प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की तीन प्रकारचे लोक स्वर्गात जाणार नाहीत, नेहमी दारुचे सेवन करणारा, नातेसंबंध तोडणारा आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवणारा! (ह. अबु मूसा अशअरी (र.), अहमद)
हजरत अब्दुल्लाह बिन उबै म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले आहे की अशा जनसमूहावर अल्लाहची कृपा होत नसते ज्यात नातेसंबंध तोडणारे लोक असतात. (बैहकी)
ह. अबु हुरैरा म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा अशी व्यक्ती मातीत मिळावी, अशी व्यक्ती मातीत मिळावी, अशी व्यक्ती मातीत मिळावी असे म्हटले.
लोकांनी विचारले की कोण ती व्यक्ती?
प्रेषितांनी उत्तर दिले की अशी व्यक्ती ज्याचे माता-पिता वृद्धापकाळात पोहोचले असतील (आणि तो त्यांची सेवा करत नसेल तर) अशी व्यक्ती स्वर्गात जाणार नाही. (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की आपल्या माता-पित्यांना शिवीगाळ करणे हा एक भयंकर गुन्हा आहे.
त्यांच्या सोबत्यांनी प्रेषितांना विचारले की कुणी आपल्या माता-पित्यांना शिवीगाळ करील?
प्रेषित म्हणाले की हां, जर कुणी दुसळ्याच्या बापाला शिव्या देत असेल, जर दुसऱ्याच्या आईला शिव्या देत असेल आणि ज्याच्या बापाला वा आईला शिव्या दिल्या गेल्या त्या माणसाने याच्या उत्तरादाखल त्या व्यक्तीच्या आईवडिलांना शिव्या दिल्या तर ह्या शिव्या त्याने आपल्या आई-वडिलांना दिल्यासारखे आहे. (बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की ज्याच्याकडे त्याची मुलगी असेल आणि तो त्या मुलीला जिवंत जमिनीत पुरत नसेल आणि तिच्याशी गैरवर्तन आणि तिची अवहेलना करत नसेल तर अल्लाह अशा व्यक्तीला स्वर्गात दाखल करील. (ह. इब्ने अब्बास)
(जेव्हा सभ्यता विकसित झाली नव्हती त्या वेळी लोक आपल्या मुलींना जमिनीत पुरत असत. सध्या सभ्यता आणि तंत्र-शस्त्रक्रियेचा विकास झाला आहे. त्याद्वारे लोक मुलीची भ्रूणहत्या करतात. मानसिकता तीच, पद्धत वेगळी!)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणाला आपल्या मुलींच्या कारणाने वेगवेगळ्या यातना आणि परीक्षेत टालके जात असेल तरीदेखील अशी व्यक्ती आपल्या मुलींशी सद्वर्तन करते, त्यांचे पालनपोषण करते तर अशा व्यक्तीला नरकात टाकले जाणार नाही. (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणी आपल्या दोन मुलींचे तरुण वयापर्यंत संगोपन करील तर कयामतच्या दिवशी मी आणि ती व्यक्ती (आपल्या हाताच्या दोन बोटांना जुळवून ते म्हणाले) एकमेकांबरोबर स्वर्गात जाऊ. (मुस्लिम, ह. अनस बिन मालिक)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment