प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "तुम्ही लोक दुसऱ्या लोकांचे अनुनय आणि पालन करू नका. म्हणजे असा विचार करु नका की जर इतरांनी आमच्याशी चांगला व्यवहार केला तर आण्हीही त्यांच्याशी तसाच व्यवहार करू आणि जर कुणी आमच्यावर अन्याय, अत्याचार केले तर आम्हीदेखील त्यांच्यावर अत्याचार करू. असे करू नका. इतरांनी जर तुमच्याशी चांगला व्यवहार न करता तुमच्यावर अत्याचार जरी केले तरी तुम्ही त्यांच्याशी चांगल्या रीतीनेच वागा. आणि जर तुमच्याशी कुणी वाईट वागले असेल तर तुम्ही त्यांच्यावर अतिरेक करू नका." (ह. हुजैफा (र.), तिर्मिजी, तरगीब व तरहीब)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शिकवण दिली की, "जर एकादा माणूस पहिल्यापासून कुठं बसलेला असेल तर त्याला उठवून तुम्ही त्या जागेवर बसू नका. एकाध्या मजलिसमध्ये बसणाऱ्यांनी नंतर येणाऱ्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करावी."
(ह. अब्दुल्लाह बिन उमर, मसुनद अहमद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की "जर तुम्ही तीन माणसं एकत्र बसलेले असाल तर एका माणसाला बगळून दोन माणसांनी आपसात गुपचूपपणे बोलू नये."
ही हदीस ऐकल्यावर अबु सालेह नामक एका व्यक्तीने अब्दुल्लाह बिन उमर यांना विचरालं की जर चार माणसे एकत्र बसलेले असतील तर त्यातील दोन माणसांनी आपसात बोलावे की नाही? अब्दुल्लाह इब्ने उमर (र.) यांनी उत्तर दिले की अशा स्थितीत काही हरकत नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "ज्या व्यक्तीमध्ये तीन गोष्टी असतील अशा व्यक्तींना अल्लाह न्यायनिवाड्याच्या दिवशी आपली सुरक्षा प्रदानकरील. आणि त्यास स्वर्गात दाखल करील.
(१) दुर्बलांशी मायाळूपणाने वागणे, (२) आपल्या मातापित्यांशी स्नेह आणि आपुलकीचा व्यवहार करणे आणि (३) गुलामांशी आणि सेवकांशी चांगला व्यवहार करणे.
त्याचबरोबर तीन गोष्टी अशा आहेत ज्यावर आचरण करण्याने अल्लाह आपल्या सान्निध्यात जागा देईल.
कडाक्याची थंडी असताना गार पाण्याने वुजू करणे, अंधार पडलेला असताना मस्जिदीला जाणे आणि भुकेल्या माणसांना जेवण देणे."
(ह. जाबिर (र.), तरगीब व तरहीब)
ह. मआजबिन जबल (र.) यांनी सांगितले की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दहा गोष्टींची शिकवण दिली.
१) अल्लाहबरोबर कुणास भागीदार करू नका. यासाठी तुमची हत्या जरी केली जाणार असली तरी.
२) आपल्या मातापित्यांची अवज्ञा करू नका, जरी त्यांनी तुम्हास पत्नी सोडण्याचे आदेश दिले तरी.
३) अनिवार्य नमाज सोडू नका. जो असे करील अल्लाह त्याची सुरक्षा काढून घेईल.
४) मद्यपान करू नका. सर्व कुकृत्यांची जननी दारु आहे.
५) अल्लाहची अवज्ञा करू नका, तसे केल्यास अल्लाहला राग येतो.
६) तुमच्या सैन्यातील सगळे सैनिक मारले गेले असले तरी शत्रुहा पाठ दाखवू नका.
७) जर कुठे महामारी पसरली असेल तर तेथून पळ काढू नका.
८) आपल्या ऐपतीनुसार घरच्यांना खाण्यापिण्याची सोय करा.
९) आपल्या घरच्यांचे प्रशिक्षण करा.
१०) अल्लाहचे अधिकार अदा करण्यासाठी आपल्या घरच्यांना भीती दाखवत जा.
(तरगीब व तरहीब, संदर्भ- तिबरानी)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment