एका ठिकाणी नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो पण त्यात अपयश आल्याने दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधावी लागते. लग्नासाठी एखादे स्थळ सर्वांनाच पसंत पडते पण खूप इच्छा असूनही तिथे लग्न होत नाही. दुसऱ्या ठिकाणी मात्र सहजरित्या संबंध जुळून येतात. आयुष्यात अनेकदा हा अनुभव येतो की, कोणीतरी आपल्या इच्छा व प्रयत्नांना रोखत आहे. अशा तऱ्हेने मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा तब्येतीवर परिणाम जरूर होतो. मात्र येणारी प्रत्येक चांगली-वाईट स्थिती निर्मात्यानेच ठरवलेली आहे आणि जे काही घडते त्यातच भलाई असते, हे लक्षात ठेवल्यास मन समाधानी राहते. काही काळ जरी परिस्थितीचा त्रास झाला तरीही माणूस आपल्या समस्यांबद्दल कुणालाही दोषी ठरवत नाही आणि कुणाबद्दलही मनात तक्रार बाळगत नाही. जीवनात कधी ध्यानीमनी नसतानाही अचानक आनंदाची बातमी मिळते तर कधी संकटावर संकटे येऊन कोसळतात. मग जेव्हा परिस्थिती आपल्या हातातच नसते, जे काही घडत आहे ते टाळताच येत नाही, तेव्हा माणसाने काय करावे?

जीवनातील कठीण प्रसंगी, संकटकाळी धीर धरावे, ऐष व आरामात, सुखसमृद्धीच्या दिवसात अल्लाहचे आभार मानावे आणि त्याने ठरवलेल्या नशिबात समाधानी राहावे.

माणसाला जेव्हा एखादा आजार होतो, आर्थिक नुकसान होते किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा लोकं असं म्हणताना दिसतात, जर आपण असे केले असते तर नुकसान झाले नसते. किंवा आपण तसे करायला हवे होते. एक गोष्ट खूप लक्षात ठेवण्याची गरज आहे की हे ’जर’ ’तर’ व ’असे’ ’तसे’ आणि अशा प्रसंगी वापरण्यात येणारे यासारखे इतर शब्द ईशप्रसन्नता प्राप्त करण्यात मोठे अडथळे ठरतात. माणसाचे शहाणपण यातच आहे की त्याने प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी, त्याचे फायदे-तोटे अगोदरच विचारात घ्यावेत, मग ते केल्यानंतर फायदा होवो कि नुकसान त्याला ईश्वराने ठरवलेले नशीब मानून प्रसन्न राहावे, त्याबद्दल कोणतीही तक्रार करू नये, कसलाही गोंधळ करू नये, पुढे इतर पर्यायांचा अवलंब करून भविष्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत. याबरोबर ही प्रार्थना करावी, अल्लाहुम्मा इन्नी अस्-अलु-क इमानन युबाशिरु कल्बी वयकीनन सादिकन हत्ता अअलमु अन्नहु ला युसीब्नी इल्ला मा कतब्-त ली. ( कन्जुल्-उम्माल-5974-पृ.184-खंड 2.रवलळाळीरी.लो) 

हे अल्लाह! मी तुझ्याकडे मनात घर करणारी श्रद्धा मागतो आणि इतका खरा विश्वास मागतो, जेणेकरून मला कळेल की जे दुःख मला पोहोचतील त्यांना मी तूझ्याकडून लिहिलेले नशीब समजेन.

आपल्यापैकी प्रत्येकाला वाईटाच्या स्वरूपात काही चांगले घडल्याचा अनुभव येतो, पण हा अनुभव अधूनमधूनच येतो. याचे कारण असे की जेव्हा एखाद्या वाईटात दडलेली भलाई जरा लवकर समोर येते तेव्हा आपले मन त्यांच्यातील संबंध ओळखण्यास सक्षम असते, म्हणून त्यावेळी आपण लगेच म्हणतो की हे चांगलेच झाले, जे अशा आणि अशा वाईट स्वरूपात मला भोगावे लागले. परंतु बऱ्याचदा असेही होते की वाईटात लपलेली भलाई इतका काळ गेल्यानंतर जाहीर होते की आपल्याला त्याचा संबंध ओळखता येत नाही. जे लोक या दृष्टिकोनातून आपल्या परिस्थितीचा विचार करतात ते अशा प्रकारच्या संबंधांना इतरांपेक्षा अधिक ओळखतात आणि या वस्तुस्थितीवर त्यांचा विश्वासही तितकाच पक्का असतो.

जेव्हा आपल्या कोणत्याही प्रयत्नांचे आणि संघर्षाचे परिणाम आपल्याला अपेक्षेप्रमाणे दिसत नाहीत, तेव्हाही आपण हाच विश्वास ठेवला पाहिजे की या वेळीही अल्लाहची कृपा माझ्यावर आहे, कारण त्याच्या परवानगीशिवाय एक पानही झाडावरून पडू शकत नाही आणि त्याच्या मर्जी विरूध्द एक कणही आपल्या जागेवरून हलू शकत नाही. मग आपण स्वतःला ही आठवण करून द्यायला हवी की अल्लाह पालनकर्ता, स्वामी आहे. त्याच्या कृपा पावसाच्या जोरदार बरसणाऱ्या सरीप्रमाणे असतात, तसेच अखंड, निरंतर वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी असतात. आपले चांगले-वाईट हे आपल्यापेक्षा आपल्यावर उपकार करणारा अधिक जाणतो. तो सर्वज्ञानी आपल्यापेक्षा जास्त आपला हितचिंतक आहे. तो सर्वसमर्थ आहे. प्रत्येक भलाई त्याच्याच हातात आहे आणि तो दिवसाला रात्रीत बदलण्यास व रात्रीतून दिवस काढण्यास सक्षम आहे. 

आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट हे आपल्याला वेळेवर समजत नाही, परंतु पुढे कधीतरी त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळतात. ही विचार करण्याची पद्धत अशा तथ्यांवर आधारित आहे जी कदाचित एखाद्याला पूर्णपणे समजणार नाही, परंतु जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या विश्वासाने या विचारसरणीचा अवलंब केला तर ते त्याच्या मानसिक आरोग्यासाठी अल्लाहने दिलेले एक शक्तिवर्धक टॉनिक आहे. जे त्याचे अनेक मानसिक रोगांपासून रक्षण करते आणि हा त्याचा नगद फायदा आहे. याशिवाय वाईटात दडलेली भलाई योग्य वेळी दिसून येते, भलेही ती माणसाला ओळखता येवो अथवा न येवो.

- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget