प्रत्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की निर्णय घेणे फार अवघड जाते. दोन पर्याय समोर असतात आणि त्यांच्या विविध पैलूंवर विचारचक्र सुरू होते. चांगले-वाईट, भले-बुरे परिणाम दिसू लागतात. जीवनात टप्प्या टप्प्यावर आणि अगदी विद्यार्थी दशेपासूनच निर्णय घ्यावे लागतात. आर्ट्स की सायन्स? या कॉलेजात शिकायचं की त्या? पुढे, नोकरी की व्यापार? व्यवसायात भागीदार म्हणून हा बरा की तो? मग पुढे, लग्नासाठी हे स्थळ योग्य की ते? भाड्याने राहायचं की स्वतःचं घर घ्यायचं? जागा घेऊन घर बांधणे परवडेल की फ्लॅट? आहे त्या व्यवसायाची दगदग सहन होत नाही पण हे सोडून दिल्यास दुसरे काही करणे उचित ठरेल का? प्रत्येक पर्यायाचे काही फायदे-तोटे असतात आणि निर्णय तर घ्यावेच लागतात. पाऊल तर उचलावेच लागते पण पुढे काय होईल हे सांगताही येत नाही. काय करावे आणि काय करू नये आणि भले कशात आहे हे शोधताना माणूस एका संघर्षातून जात असतो. ही अवस्था मनासाठी वेदनादायी ठरू शकते. जोपर्यंत माणसाच्या दोन विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये संघर्ष सुरू असतो तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो, पण हा काळ वेदनादायक असूनही व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतो. तरीही हा संघर्ष शांत करण्यासाठी किंवा समाप्त करण्यासाठी मनात एक विचार स्थापित होऊन दुसरा विचार दूर होणे गरजेचे असते. परिणामांच्या अज्ञानामुळे माणूस चिंताग्रस्त असतो. भीती व शंकांनी वेढलेला असतो. द्विधा मनस्थितीत असतो. त्यातून योग्य निर्णय घेण्यासाठी आदरणीय पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी एक महत्त्वपूर्ण दुआ शिकवली आहे. ज्याला ’दुआ-ए-इस्तिखारह’ म्हणतात. ही प्रार्थना केल्याने अस्थिर मन नियंत्रित होते. शंका विश्वासात बदलते आणि बेचैनी दूर होऊन योग्य निर्णय घेणे सोपे जाते.
इस्तिखारह हा शब्द ’खैर’ या शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ दैनंदिन कामात कल्याण व सुखसमृद्धीची मागणी आहे. ही मार्गदर्शनासाठी एक याचना आहे. जेव्हा मानसिक गोंधळ निर्माण होतो, एखादे काम असे करावे? की तसे करावे? हे करणे चांगले ठरेल? की ते? अशी द्विधा मनस्थिती होते, तेव्हा पाच वेळेच्या अनिवार्य नमाजाव्यतिरिक्त दोन रक’अत नफील नमाज पढल्यानंतर ही दुआ करावी,
अल्लाहुम्-म इन्नी अस्तखीरु-क बिइल्मि-क वअस्तक्दिरु-क बिकुद्-रति-क व अस्-अलु-क मिन फज्लिकल्-अजीम, फइन्न-क तक्दिरु वला अक्दिरु, वतअ्-लमु वला अअ्-लमु, वअन्-त अल्लामुल्-गुयूबि, अल्लाहुम्-म इन् कुन्-त त-अ्लमु अन्-न हाजल्-अम्-र खैरुल्-ली फी दीनी व-मआशी वआकिबति अम्रि, फक्दुर्-हु ली वयस्सिर्-हु ली सुम्-म बारिक् ली फीहि, वइन् कुन्-त त-अ्लमु अन्-न हाजल्-अम्र शर्रुल्-ली फी दीनी व-मआशी वआकिबति अम्रि, फस्-रिफ्हु अन्नी वस्-रिफ्नी अन्हु, वक्दुर लियल-खय्-र हय्-सु का-न सुम्-म अर्-जिनी.(संदर्भासाठी पुर्ण हदीस पाहा,हदीस संग्रह बुखारी-1162 )
अनुवाद :-
हे अल्लाह! मी तुझ्या ज्ञानाद्वारे कल्याणाची मागणी करतो व तुझ्या सामर्थ्याने सक्षमता मागतो आणि तुझ्याकडे महान कृपेची मागणी करतो, कारण तूच सामर्थ्य ठेवतो आणि मी असमर्थ आहे, तुच जाणता आहे आणि मी अजाण आहे आणि तूच प्रत्येक अदृश्य गोष्टींचा जाणकार आहे. हे अल्लाह! जर तुझ्या ज्ञानानूसार माझे हे काम माझ्या धार्मिक व आर्थिक दृष्टीने आणि माझ्या सांसारिक व मृत्यू पश्चात जीवनातील परिणामाच्या दृष्टीने भले असेल, तर हे काम माझ्या नशिबी कर, त्याला सोपे कर, मग त्यामध्ये समृध्दी दे, आणि जर तुझ्या -(उर्वरित आतील पान 2 वर)
ज्ञानानूसार हे काम माझ्या धार्मिक, आर्थिक आणि दोन्हीही जीवनातील परिणामाच्या दृष्टीने वाईट असेल, तर हे प्रकरण माझ्यापासून दूर कर, मला त्यापासून वळव आणि माझ्यासाठी जिथे कुठे भलाई, कल्याण असेल, ते माझ्या नशिबी कर आणि त्याद्वारे मला प्रसन्नचित्त कर. अल्लाहचे पैगंबर (स.) हे आपल्या सहाबियांना (र.) सर्व कामांसाठी इस्तिखारह करण्यास खूप प्रवृत्त करायचे. जसे ते कुरआनचा एक एक अध्याय शिकवायचे तसेच इस्तिखारह करण्यासही शिकवायचे.
या प्रार्थनेच्या बाबतीत एक गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे की जी कामे शरिअतने अनिवार्य केलेली आहेत ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तसेच ज्या कामांना शरिअतने हराम घोषित केले आहे ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजेत. इतर वैध कामांसाठी इस्तिखारह करण्याची अनुमती आहे. उदा. एखाद्यावर हजला जाणे अनिवार्य झाल्यास, जाऊ कि नको? अशी दुआ करता येत नाही, पण सरकारी हज कमिटीने की खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवास करावा? यासाठी प्रार्थना करणे ऐच्छिक आहे. तसेच रोजीरोटीसाठी काम करणे हे प्रत्येकावर अनिवार्य आहे आणि हलाल मार्गाने रोजगार प्राप्त करणे हेही अनिवार्य आहे. अवैध मार्ग धरण्यासाठी किंवा त्यात यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करणे हे लांच्छनास्पद व हास्यास्पद आहे. नोकरीसाठी कुठे अर्ज द्यावा किंवा कोणता व्यवसाय सुरू करावा? तसेच एक व्यवसाय सोडून दुसरा सुरू करण्याचा विचार असेल तर त्यापुर्वीही ही प्रार्थना जरूर करावी. कोणत्याही महत्त्वाच्या कामापुर्वी सज्जन, अनुभवी, वडिलधाऱ्या माणसांकडून सल्ला जरूर घ्यावा, मग प्रार्थना करावी. ज्याने इस्तिखारह केला तो असफल ठरू शकत नाही, सल्ला घेणाऱ्याला पश्चात्ताप होऊ शकत नाही आणि जो संतुलित जीवनशैलीत जगतो, तो गरजू असू शकत नाही.
इस्लामिक विद्वानांनी लिहिले आहे की, इस्तिखारहच्या प्रार्थनेनंतर स्वाभाविकपणे मनाचा कल ज्या गोष्टीकडे असेल त्यानुसार आचरण करावे. गरज पडल्यास दोन तीन वेळा ही प्रार्थना करावी पण निश्चिंत होण्यासाठी एवढेच पुरेसे असते की आपण आपला विनंती अर्ज त्या एकमेव ईश्वरासमोर ठेवला आहे, जो सर्वज्ञानी आहे. खरे पाहता या प्रार्थनेचा उद्देश फक्त भलाई व कल्याणाची मागणी आहे. आपल्याला जे काम करायचे असते किंवा ज्याविषयी मनाचा गुंता वाढलेला असतो ते काम आपण प्रार्थनेच्या माध्यमातून अल्लाहकडे सोपवतो. त्याचे ज्ञान आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास असल्याची ग्वाही देतो. तसेच या ग्वाहीवर पुढेही ठाम राहण्याचे वचन देतो. दुसरे हे की भविष्यात अल्लाह जो काही निर्णय घेईल, मग तो आपल्या मनाविरुद्ध का असेना, त्यावर समाधान मानून जगावे. या दोन गोष्टींमुळे जीवनात खूप सुखसमृद्धी येते. ..... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment