कयामतच्या दिवशी येणारा भूकंप इतका विध्वंसक असेल की त्यामुळे भेदरलेली माणसे नशेत असल्यासारखी वाटतील. प्रत्यक्षात ते नशेत नसतील पण कयामतची भयानकता आणि कठोर शिक्षेची संभावना लक्षात घेता लोकांची अवस्थाच तशी होईल. हाच तो दिवस असेल जेव्हा संपूर्ण मानवजातीला जिवंत करून त्यांच्याकडून संपूर्ण जीवनाचा हिशोब घेतला जाईल आणि त्या दिवशी प्रत्येकाला फक्त स्वतःच्या मुक्तीची चिंता असेल.
मृत्यूनंतर माणसांना जिवंत केले जाईल याबाबतीत अनेकांना शंका वाटते. काही लोक असाही विचार करतात की मृत्यूनंतर माणसांचे अंतिम विधी वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. मृतदेहाला दफन करणे, जाळणे किंवा प्राण्यांच्या स्वाधीन करणे इत्यादी वेगवेगळ्या प्रथा प्रचलित आहेत. याशिवाय कधी सागरी अपघातात माणसं बुडतात आणि माशांच्या पोटात जातात. कधी जंगलात हिंस्र प्राण्यांचे शिकार ठरतात. मग माणसं मरून हजारो वर्षे झालेली असतील, त्यांच्या शरीराचा कण न कण मातीत मिसळलेला असेल, हाडं सुद्धा जीर्ण होऊन कोण जाणे कुठं कुठं विखुरलेली असतील, मग सर्वत्र पसरलेल्या त्या शरीर घटकांना ए्कत्रित करून सर्वांना दूबार जिवंत करणे कसे शक्य आहे? माणसाने असा विचार करण्याऐवजी या प्रश्नावर विचार करावा की माणसाची निर्मिती कशापासून होते? तो सुरुवातीला काय असतो? फक्त वीर्याचा एक थेंब जो गर्भाशयात पोहोचवला जातो. हाच थेंब पुढे रक्ताचा आणि मांसाचा गोळा बनतो, मग त्या गोळ्याला मनुष्य रूप मिळते आणि याच एका थेंबापासून पुरुष किंवा स्त्री जन्माला येते. एका थेंबाचा विकास करून, त्यातून उत्तम गुण-क्षमता असलेली व्यक्ती घडवण्याचे सामर्थ्य ज्या निर्मात्याकडे आहे, मानवांना दूबार जिवंत करणे त्याला काय कठीण आहे? या उदाहरणाबरोबर पावसाच्या उदाहरणातूनही मरणोत्तर जीवनाचे संकेत कुरआनच्या आयतीमध्ये दिले गेले आहे,
या’अय्युहन्नासु इन् कुन्तुम फी रयबिम्-मिनल्-बअसि फइन्ना खलक्नाकुम् मिन तुराबिन सुम्म मिन्-नुत्फतिन् सुम्म मिन् अ-ल-कतिन सुम्म मिम्-मुज्गतिन् मुखल्लकतिंव्-व-गय-रि मुखल्लकतिंल्-लनुबय्यि-न लकुम्, व नुकिर्रु फिल्-अरहामि मा नशा’उ इला’ अ-ज-लिम्-मुसम्मन् सुम्-म नुख्-रिजुकुम् तिफ्-लन् सुम्-म लितब्लुगू अशुद्-द-कुम्, व मिन्-कुम् मंय्-युत-वफ्फा व मिन्कुम मंय्-यु-रद्-दु इला’ अर्-जलिल उमुरि लिकय्-ल यअ्लमु मिम् बिअ्द इल्मिन शय्अन, व तरल्-अर्-ज हामि-दतन् फ इजा अंजल्-ना अलय्-हल्-मा’-अह्तज्जत् व-रबत् व अम्बतत् मिन् कुल्लि जव्-जिम् बहीजिन्.
अनुवाद :-
लोकहो ! मृत्यूनंतर जिवंत होण्याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला मातीपासून म्हणजे मातीतील घटकांपासून निर्माण केले, मग वीर्याच्या एका थेंबापासून, नंतर गोठलेल्या रक्तापासून, मग गर्भातील मांसाच्या गोळ्यापासून, जो काही अंशी आकारयुक्त व काही अंशी आकार नसलेल्या अवस्थेत असतो. अशा विविध अवस्थेतून नेऊन तुमची निर्मिती यासाठी केली की, तुम्हाला आमच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी, आणि आम्ही ज्यास जन्म देऊ इच्छितो त्यास एका निर्धारित अवधीपर्यंत मातेच्या गर्भाशयात राहू देतो, मग तुम्हाला बाळाच्या रूपात बाहेर आणतो व जगण्याची संधी प्रदान करतो, यासाठी की तुमच्यापैकी काहींना परिपक्वतेच्या वयापर्यंत पोहोचता यावे, मग तुमच्यापैकी काही, याआधीच मृत्यू पावतात आणि काही वार्धक्याची शेवटची पातळी गाठतात, तेव्हा त्यांची अवस्था अशी होते की एकेकाळी जी गोष्ट ते चांगल्या प्रकारे जाणायचे, पण या वार्धक्याच्या अवस्थेत त्यांना काहीही उमजत नाही, आणि तुम्ही पाहता जमीन कोरडी आणि निर्जीव असते, पण जेव्हा तिच्यावर आम्ही पाण्याचा वर्षाव करतो, ती अचानकपणे सचेत होऊन फुलू लागते आणि ती सर्व प्रकारच्या नयनरम्य वनस्पती, नर व मादी अशा जोडीच्या स्वरूपात उगविते, लोकहो! हे सर्व प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात उघड असतानाही, तुम्हाला मृत्यूनंतर जिवंत होण्याविषयी शंका वाटते? हे सर्व यासाठी घडते कारण अल्लाह अंतिम सत्य आहे, आणि तोच मृतांना जिवंत करीत असतो. त्याला प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे, आणि लोकहो! लक्षात ठेवा, कयामत येणार, यात मुळीच शंका नाही, आणि अल्लाह त्यांनाही अवश्य उठवून उभे करेल, जे कबरींमध्ये आहेत म्हणजे सर्व मेलेल्यांना.
( 22 अल्-हज्ज : 5 )
या आयतीमध्ये मरणोत्तर जीवनाला जमीनीवर बरसणाऱ्या पावसाच्या उदाहरणातून प्रस्तुत केले गेले आहे. आपल्याला माहित आहे की उन्हाळ्याच्या शेवटी जमीन किती भकास आणि ओसाड दिसते. पावसाचा अभाव असल्यामुळे जी काही झाडे-झुडपे असतात त्यांच्यावरील पाने, फुले करपून जातात. जेंव्हा त्यांचा भुगा होऊन जमिनीवर पडतो तेंव्हा रोपांना असलेल्या बियाही मातीत पडतात आणि दीर्घ काळापर्यंत मातीत मिसळून राहतात. मग एक दिवस पाऊस पडतो आणि एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या बियांमधून रोपे वर येतात आणि पाहता पाहता त्या रोपांवर निरनिराळ्या रंगांची भरपूर फुले दिसू लागतात आणि वैराण पडलेल्या ’मरुभुमी’ वर जीवन दिसू लागते. असेच पावसाच्या सरीप्रमाणे एकेदिवशी ईश्वर हुकूम देईल आणि जमिनीवर पसरलेल्या मृत शरीरांच्या कणाकणातून मेलेली माणसं जिवंत होतील. ......... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment