Halloween Costume ideas 2015

बद्रच्या युद्धाचा एक प्रसंग : प्रेषितवाणी (हदीस)


रमजान महिन्यात बद्रचे युद्ध झाले होते. ह्या युद्धात कुरैश लोकांची संख्या १००० होती, तर दुसरीकडे मुस्लिम सैन्याची संख्या ३०० होती. मुस्लिमांमध्ये कमी प्रमाणात शस्त्रे होती, फक्त दोनच घोडे होते. युद्धानंतर १४ मुस्लिम मारले गेले तर कुरैश सोबत्यांचे ७० सैनिक मारले गेले. या युद्धातील कैद्यांमध्ये अबुल आस (र.) प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जावई आणि त्यांचे चुलत बंधू अकील देखील होते. युद्धकैद्यांना जेव्हा प्रेषितांच्या समोर हजर करण्यात आले तेव्हा त्यामध्ये प्रेषितांच्या पत्नी ह. सौदा (र.) देखील बसलेल्या होत्या. या कैद्यांमध्ये ह. सौदा (र.) यांचे एक नातेवाईक सुहैल बिन उमर देखील बसले होते. त्यांना पाहताच ह. सौदा (र.) म्हणाल्या, “तुम्ही सुद्धा बाईसारख्या हातात बेड्या घालून बसलात? युद्धात लढताना मारले गेले असे होऊ शकले नाही?” साऱ्या कैद्यांना दोन-दोन, चार-चार प्रमाणे प्रेषितांच्या अनुयायींमध्ये वाटून दिले गेले आणि त्यांना आदेश दिला गेला की त्या कैद्यांना आरामत ठेवावे. प्रेषितांचे अनुयायी स्वतः खजुरांवर गुजरान करत होते आणि आपल्या जबाबदारीत दिलेल्या कैद्यांना अन्नाचे जेवण खायला देत होते. एक कैदी अबू उजैर यांचे म्हणणे आहे की ज्या मुस्लिमांनी मला आपल्या घरी (स्वतःच्या) कैद करून ठेवले होते ते जेव्हा त्यांच्या जेवणाची सोय करत. जेवणाचे ताट माझ्यासमोर ठेवायचे आणि त्या ताटातून खजूर ते स्वतःसाठी खायला घ्यायचे आणि बाकीचे जेवण (शिजवलेले अन्न) माझ्यासाठी ठेवून द्यायचे. याची मला लाज वाटायची. मी भाकरीचा काही भाग त्यांना देत होतो, पण ते घेत नव्हते. याचे कारण हे होते की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना ताकीद दिली होती की कैद्यांबरोबर चांगला व्यवहार करावा. मदीना पोचल्यावर प्रेषितांनी आपल्या सर्व अनुयायींशी विचारविनिमय केला की या कैद्यांविषयी पुढे काय केले जावे. यावर ह. अबू बकर (र.) म्हणाले की सर्व लोक आपलेच नातेवाईक आहेत. यांच्याकडून फिदया (दंड) घेऊन सोडून द्यावे. ह. उमर यांनी मात्र असा सल्ला दिला. ह्या सर्वांची हत्या केली जावी. पण प्रेषितांनी मात्र ह. अबू बकर यांच्या म्हणण्यानुसार सर्वांना सोडून देणे पसंत केले. शेवटी युद्धकैद्यांकडून प्रत्येकी चार हजार दिरहम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. ज्या कैद्यांकडे पैसे नव्हते त्यांना तसेच सोडून दिले गेले आणि काही अशा कैद्यांना जे शिकलेले होते त्यांना ही जबाबदारी देण्यात आली की त्यातील प्रत्येकाना १०-१० मुलांना लिहणे-वाचणे शिकवावे. त्या मोबदल्यात त्यांना सोडून देण्यात आले. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जावई अबूल आस सुद्धा युद्धकैदी होते. त्यांच्याकडे फिदिया (दंड) देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी आपल्या पत्नी ह. जैनब (र.) ज्या प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे मागितले. ह. झैनब यांच्या विवाहप्रसंगी त्यांच्या आई ह. खदीजा (र.) (प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पत्नी) एक गळ्यातला हार त्यांना दिला होता. ह. जैनब यांनी तोच हार पाठवून दिला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तो हार पाहिला तेव्हा २५ वर्षांपूर्वीची आठवण आली. त्यांना रडू कोसळले आणि आपल्या अनुयायींना विचारले की जर तुमची मर्जी असेल तर मी त्या आईचा हार तिचा मुलीला परत करू? सर्वांनी संमती दिल्यावर तो हार परत देण्यात आला. (शिबली नोमानी, सीरतुन्नबी)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget