वर्ष कोणतेही असो एप्रिल महिना आला की, अगोदर डोळ्यासमोर चित्र येते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे. भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये भीम जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. परंतु महापुरुषांनाही सांसारिक, खाजगी जीवन असते याची समाजाला फारशी कल्पना नसते. समाजाला दिसतो तो फक्त त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, मुक्तीसाठी रणमैदानात लढणारा योद्धा. असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान योद्ध्याच्यामागे खंबीरपणे उभी असणारी त्यांची त्यागी पत्नी रमाबाई यांच्या कार्याला झळाळी देण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून सादर करत आहे.
रमाबाईंची स्तुती करताना कवी संजय बनसोडे म्हणतात,
जरी गरीबीचा पाठी घाव,
तरी प्रेमळ तिचा स्वभाव
दीन दलितांची आई होती,
रमाई तिचे नाव.
रमाबाई यांचा कौटुंबिक परिचय द्यायचा झाला तर, घरी अठराविश्व दारिद्र्य. वडीलांचे नाव भिकू वलंगकर आणि आईचे नाव रुक्मिणी होते. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा, त्यात रमाबाई ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या. भिकू आणि रुक्मिणी हे गरीब पण स्वाभिमानी जोडपे. चांगल्या गोष्टीला दुनिया चांगलं म्हणत नाही पण तेवढ्यामुळे वाईट गोष्टी करून मान मिळवणं चांगलं नाही. दुनियेत गुणांची कदर होते पण जरा उशिरा यांसारख्या प्रेरणादायी गोष्टी रुक्मिणीबाई लहान रमाला सांगत असत. रमाबाई तशा कष्टाळू आणि सोशीक वृत्तीच्या. बालपण असं सुखात चाललं होतं. परंतु काळाने घात केला अन रमाबाईंची आई आणि त्या पाठोपाठ वडीलही काळाच्या पडद्याआड गेले. बालवयातच रमाबाई आणि भावंडे पोरकी झाली. काका मामाकडे राहणाऱ्या सोज्वळ रमाचा वयाच्या नवव्या वर्षी भीमराव आंबेडकर यांच्याशी विवाह झाला आणि एका नवीन युगाचा आणि त्यागाचा प्रवास सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासाचा व्यासंग इतका गाढ होता की
रात्रंदिवस ते आपल्या खोलीत अभ्यास करत तेव्हा रमाबाई तास-न्-तास दाराबाहेर बसून जेवण्यासाठी त्यांची वाट पाहत. बाबासाहेब परदेशात शिकण्यासाठी गेले असता रमाबाई शेणाच्या गोवऱ्या थापून, आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवत. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतांना बाबासाहेबांना मानसिक आधार देऊन खंबीरपणे त्यांना साथ दिली.
शेन गोवऱ्या थापून
केला संसार भिमाचा,
नाही केला हट्ट तिने
कधी कोणत्या गोष्टीचा
एकदा बाबासाहेब विदेशातून घरी येत होते. ’बाबासाहेब एवढ्या दिवसांनी येत आहेत परंतु ठिगळाच्या लुगड्यात कशी भेटू?’ अशा विचाराने रमाबाई गोंधळून गेल्या. नविन लुगडे घ्यायला पैसे नाहीत, स्वाभिमानी रमा दुसऱ्या कुणाला मागणारी नव्हती, तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला जरीचा पटका लुगडे म्हणून नेसून रमाबाई बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेल्या. बाबासाहेब वंचित मुलांचे वसतिगृह चालवत. एकदा ते परदेशात गेले होते तेव्हा रमाबाई वस्तीगृहात गेल्या असता त्यांना समजले की, वस्तीगृहात मुलांना खाण्यासाठी अन्नच नाही तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व तिथल्या व्यवस्थापकांना मुलांसाठी अन्न आणायला सांगितले.
गरीबी आणि सामाजिक परिस्थितीने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या रमाबाई आपल्या बॅरिस्टर पतीच्या बरोबरीने उभे राहायला लाजत असत. मग अडाणी रमाबाईंनी सावित्रीचा वसा जपला आणि त्या शिक्षित झाल्या. महात्मा फुलेंचा आदर्श ठेवून डॉ. बाबासाहेब यांनी स्वतः त्यांना शिकवले. रमाबाई मुळात धार्मिक होत्या. जेव्हा बाबासाहेब हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथा परंपरेमुळे त्याला त्यागण्याच्या विचारात होते तेव्हा रमाबाईंनी त्यांना संयमाने साथ दिली. याची प्रचिती त्या प्रसंगी होते जेव्हा रमाबाई पंढरपूरला जाण्यासाठी हट्ट धरतात आणि बाबासाहेब त्यांना सांगतात की, ’चोखोबासारख्या विठ्ठलाच्या सख्याला त्याच्या जातीमुळे मंदिरात जागा दिली नाही आणि तुला तेथे जाण्यासाठी कोण परवानगी देईल?’ बाबासाहेब विदेशात असतांना इकडे त्यांच्या घराची बेताची परिस्थिती पाहता अनेक उदार लोकांनी रमाबाईंना मदत देऊ केली पण या स्वाभिमानी माऊलीने ती मदत नम्रपणे नाकारून, रक्ताचे पाणी करून आपल्या संसाराचा गाडा हाकला. अशा एक ना अनेक घटना आहेत त्यामधून रमाबाईंचा नम्र स्वभाव, जिद्द, चिकाटी, बुद्धिमत्ता, आत्मसन्मान झळकतो. शेवटी क्षयरोगाने त्यांना ग्रासले आणि वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बॅरिस्टर बाबासाहेब ढसाढसा रडत होते जणू काही आभाळच कोसळले.
तेव्हा रमाईचे ते शब्द आठवले जेव्हा रमाबाई म्हणायच्या, ’आपला समाज खूप वाईट अवस्थेत आहे; त्याला या अवस्थेतून बाहेर काढायची जबाबदारी आपल्यावर आहे.’ यातून समाजाच्या हालअपेष्टांची जाणीव रमालाही होती, याचा दिलासा आणि समाजाच्या काळजीपोटी बाबासाहेबांनी स्वतःला सावरले परंतु रमाच्या जाण्याने बाबासाहेबांना पाठीचा कणा मोडल्यासारखे भासत होते. त्यांच्या याच प्रेमापोटी थॉट ऑफ पाकिस्तान हा आपला जगप्रसिद्ध ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ’प्रिय रामु’ ला अर्पित केला आहे. रमाबाईंना बाबासाहेब प्रेमाने रामु म्हणत. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले, लहान वयात लग्न, पाच मुलांना जन्म, चार मुलांचा मृत्यू हे सारे आघात सहन करून रमाबाईंनी बाबासाहेबांना खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने साथ दिली. आजची आधुनिक परिस्थिती पाहता एकीकडे काही स्त्रिया आपल्या राहणीमानावर, कपड्यालत्यावर हजारो रुपये खर्च करतात. दागदागिने घालून मिरवतात, काबडकष्टापासून स्वतःला दूर ठेवतात, संयुक्त कुटुंबात राहणे पसंत करत नाहीत, अशांसाठी फाटक्या लुगड्यात हसत मुखाने नांदणाऱ्या रमाचे व्यक्तिमत्व जाणून घेणे फार गरजेचे आहे.
कवि भागवत तुरे यांनी लिहिलेल्या या ओळी बघा, तिने कधी न केली भीमरावांना, चैन सुखाची मागणी न्याय हक्कासाठी लढणारी, तिने मजबूत केली भीमलेखनी
अशा या भीम जयंतीच्या महिन्यात बाबासाहेबांच्या कीर्तीचा गाजा वाजा होतोतेव्हा या त्यागी माऊली रमाबाई यांच्या त्यागाची प्रकर्षाने जाणीव होते.
- प्रिया कानिंदे सरतापे
(मो. 8390355163)
Post a Comment