Halloween Costume ideas 2015

मणिपूर, नूह अन् ट्रेनमधील हत्या: हे बदलण्यासाठी सामंजस्याची गरज


देशाच्या विविध भागात भयंकर हिंसाचार होत आहे. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. यामध्ये सुमारे 160 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे एक लाख बेघर झाले आहेत. मृतांमध्ये कुकी लोकांची संख्या अधिक आहे आणि विस्थापितांमध्ये कुकी, नागा आणि झो लोकांची संख्या आहे. हे तिन्ही आदिवासी समुदाय आहेत ज्यांची बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन आहे. शिवाय, मणिपूरमधील तीन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण देशाची मान शर्मेने खाली झुकली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचे वांशिक-धार्मिक चरित्र सर्वांसमोर आहे. सरकार हिंसाचार थांबवू शकत नाही किंवा जाणूनबुजून हिंसाचार घडू देत आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर पंतप्रधानांनी 37 सेकंदाचे विधान केले आहे. मणिपूर घटना घडत असताना त्यांनी सात देशांचा दौरा केला आहे, तिथून विविध पुरस्कार आणले आहेत आणि देशभरातील निवडणूक रॅलींना संबोधित केले आहे. मात्र पीडितांना भेटण्यासाठी ते मणिपूरला गेले नाहीत. हे कदाचित हिंसाचाराइतकेच लज्जास्पद आहे.

हिंसाचाराच्या आधी कुकी आदिवासींविरुद्ध द्वेष पसरवला जात होता. त्यांना म्यानमारचे घुसखोर म्हटले गेले. अफू पिकवल्याचा आणि शेतजमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल दोन गोष्टी स्पष्ट आहेत: सरकार एकतर अक्षमतेने किंवा संगनमताने हिंसाचार नियंत्रित करत नाही. आणि दुसरे म्हणजे हिंसाचार भडकवण्यासाठी वातावरणात द्वेषाचे विष मिसळले गेले.

आरपीएफ  कॉन्स्टेबल चेतन सिंगने ट्रेनमध्ये तीन मुस्लिम प्रवाशांची आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना भयावह आहे. त्याच्या अधिकाऱ्याने त्याला रजा देण्यास नकार दिला. त्याच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष भरला होता. चेतन सिंगने ट्रेनभोवती फिरून मुस्लिम प्रवाशांना ओळखले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याने त्यांच्या कपड्यांवरून आणि दाढीवरून ते मुस्लिम असल्याचे ओळखले (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सांगितले की ते लोक त्यांच्या कपड्यांवरून ओळखले जाऊ शकतात). मुस्लिम प्रवाशांची हत्या करताना चेतन सिंग सांगत होते की, मुस्लिम पाकिस्तानशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांना भारतात राहायचे असेल तर त्यांना ’योगी-मोदी’ म्हणावे लागेल. तो मानसिक आजारी असल्याचा दावा केला जात आहे. तसे असेल तर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्याला शस्त्रे का देण्यात आली? की या जातीयवादी हवालदाराला वाचवण्याचा डाव आहे? आपल्या समाजात द्वेषाचा अधिक बोलबाला आहे. गोदी मीडिया त्याचा अधिक प्रचार करत आहे. हा द्वेष कमी करण्यासाठी माध्यमातील इतर वर्ग काहीच करत नाहीत. याचा परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे. चेतन सिंग आपल्याला शंभूसिंग रेगर नावाच्या दुकानदाराची आठवण करून देतो ज्याने सोशल मीडियावर लव्ह जिहादच्या प्रचाराने प्रभावित झालेल्या बंगाली मुस्लिम मजूर अफराझुलची हत्या केली. वेगवेगळ्या माध्यमातून समाजात जातीयवादी शक्तींकडून पसरवण्यात येत असलेला द्वेष आपण कुठे नेऊन ठेवला आहे, हे या दोन घटनांवरून स्पष्ट होते.हरियाणामधील नूह येथील घडामोडींबाबत दोन गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रा दरवर्षी काढण्यात येते. त्याचे गंतव्य नल्हार महादेव मंदिर आहे. विशेष म्हणजे यंदा ही यात्रा ज्या मार्गाहून काढण्यात आली ती मुस्लीम वस्ती होती तेथून जाणूनबुजून यात्रा काढली गेली. मंदिरात विहिंप नेते सुरेंद्र जैन उपस्थित होते. यात्रा सुरू होण्यापूर्वीच ते मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवण्यात मग्न होते. त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. याशिवाय नासिर आणि जुनैद यांच्या हत्येचा आणि त्यांना चारचाकी वाहनात जाळल्याच्या घटनेचा आरोपी असलेल्या मोनू मानेसरनेही या यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि लोकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. तसेच त्याच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे म्हटले होते. मोनू हा बजरंग दलाच्या गोरक्षण कक्षाचा प्रमुख आहे आणि नासिर आणि जुनैदच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याबद्दल नुहच्या लोकांना त्याच्याबद्दल तिरस्कार आहे. मोनूचा व्हिडिओ प्रक्षोभक होता. असाच एक व्हिडिओ बिट्टू बजरंगी नावाच्या आणखी एका कथित गोरक्षकाने देखील जारी केला होता. विहिंपने दोघांनाही यात्रेत सहभागी न होण्याचा सल्ला दिल्याचे दिसते. मुस्लिम अल्पसंख्याकांनी मिरवणुकीवर आणि मंदिरावरही हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांच्या उपस्थितीत धर्मरक्षकांनी मंदिराच्या आतून गोळीबार केल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिरवणुकीतील सहभागी लोकांच्या हातात शस्त्रे होती आणि ते मुद्दाम प्रक्षोभक घोषणा देत मुस्लिमबहुल भागातून बाहेर पडले. मिरवणुकीवर हल्ला करणारेही सशस्त्र होते.

या संपूर्ण घटनेदरम्यान पोलीस एकतर मूक प्रेक्षक बनून राहिले किंवा उलटे तोंड फिरविलेे, हे व्हिडिओवरून स्पष्ट होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी मशिदीवर हल्ला करून तेथील नायब इमामाची हत्या केली. गुरूग्रामच्या सेक्टर 57 मधील या मशिदीवर सुमारे 200 हिंदुत्ववाद्यांच्या जमावाने हल्ला केला. त्यांनी तिथे झोपलेल्या तिघांना मारहाण केली, नायब इमाम शाद यांच्यावर चाकूने अनेक वार केले आणि मशिदीला आग लावली. नायब इमाम यांचा मृत्यू झाला. इमाम शादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे ज्यामध्ये ते प्रार्थना करत आहेत,  ते म्हणतात, ऐ अल्लाह, हिंदू-मुस्लिम एकत्र बसून एका थाळीत जेऊ दे असा हिंदुस्तान बनव.नुह येथील हिंसाचार दिल्ली-एनसीआरच्या इतर भागात पसरला आहे. सिटिझन्स फॉर पीस अँड जस्टिस नेे पोलिस महासंचालक आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला निवेदन केले आहे की, हिंसाचार पसरण्यापासून रोखले पाहिजे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नूहच्या घटनांवर अतिशय अचूक भाष्य केले आहे. दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये बोलताना ते म्हणाले, जाट समाज संस्कृती आणि परंपरेद्वारे आर्य समाजी जीवनपद्धतीचे अनुसरण करत आहे आणि सामान्यतः जाट फारसे धार्मिक नसतात. त्या भागातील मुस्लिमही त्यांच्या विचाराने सनातनी नाहीत. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत आपण तिथल्या दोन्ही समाजातील संघर्ष क्वचितच ऐकला असेल. पण मणिपूरने घडलेल्या घटनांप्रमाणे, 2024 च्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशा अशा घटना आणखी घडतील. या भागात अनेक मिरवणुका काढण्याचा विहिंपचा मानस आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारला या मिरवणुकांमध्ये हिंसा किंवा द्वेषयुक्त भाषणे दिली जाणार नाहीत याची खात्री करण्यास सांगितले आहे. आपल्याला द्वेषाशी लढायचे आहे. द्वेषाच्या विरोधात चळवळ चालवायची आहे. बहुवाद आणि विविधतेच्या मूल्यांप्रती संवेदनशील असणारी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाची आपल्याला गरज आहे. आम्हाला भारतीय राष्ट्रवादासाठी वचनबद्ध सरकार हवे आहे, जातीय राष्ट्रवाद नाही. 


- राम पुनीयानी

(अमरीश हर्देनिया यांनी इंग्रजीतून हिंदीत अनुवादित केले; हिंदीतून मराठीत बशीर शेख यांनी केले.( लेखक आयआयटी बॉम्बे येथे शिकवतात आणि 2007 चा राष्ट्रीय सांप्रदायिक सौहार्द पुरस्कार प्राप्तकर्तेआहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget