Halloween Costume ideas 2015

मातेचे दूध बाळासाठी संजीवनी


दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत रजाअत (स्तनपान) सप्ताह जगभरात साजरा केला जातो. 1989 साली जेव्हा युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ दोघांनीही जगभरातील मातांना आवाहन केले होते की, मातांमध्ये स्तनपानासाठी जागृती निर्माण करा, त्यांना सहकार्य करा आणि  त्यांना प्रोत्साहन द्या. जगात सर्वप्रथम स्तनपाला उत्तेजन देण्याचे कार्य ’वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन’द्वारे सुरू केले गेले. आज या स्तनपान आंदोलनामध्ये 17 देशांचा समावेश आहे. तसेच हा दिवस 170 देशांमध्ये साजरा केला जातो. महिलांमध्ये स्तनपानाबाबत जागरुकता निर्माण करणे हा या आंदोलनाचा उद्देश आहे. यावर्षी या आंदोलनाची मध्यवर्ती कल्पना ’स्तनपानासाठी स्टेप अप: आईला शिक्षित करा आणि त्यांना पाठिंबा द्या’ अशी आहे.

अल्हम्दुलिल्लाह, सर्वशक्तिमान अल्लाहने मनुष्याला निर्माण केल्यानंतर तसेच सोडले नाही, तर त्याला मार्ग दाखवला, त्याला मार्गदर्शन केले आणि आईच्या पोटात आणि बाहेर पडल्यानंतरही त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या उदरनिर्वाहाचा हा नाजूक आणि सुंदर प्रवास गर्भधारणेदरम्यान प्रसूतीपूर्वीच सुरू होतो, जेव्हा स्त्रीच्या स्तनांमध्ये लक्षणीय बदल होतात. उदाहरणार्थ, निप्पलमध्ये एक काळा किंवा गुलाबी प्रभामंडल तयार होतो ज्याला एरोला म्हणतात. शिवाय स्तनांमध्ये जडपणा येतो. प्रसूतीनंतर आश्चर्यजनक पद्धतीने हे जड पडलेले स्तन ताबडतोब दूध तयार करू लागतात, जेव्हा बाळ दूध पिऊ लागते. काही स्त्रियांना प्रसूतीपूर्वी त्यांच्या स्तनातून जाड, चिकट स्त्राव सुद्धा होऊ शकतो.

संमतीची कृती

सामान्य प्रसूतीमध्ये बाळाच्या जन्मानंतर एक तासाने स्तनपानास सुरुवात करावी, तर सिझरिंगद्वारे प्रसूती झाल्यास, बाळाला दुधासाठी तीन दिवस वाट पहावी लागते आणि तोपर्यंत वरचे दूध दिले जाते.

स्तनदामातांनी याकडे लक्ष द्यावे

(1) बाळाला दूध पाजण्यासाठी चांगली, स्वच्छ, निवांत, जास्त त्रास न होणारी एकांत जागा योग्य असते. हे लक्षात ठेवा.

(2) स्तनपान करतांना बाळासाठी योग्य स्थिती असणे खूप महत्वाचे आहे.

(3) प्रभावी आणि यशस्वी आहार देण्यात बाळाच्या तोंडाची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते. बाळाच्या तोंडात फक्त स्तनाग्र टाकू नका, तर वर नमूद केलेल्या एरोलाच्या सभोवतालचे क्षेत्र देखील ठेवा. अन्यथा, स्तनाग्रावर फोड येणे, निप्पल क्रॅक होणे इत्यादी वेदना होऊ शकतात. स्तनपान झाल्यानंतर ती जागा चांगली स्वच्छ करावी. तसेच क्रीम लावावे. 

(4) स्लॉचिंग (झुकून दूध पाजणे) ही चुकीची स्थिती आहे, जी नवीन माता अज्ञानामुळे स्वीकारतात, ज्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास होतो. बाळाला मांडीवर उशी घेऊन पाजणे चांगले. 

(5) झोपून स्तनपान केल्याने बाळाच्या नाकात दूध जाण्याचा धोका वाढतो आणि स्तनाग्रांचा भारही बाळावर पडू शकतो. तुमच्यासाठी आणि बाळासाठी कोणती स्थिती योग्य आणि आरामदायक आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयोग करू शकता.

(6) स्तनपानाची दिनचर्या बनवता येते. दिवसा प्रत्येक दोन ते तीन तासांनी आणि रात्री दर 3 ते 4 तासांनी दूध पाजणे चांगले असते. जर बाळ दिवसा जास्त झोपत असेल तर त्याला उठवा आणि त्याला पाजवा. दीर्घकाळ स्तनपान न केल्याने स्तनांमध्ये जडपणा, वेदना, गुठळ्या, ताप इ. ब्रेस्ट ऍबसेस देखील होऊ शकतो, याचा अर्थ स्तन सुजतात आणि त्यात पू जमा होतो. जे शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतात, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.

(7) स्तनपान करताना जास्त पाणी प्या, कारण दूध बनवण्यासाठीही पाण्याची गरज असते, त्यामुळे कोमट पाणीही वापरता येते.

(8) दूध आणि फळांचा रसही घेता येतो.

(9) स्तनपान करताना आईने मनःशांती राखली पाहिजे, कारण ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आई फक्त बाळालाच दूध पाजत नाही, तर नकळत तिच्या भावना, संवेदना, भीती, राग, सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांनाही पाजत असते. आईने तिच्या शारीरिक आरोग्याबरोबरच तिच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.नेहमी सतर्क रहा, सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार आणि भावना टाळा, जेणेकरून तुमचे मूल एक सकारात्मक व्यक्ती बनून मोठे होईल. साहबिया आणि चांगल्या स्त्रियांची उदाहरणे आपल्यासाठी लागू आहेत की त्या ज्या पद्धतीने स्तनपान करत असत आणि त्याच वेळेस कुराणाच्या श्लोकांचे पठण करत असत.

(10) काही मुले आईशी खूप जोडलेली असतात, आईला सोडू इच्छित नाहीत आणि आईला कंटाळा येतो, कारण ते दूध पिण्यात बराच वेळ घालवतात. तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे धीर धरा. आईच्या पायाखाली असाच स्वर्ग ठेवलेला नाही. बाळाचे पोट पूर्ण भरल्यावर ते स्वतःहून दूध पिणे बंद करेल. तेव्हा पाजविण्याची सक्ती करू नये. काही बाळांना दिवसापेक्षा रात्री जास्त आहार घेेण्याची सवय असते आणि त्यांना वारंवार दूध द्यावे लागते. याला क्लस्टर फीडिंग म्हणतात. यामध्ये बाळ रात्री जेवढे दूध पिते दिवसभर तेवढे पीत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी संध्याकाळी किंवा घरात इतर माणसे असतील तर आईला सर्व काम सांभाळून मदत करता येते.

दुधाच्या कमतरतेची कारणे

आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा तिच्या दुधावर मोठा परिणाम होत असतो. उदा. (1) जास्त राग (2) जास्त ताण, 3) दूध कमी झाल्याची शंका इत्यादीमुळे आईचे दूध कमी होऊ शकते. जर बाळ नीट झोपत असेल, वजन वाढत असेल आणि दिवसातून 3 ते 5 वेळा लघवी करत असेल तर त्याला पुरेसे दूध मिळत आहे, असे समजावे. बाळाला सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे, बाकी कशाचीही गरज नाही आणि याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग असे म्हणतात. सहा महिन्यानंतर दोन वर्षांपर्यंत बाळाला दूध आवडते. तथापि, दुधाबरोबर खालील पदार्थही दिले जाऊ शकतात. दलिया, रवा, शीरा, फळे इ.

स्तनपान करताना सावधगिरी बाळगा

बाळाला बाटलीने दूध पाजू नका. गाईचे दूध चमच्याने पिण्याची सवय लावा. म्हशीच्या दुधात पाणी मिसळा, अन्यथा जुलाब होऊ शकतात. स्तनपान करताना कॉफी, चहा टाळा. त्यामुळे लोह कमी होते. शेंगदाण्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. आंबट फळांपासून सावध रहा. जसे संत्री, द्राक्षे, अननस इ. तूर डाळ, मांस आणि अंडी यांसारख्या वायूचा धोका असलेले पदार्थ टाळावेत. मसालेदार पदार्थ आणि जंक फूड टाळणेही महत्त्वाचे आहे. लोणचे, तिखट इत्यादी खाण्यात काळजी घ्या.

दूध वाढवण्यासाठी 

(1) बडीशेपचा उपयोग करावा. 

(2) दूध वाढवण्यासाठी मेथीचे दाणेही महत्त्वाचे आहेत. रात्री भिजवून सकाळी घ्या. 

(3) पपई, गाजर घ्या. 

(4) रात्री स्तनपान केल्याने अधिक प्रोलॅक्टिन तयार होते. त्यामुळे स्तनपान करण्याची सवय लावा. 

(5) शतावरीचे सेवन दूध वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.

(6) खाण्यापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी घ्या. 

(7) मुलाला अधिक आपुलकी द्या.

(8) नकारात्मक विचार शक्यतो टाळा.

(9) दररोज कोमट पाण्याने स्नान करावे.


काही गैरसमज

(1) आईला सर्दी व ताप असल्यास बाळाला स्तनपान करू नये. ही पूर्णपणे निराधार गोष्ट आहे, पण ताप आल्याने आईच्या रक्तात अँटीबॉडीज तयार होतात जे बाळाला मिळतात आणि बाळाला इतका ताप येत नाही. ताप दुधाने येत नाही तर आईने बाळाचे चुंबन घेतल्याने, शिंकताना आणि खोकताना तोंड रुमालाने न झाकल्याने येते.

(2) स्तनपानामुळे महिलांच्या स्तनांमध्ये ढिलेपणा येतो, हे किती खरे आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

(3) स्तनपान करताना तुम्ही मेकअप, जड रसायने असलेली क्रीम्स लावू शकता, असे अजिबात नाही. सौंदर्यप्रसाधनांमधील रसायने तुमच्या बाळालाही हानी पोहोचवू शकतात. स्तनपान करताना औषधे घेता येतील का? होय, परंतु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.


स्तनपानानंतर दूध सोडण्याचा टप्पा येतो : WHO आणि IHO (भारतीय आरोग्य संघटना) च्या मते, मुलाला दोन वर्षांनी दूध सोडले पाहिजे. अलहम्दुलिल्लाह कुराणमध्ये सुद्धा 1458 वर्षांपूर्वी सांगितले आहे. दोन वर्षाच्या आत लहान मुलांनी स्वतःहून दूध सोडल्यास त्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून दूध अचानक सोडू नये. तर ते हळूहळू सोडेल याकडे लक्ष द्यावे.

अलहम्दुलिल्लाह आईचे दूध हे अल्लाहचे अनमोल वरदान आहे. त्यावर बालकाचा हक्क आहे. आज आधुनिकतेच्या चक्रात माता याला दोष मानत आहेत, हा विचार पूर्णतः चुकीचा असून तो दुरुस्त करता येतो. आईच्या दुधात सुरुवातीला कोलोस्ट्रम असते, जे रोगांशी लढण्यास मदत करते आणि बाळाची प्रतिकारशक्ती वाढवते आणि आईला स्तनपानाचा फायदा देखील होतो कारण ती स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगापासून आणि प्रसूतीनंतर सुरक्षित राहते. 

सर्वशक्तिमान अल्लाहला प्रार्थना करते की, अल्लाह त्या सर्व बहिणींवर कृपा करून ज्या आनंदाने बालसंगोपनासाठी स्तनपानाचे कर्तव्य आनंदाने पार पाडत आहेत. आणि त्या बहिणी ज्या हे कार्य पार पाडत नाहीत त्यांना अल्लाहने सद्बुद्धी द्यावी. 


- डॉ. सिमीन शहापुरे

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget