Halloween Costume ideas 2015

कुरआनच्या भारतीय भाषांतील अनुवादाचा इतिहास

फारसी भाषेतली भाषांतर


भारतामध्ये फारसीत कुरआनचे भाषांतर होण्याआधी इराण आणि अन्य देशात कुरआनचे फारसी भाषांतर झाले असण्याची शक्यता आहे. पण आपण भारतात झालेल्या अनुवादांचा इतिहास पाहत असल्याने फारसीच्या भारतातील अनुवादाचीच आपण दखल घेणार आहोत. फारसीत कुरआनचे भारतामध्ये पहिले भाषांतर कधी झाले याविषयी अनेक प्रवाद आहेत. हजरत बंदानवाज यांनी कुरआनचे विश्लेषण अनेक खंडामध्ये फारसी भाषेत लिहीले होते. बंदानवाज ज्यावेळी दिल्ली येथे वास्तव्यास होते त्याकाळी त्यांनी हे विश्लेषण लिहले असल्याचे म्हटले जाते. ‘तफसीर ए कुरआन दर कालीब ए सुलुक’ या नावाने हे विश्लेषण ओळखले जाते. कुरआनच्या कोणत्याही विश्लेषणात मुळ कुरआनच्या आयतींचे पुर्ण अनुवाद केले जाते. त्यामुळे कुरआनचे हे फारसीतील भारतात झालेले सुरुवातीचे भाषांतर मानता येईल. पण हेच अनुवाद पहिले असल्याचे खात्रीलायकरित्या सांगता येत नाही.

बंदानवाज यांच्यानंतर अकबरच्या काळात अनेक विश्लेषण लिहीले गेले आहेत. त्याकाळात फतेहउल्लाह शिराजी यांनी कुरआनचे ‘मिनहाजुस्सादीकीन’ या नावाने विश्लेषण केले होते. ते शिया पंथीय असल्याने हे विश्लेषण शिया धारणांवर आधारीत असल्याचे म्हटले जाते. शिराजी यांच्यानंतर अबुल फजल यांचे बंधू शेख फैजी यांनी कुरआनचे विश्लेषण केले. जे मध्ययुगीन इतिहासामध्ये अतिशय महत्वाचे मानले जाते. अबुल फजल आणि फैजी हे अकबरच्या सहिष्णू व प्रागतिक धोरणांचे पुरस्कर्ते म्हणून मध्ययुगीन इतिहासात ओळखले जातात.  अकबरच्या सत्तारोहणाच्या ३९ व्या वर्षी फैजी ने हे विश्लेषण केले. ‘सवातीउल इलहाम’ या नावाने फैजीने फारसी भाषेत हे विश्लेषण प्रकाशित केले. हे ७५ भागांमध्ये विभागलेले होते. सुरुवातीपासून अखेरपर्यंत कोणत्याही अक्षरावर अक्षर निदर्शक चिन्हांचा समावेश नव्हता. याचे काही भाग प्रकाशित करण्यासाठी फैजी इराकला पाठवले होते. फैजीने कालांतराने काही दुरुस्त्याही या विश्लेषणात केल्या होत्या. अनेक विद्वानांनी फैजीच्या विश्लेषणाची समिक्षाही केली. उदा. शेख याकूब कश्मीरी यांनी अरबी भाषेत समिक्षा लिहीली. त्याच्या विश्लेषणातील काही भाग उदाहरणादाखल येथे पाहता येईल.६ 

‘अल्लाहुम्मा महरुल हुदा ला तिरा अस्कलाम’

मूळ फारसी पाठात कोणत्याही विरामचिन्हाचा अथवा अक्षर निदर्शक चिन्हांचा वापर केलेला नाही. या व्यतिरिक्त फैजीच्या पुर्वी शेर शाह सुरीच्या गुरु मलिकुल उलमा शहाबुद्दीन बीन शम्सुद्दीन यांनी देखील फारसीमध्ये कुरआनचे विश्लेषण केले होते. या विश्लेषणात भाषांतराचा देखील समावेश होता. त्यांनी हे विश्लेषण जोनपुर सुलतानांच्या काळात लिहीले होते.७ याशिवाय मख्दुम नवां हलाई यांनीही कुरआनचे विश्लेषण याच काळात केले असल्याचे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे.

१८ व्या शतकात मुगल सत्तेला उतरती कळा लागली. त्या काळात मुस्लिम समाजासमोर नवराजकीय चिंतन मांडण्यासाठी शाह वलीउल्लाह यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी कुरआनच्या माध्यमातून राजकीय नवचेतना जागवण्याचा प्रयत्न केला. शाह वलीउल्लाह यांनी संपूर्ण कुरआनचे विश्लेषण केले. शाह वलीउल्लाह यांच्यापुर्वी फारसी भाषेत जे विश्लेषण झाले होते. ते एक तर संक्षिप्त होते अथवा अपूर्ण होते. पण शाह वलीउल्लाह यांनी कुरआनचे संपूर्ण विश्लेषण केले. शाह वलीउल्लाह यांच्यापुर्वी भाषांतराला मुस्लिम समाजातूनच मोठा विरोध व्हायचा. समाजात कुरआनच्या भाषांतराच्या माध्यमातून पाखंड जन्मास येईल असा आरोप केला जायचा. पण शाह वलीउल्लाह यांचे प्रस्थ मोठे होते. त्यांच्यासमोर या छछोर टिकाकारांचा निभाव लागला नाही. आणि भारतीय मुस्लिम समाजाला कुरआनच्या अनुवादाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळाली.८ भारतात फारसी भाषेत झालेले हे काही महत्वाचे अनुवाद आहेत. त्याशिवाय गुलबर्ग्याच्या दर्गाहमध्ये एक कलमी प्रत जुन्या ग्रंथालयात उपलब्ध आहे.   

ज्या पध्दतीने अरबी भाषेतून कुरआन भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आले, त्याचपध्दतीने भारतीय विद्वानांनी अरबीतही कुरआनचे विश्लेषण केले. सल्तनतकाळात दौलताबाद येथे मौलाना निजामुद्दीन हसन बिन मोहम्मद बिन हुसैन दौलताबादी हे सुफी विद्वान वास्तव्यास होते. ते निजाम उरुज म्हणून देखील ओळखले जातात. त्यांनी अरबी भाषेत ‘गरायबुल कुरआन वर गायबुल फुरकान’ या नावाने विश्लेषण केले होते.९ त्यांच्यानंतर मुंबई येथील प्रसिध्द सुफी मख्दुम माहिम यांनी अरबी भाषेत विश्लेषण केले होते. ‘तफ्सरीतुल रहमान’ या नावाने हे विश्लेषण प्रकाशित करण्यात आले होते. तरी ‘‘तफ्सीर ए माहिमी’’ या नावाने हे विश्लेषण ओळखले जाते. हे विश्लेषण इजिप्त येथे छापून प्रकाशित करण्यात आले होते.१० 

तेलुगु भाषांतर

फारसी आणि दखनी नंतर प्रादेशिक भाषांमध्ये कुरआनचे भाषांतर करण्याचा इतिहास आपण समजून घेणार आहोत. दखनेत मुस्लिम राजवटींच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशात कानडी आणि तेलुगू या दोन भाषा प्रामुख्याने बोलल्या जात होत्या. त्यापैकी तेलुगू भाषा ही बहामनी मुळे मुस्लिम राजवटीच्या काहीशी लवकर संपर्कात आली. त्यामुळेच तेलुगू भाषेत मुस्लिम साहित्यीकांचा इतिहास हा १७ व्या शतकापासून आढळतो. असे असले तरी कुरआनचे भाषांतर मात्र तेलुगू भाषेत २० व्या शतकात्या सुरुवातीला झाले आहे. खिलपुरी नारायणराव यांनी १९३० साली पुर्ण केले. हे भाषांतर कशापध्दतीने पुर्ण केले याविषयी खिलपुरी नारायणराव लिहीतात, ‘मी अरबी भाषेत तज्ज्ञ असणाऱ्या दोन मौलवींना नियुक्त केले. ते अरबी कुरआन समोर ठेवायचे आणि मी कुरआनचे इंग्रजी भाषांतराची मदत घ्यायचो. तेलुगूमध्ये अनुवाद करण्याआधी या दोन्ही मौलवींना मी विचारुन घ्यायचो. माझे प्रयत्न असायचे की, मुळ अरबी मथळेच अनुवादीत व्हावेत. जेणेकरुन भाषांतर सहजबोध भाषेत होईल. अनुवाद केल्यानंतर मी या दोन्ही मौलवींना ते वाचून दाखवत असे. आणि जेथे जेथे त्यांना गरज वाटे तेथे ते दुरुस्त्या सुचवित असत. अशापध्दतीने आंध्रच्या जनतेला तेलुगू भाषेत कुरआनचे अनुवाद उपलब्ध करुन देउ शकलो.’’११ 

खिलपुरी नारायणराव यांच्या अनुवादात अनेक चुका असल्याचे कुरआनच्या काही तज्ज्ञांचे म्हणणे होते. त्यामुळे मोहम्मद कासीम खान यांनी नव्याने कुरआनचे तेलुगू अनुवाद केले. त्यांच्यानंतर मौलाना अब्दुल गफूर कर्नुली यांनीही दोन खंडात भाषांतर केले. हे भाषांतर थेट अरबी भाषेतून करण्यात आला होता.

(लेखक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत. फारसी, उर्दू भाषेचे आणि मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

संदर्भ-

६) मुल्ला अ.क़ादर  बदायुनी, मुंतखबुत्तवारीख, खंड-२, पृष्ठ क्र.३३६-३३७

७) गुलाम याह्या अंजुम, कुरआन करीमके हिंदुस्तानी तराजीम व तफासीर का इजमाली जायजा, पृष्ठ क्र. १५९

८) मोहम्मद सालीम कासमी आणि इतर, जायजा तराजीमे कुरआनी, पृष्ठ क्र. ९९

९) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र.१६५

१०) अब्दुल रहमान परवाज इस्लाही, मख्दुम माहिमी हयात,आसार व अफकार, पृष्ठ क़्र.१५४

११) डॉ. मोहम्मद हमीदुल्लाह, कुरआन मजीद के तराजीम, जुनुबी हिंद की जुबानों में, पृष्ठ क्र. १२८

(भाग २, क्रमशः)


- सय्यद शाह वाएज


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget